Nashik Godavari : एकीकडे गोदामाईचा श्वास गुदमरतोय अन् दुसरीकडे महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचा अजब दावा; म्हणाले, गोदावरी प्रदूषित नाहीच!
Nashik Godavari : नाशिक गोदावरी नदी प्रदूषित नसल्याचा अजब दावा महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने केला आहे.

Nashik Godavari : एकीकडे गोदावरी नदीपात्रात (Godavari River) ठिकठिकाणी पानवेलीचे साम्राज्य तर, अनेक ठिकाणी गटार, नाल्याचे पाणी नदी पात्रात सोडले जात असतानाच ही नदी प्रदूषित नसल्याचा अजब दावा महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने केला आहे. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या (Maharashtra Pollution Control Board) आश्चर्य व्यक्त केले जात असून प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या दाव्यावर पर्यावरण प्रेमींनी शंका उपस्थित केली आहे.
मागील अनेक वर्षांपासून गोदावरी नदीच्या प्रदूषण (Godavari River Pollution) मुद्द्यावर स्थानिक प्रशासन आणि सरकार पातळीवर काम करण्यात येत आहे. भारताची दक्षिण गंगा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या नदीला प्रदूषणातून मुक्त करण्यासाठी या संस्थांकडून प्रयत्न केले जात आहेत. मात्र हीच नदी प्रदूषित नाही,असा अहवाल महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळांने दिल्याने नवा वाद सुरू झाला आहे.
नदी प्रदूषित नाही, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचा दावा
गोदावरी नदीला प्रदूषण मुक्त करण्यासाठी आतापर्यंत लाखो रुपये खर्च करण्यात आले आहेत तसेच आगामी कुंभमेळ्याच्या अनुषंगाने ही नदी स्वच्छ करण्यासाठी हजारो कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहेत. एकीकडे नदीला स्वच्छ करण्यासाठी प्रयत्न होत असताना दुसरीकडे महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे मात्र गोदावरी नदीतील पाणी स्वच्छ असल्याचे आकडेवारी जाहीर केले आहेत. नाशिक शहरातून वाहणाऱ्या या नदीचे सहा ठिकाणाहून पाण्याचे नमुने घेत पाण्याची WQI म्हणजे वॉटर क्वालिटी इंडेक्स तपासण्यात आले याच तपासणीत नदीतील पाणी स्वच्छ आहे आणि नदी प्रदूषित नाही असा दावा महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने केला आहे.
पर्यावरण प्रेमींनी उपस्थित केली शंका
आगामी कुंभमेळाच्या पार्श्वभूमीवर गोदावरी नदी प्रदूषणमुक्त करण्यासाठी उपाययोजना केल्या जात असतानाच प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या दाव्यावर पर्यावरण प्रेमींनी शंका उपस्थित केली आहे. प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या दाव्याला आव्हान देण्यासाठी पर्यावरण प्रेमींनीही गोदावरी नदीच्या पाण्याचे नमुने खाजगी प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवणार आहेत. या तपासणीत काय निष्कर्ष येणार? हे पाहणे आता महत्त्वाचे ठरणार आहे.
इतर महत्त्वाच्या बातम्या























