(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Nashik Water Supply : नाशिककर! पाणी जपून वापरा, 'या' भागांत शुक्रवारी पाणी बानी
Nashik Water Supply : नाशिकच्या (Nashik) पंचवटी जलशुध्दीकरण केंद्र येथील 30 लक्ष लिटर क्षमतेचा जलकुंभाचे वृत्तवाहिनीवर जोडणीचे काम शुक्रवारी करण्यात येणार असल्याने काही भागात पाणी पुरवठा होणार नाही.
Nashik Water Supply : जिल्ह्यासह नाशिक (Nashik) शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या गंगापूर धरणातील (Gangapur Dam) पाणीसाठा कमी झाला आहे. मात्र नाशिकरांना पाणी पुरवठा सुरळीत सुरु आहे. मात्र काही दुरुस्तीच्या कामांमुळे काहीवेळा पाणी पुरवठा बंद करण्यात येतो. अशातच पंचवटीतील (panchavti) प्रभाग क्रमांक 04, 05 आणि सहा मधील बहुतांश ठिकाणी पाणीपुरवठा होणार नसल्याची माहिती पाणी पुरवठा विभागाने दिली आहे.
नाशिक महापालिकेच्या वतीने पंचवटी जलशुध्दीकरण केंद्र येथील 30 लक्ष लिटर क्षमतेचा जलकुंभाचे वृत्तवाहिनीवर जोडणीचे काम शुक्रवारी करण्यात येणार आहे. त्यामुळे पंचवटीतील काही भागात पाणी पुरवठा होणार नाही. नाशिक महानगर पालिकेककडून कार्यकारी अभियंता सार्वजनिक आरोग्य अभियांत्रिकी विभागाने यासंदर्भात पत्रक जारी केले आहे.
दरम्यान पंचवटी विभागांतर्गत पंचवटी जलशुद्धीकरण केंद्र येथील 30 लक्ष लिटर क्षमतेच्या जलकुंभाच्या उर्ध्वंवाहिनीवर जोडणीचे काम करणे आवश्यक आहे. हे काम उद्या शुक्रवार रोजी होणार आहे. या जलकुंभावरून पंचवटीतील प्रभाग क्रमांक 04, 05 व 06 या ठिकाणी पाणी पुरवठा केला जातो. या सर्व भागांत उद्या रोजीचा दुपारचा व सायंकाळच्या पाणी पुरवठा होणार नाही, तसेच शनिवार रोजीचा पाणी पुरवठा कमी दाबाने होईल याबाबत नागरिकांनी नोंद घेण्याचे आवाहन महापालिकेकडून करण्यात आले आहे.
या भागात पाणी पुरवठा बंद
यामध्ये रामवाडी परिसर, आदर्शनगर, कौशल्य नगर, फुलेनगर, कोठारवाडी, बच्छाव हॉस्पिटल परिसर, कलामाई मंदिर परिसर, नागरे मळा, क्रांती नगरचा काही भाग, तळेनगर, उदय कॉलनी काही भाग, मोरे मळा, भावबंधन मंगल कार्यालय जवळील काही परिसरात पाणी पुरवठा बंद राहील.
तसेच प्रभाग क्रमांक पाच मधील दत्त नगर, कुमावत नगर, शिंदे नगर, मखमलाबाद नाका परिसर, इंद्रकुंड, मालेगाव स्टँड, चिंचबन परिसरात पाणीपुरवठा होणार नाही. तसेच प्रभाग क्रमांक चार मधील पेठ रोड लगतचा परिसर, वडार वाडी, फुलेनगर, राहुलवाडी, भराडवाडी, दिंडोरी रोडवरील महालक्ष्मी टॉकीज मागील रामनगर परिसर, युनियन बँक ते निमणी पर्यतचा परिसर इत्यादी ठिकाणी देखील पाणी पुरवठा बंद राहील.
ग्रामीण भागात पाणीटंचाई
सध्या जिल्ह्यातील आदिवासी ग्रामीण भागात मोठ्या पाणी टंचाई जाणवत आहे. त्यामुळे या परिसरातील नागरिक पावसाची आस लावून आहेत. कधी एकदा पाऊस येईल. अन विहिरी भरतील. कधी सुखाचा घोट घेता येईल अशी अवस्था सध्या ग्रामीण भागातील अनेक गावांची आहे. अनेकां ठिकाणी तर गाळ मिश्रित पाणी गाळून तहान भागविण्याची वेळ येथील नागरिकांवर आली आहे.