Nashik News : नाशिक जिल्ह्यात आता दोन ऐवजी एकच लघु पाटबंधारे विभाग, जिल्हा जलसंधारण अधिकारी कार्यालय कार्यान्वित
Nashik News : नाशिक जिल्हा परिषदेतील लघुपाटबंधारे विभागाचे दोन्ही जिल्हास्तरीय कार्यालयाचे एकत्र समायोजन करण्यात आले असून नव्याने जिल्हा जलसंधारण अधिकारी कार्यालयाची निर्मिती करण्यात आली आहे.
Nashik News : मृद व जलसंधारण विभागाच्या अधिपत्याखालील जिल्हा जलसंधारण अधिकारी, उपविभागीय जलसंधारण अधिकारी कार्यालये नव्याने कार्यान्वित करण्यात आले आहे. त्यामुळे नाशिक (Nashik) जिल्हा परिषदेतील (Nashik ZP) लघुपाटबंधारे विभागाचे दोन्ही जिल्हास्तरीय कार्यालयाचे एकत्र समायोजन करण्यात आले असून नव्याने जिल्हा जलसंधारण अधिकारी कार्यालयाची निर्मिती करण्यात आली आहे.
दरम्यान नवीन शासन निर्णयानुसार हा निर्णय घेण्यात आला आहे. या शासन निर्णयानुसार पुर्नस्थापीत करण्यात येत असलेल्या सात उपविभाग व त्या उपविभागाचे कार्यक्षेत्र निश्चित करण्यात आलेले आहे. तसेच यापुर्वी कार्यरत असलेले लघु पाटबंधारे (पुर्व /पश्चिम) विभाग जिल्हा परिषद नाशिक ऐवजी एकच कार्यालय ठेवण्यात आलेले असून सदर कार्यालय "जिल्हा जलसंधारण अधिकारी लघु पाटबंधारे विभाग जिल्हा परिषद नाशिक" या नावाने पुर्नस्थापीत करण्यात आलेले आहे.
मृद व जलसंधारण विभागाच्या अधिपत्याखाली राज्यस्तरिय यंत्रणेकडे एकूण 26 जिल्हा जलसंधारण अधिकारी कार्यालये तसेच 127 उपविभागीय जलसंधारण अधिकारी कार्यालये कार्यरत आहेत. यासोबतच जिल्हा परिषद यंत्रणेकडे 31 जिल्हा जलसंधारण अधिकारी कार्यालय तसेच 168 उपविभागीय जलसंधारण अधिकारी कार्यालये कार्यरत आहेत.
दरम्यान मृद व जलसंधारण विभागाचा राज्यस्तरावरील कामकाजाची व्यापकता व यंत्रणेवरील ताण कमी करण्याच्या उद्देशाने शासनाने जिल्हा कार्यालये आणि उपविभागीय कार्यालयांची संख्या वाढविण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे राज्यात रायगड, नंदुरबार, परभणी, हिंगोली व भंडारा अशी पाच नवीन जिल्हा जलसंधारण अधिकारी कार्यालय कार्यान्वित करण्यात आली आहे. नाशिक जिल्हा परिषदेत लघुपाटबंधारे विभाग पूर्व व लघुपाटबंधारे विभाग पश्चिम अशी दोन जिल्हा कार्यालये आणि त्या अंतर्गत 15 उपविभागीय कार्यालये कार्यरत आहेत. मात्र, आता या दोन्ही कार्यालयाऐवजी जिल्हा जलसंधारण अधिकारी जिल्हा परिषद लघु पाटबंधारे विभाग नाशिक हे एकच कार्यालय अस्तित्वात असणार आहे. तसेच सात उपविभागीय कार्यालये पुनर्स्थापित करण्यात आली आहे.
तसेच या दोन्ही कार्यालयांच्या अधिनस्थ उपविभागीय कार्यालयाच्या एकत्रीकरणामुळे निर्माण झालेल्या जिल्हा जलसंधारण अधिकारी नाशिक या कार्यालयामध्ये व त्याआधी निस्त नव्याने निर्माण झालेल्या उपविभागीय कार्यालयांमध्ये यापुर्वीच्या दोन्ही कार्यालयाकडील अधिकारी व कर्मचाऱ्यांचे समायोजन करण्यात आले आहे. त्यात प्रामुख्याने कनिष्ठ अभियंता/शाखा अभियंता, कनिष्ठ प्रशासन अधिकारी, वरिष्ठ सहायक लिपिक, कनिष्ठ सहायक लिपिक, वाहनचालक, परिचर कर्मचारी यांचे समायोजन करण्यात आलेले असून उपविभागीय जलसंधारण अधिकारी यांचे शासन आदेशाचे अधिनस्त राहून तात्पुरते स्वरुपात तालुका निहाय जिल्हा परिषद अधिनस्त इतर विभागांमध्ये समायोजन करण्यात आलेले आहे.
राज्य शासनाच्या मृदा व जलसंधारण विभागाच्या अधिपत्याखालील जिल्हा जलसंधारण अधिकारी, उपविभागीय जलसंधारण अधिकारी कार्यालये नव्याने कार्यान्वित करणे व सर्व उपविभागीय कार्यालयाचे तालुका कार्यक्षेत्र खालील प्रमाणे शासन निर्णयानुसार घोषीत करण्यात आले आहे. याबाबत मुख्य कार्यकारी अधिकारी तथा प्रशासक लीना बनसोड यांनी शासन निर्णयानुसार आदेश निर्गमित केले आहे.
उपविभागाचे नाव मुख्यालय
जिल्हा परिषद (ल.पा) उपविभाग, मालेगांव - तालुका कार्यक्षेत्र मालेगाव, नांदगाव, जिल्हा परिषद (ल.पा) उपविभाग, येवला - तालुका कार्यक्षेत्र येवला, निफाड, जिल्हा परिषद (ल.पा) उपविभाग, दिंडोरी तालुका कार्यक्षेत्र - दिंडोरी, पेठ, जिल्हा परिषद (ल.पा) उपविभाग, कळवण तालुका कार्यक्षेत्र - कळवण, सुरगाणा, जिल्हा परिषद (ल.पा) उपविभाग, ईगतपुरी तालुका कार्यक्षेत्र - इगतपूरी, त्र्यंबकेश्वर (हरसूल), जिल्हा परिषद (ल.पा) उपविभाग, सटाणा तालुका कार्यक्षेत्र - सटाणा, देवळा, चांदवड, जिल्हा परिषद (ल.पा) उपविभाग, नाशिक तालुका कार्यक्षेत्र - नाशिक, सिन्नर.