Chhagan Bhujbal : आमच्या सरकारच्या काळात लॉकडाऊन होते, सण उत्सव कसे साजरे करणार, भुजबळांचे शेलारांना प्रत्युत्तर
chhagan Bhujbal : निर्बंध उठविल्याने सर्वत्र सण उत्सव साजरे होत आहेत, त्यामुळे भाजपने (BJP) याचे श्रेय घेऊ नये असा इशारा छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी आशिष शेलार यांना दिला.
Chhagan Bhujbal : कोरोना (Corona ) काळात पंतप्रधान मोदी (Pm Narendra Modi) यांनी देशभर लॉकडाऊन (Lockdown) करण्यात आले. त्यामुळे देशभरात नागरिक घरात बसून होते. मग सण साजरे कसे करणार? आता निर्बंध उठविल्याने सर्वत्र सण उत्सव साजरे होत आहेत, त्यामुळे भाजपचे याचे श्रेय घेऊ नये असा इशारा छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी आशिष शेलार यांना दिला.
यावेळी भुजबळ यांनी रस्त्यांच्या अवस्थेबद्दल सरकारवर ताशेरे ओढले. नाशिक (Nashik) मुंबई प्रवासाला सहा तास लागत असून मुख्यमंत्र्यांनी ठाण्याच्या पुढे येऊन बघावे. वाहनधारकांना रस्त्यातील खड्डयांचा खूप त्रास होत असून अद्यापही अनेक ठिकाणी खड्डे बुजविणे बाकी आहे. महामार्गांची ही परिस्थिती असून शहरातही अशीच अवस्था आहे. तर पिंपळगाव टोलवर बाउन्सर वगैरे ठेवून वाद घालू नये, पोलिस त्यांची व्यवस्थित खबरदारी घ्यायला समर्थ असल्याचे ते म्हणाले.
भुजबळ पुढे म्हणाले की स्वातंत्र्य संग्रामात अनेकांनी प्राणाची आहुती दिली. त्यामुळे समाजासमाजात द्वेष निर्माण करू नये, टिपू सुलतान लढले तो इतिहास आहेच,पण सावरकरांनी सुद्धा इंग्रजांविरोधात काळ्या पाण्याची शिक्षा भोगली. त्यामुळे त्यांचे महत्व कमी होत नसल्याचे ओवैसिंचे नाव न घेता ते म्हणाले. तर मुंबई महापालिकेसाठी सर्वच पक्षांची चढाओढ सुरू आहे. सर्वच पक्ष म्हणताय आमचा महापौर बसणार, कार्यकर्त्यांमध्ये उत्साह निर्माण करण्यासाठी असे म्हणावे लागते, असा स्पष्ट केले.
सत्तासंघर्षावर भुजबळ म्हणाले...
गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या सत्तासंघर्षावर भुजबळ म्हणाले की दोन्ही पक्षांनी वाटत आहे की आमच्या बाजूनेच निकाल लागेल, मात्र काय निकाल लागेल यावर सर्व अवलंबून आहे. या निकालासाठी आपण वेट अँड वॉचवर आहोत. मात्र उद्याही निर्णय लागतो की आणखी काही घटनात्मक बेंच बसते, हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. मागेच वाटले होते की निर्णय लागेल पण तारीख पुढे गेली. मात्र यासाठी घटनापीठ तयार करावे लागेल अशी शक्यताही भुजबळांनी व्यक्त केली आहे.
आशिष शेलारांना उत्तर
महाविकास आघाडी सरकार काळात हिंदू सण साजरे झाले नाहीत, असा आरोप आशिष शेलार यांनी केला. यावर भुजबळ म्हणाले महाविकास आघाडी सरकारच्या काळात कोरोना असल्याने सगळेच घरी बसले होते. पंतप्रधान मोदींनीच लॉकडाऊन जाहीर केल्याने सण कसे साजरे करणार होतो? आता कोरोना कमी झाल्याने धार्मिक स्थळांवर, सांस्कृतिक कार्यक्रमांना गर्दी होते आहे. दोन वर्षांचीच आता भरपाई होते आहे, गणेशोत्सव, नवरात्रात सुद्धा गर्दी होणार असल्याने हे श्रेय भाजपने घेता कामा नये, असा इशारा त्यांनी यावेळी दिला.
शिवभोजन केंद्र वाऱ्यावर....
महाविकास आघाडी सरकारच्या काळात शिवभोजन थाळीची सुरवात झाली. राज्यातील अनेक नागरिकांनी शिवभोजन थाळीचा आस्वाद घेतला. मात्र सद्यस्थितीत शिवभोजन केंद्रांचे पैसे अडकले आहेत. या प्रश्नावर उद्या प्रश्न मांडणार असून शिवभोजन केंद्र चालविणारे सामान्य घरातून आलेले आहेत. त्यांना वेळेवर पैसे मिळणे आवश्यक आहे, अन्यथा शिवभोजन केंद्र बंद पडतील. त्यासाठी शिवभोजन थाळीसारखी चांगली योजना सरकारने सुरू ठेवावी, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.