Shirdi Sai Baba Mandir Protest : शिर्डी साईबाबा मंदिर संस्थानला हारफुलांचे वावडे का? फुल विक्रेते, शेतकरी, आंदोलकांचा सवाल
Shirdi Sai Baba Mandir Protest : शिर्डी साई संस्थानच्या (Shirdi Sai Baba Mandir) मंदिरात फुल नेण्यावरूनचा मंदिर आवारात फुल विक्रेते, शेतकऱ्यांनी जोरदार आंदोलन (Protest) करण्यात आले.
Shirdi Sai Baba Mandir Protest : गेल्या आठवडाभरापासून सुरु असलेल्या शिर्डी साई संस्थानच्या (Shirdi Sai Baba Mandir) मंदिरात फुल नेण्यावरूनचा चांगलाच पेटल्याचे पाहायला मिळाले. आज स्थानिक शेतकऱ्यांसह फुले विक्रेते यांच्याकडून शिर्डी साईबाबा संस्थांनच्या मंदिर आवारात जोरदार आंदोलन (Protest) करण्यात आले. यावेळी आंदोलन आणि शिर्डी संस्थानच्या सुरक्षारक्षकांमध्ये चांगलीच झटापट पाहायला मिळाली. त्यामुळे मंदिरात फुले नेण्यावरूनचा वाद आता चिघळला आहे.
कोरोनाचा (Corona) प्रादुर्भाव सुरु झाल्यानंतर राज्यातील सर्वच मंदिरे बंद करण्यात आली होती. त्याचप्रमाणे शिर्डी (Shirdi) संस्थानही भाविकांसाठी बंद करण्यात आले होते. याचबरोबर मंदिरात फुले हार प्रसाद नेण्यासही बंदी घालण्यात आली होती. मात्र कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यावर मंदिरे खुली करण्यात आली. शिर्डी साईबाबा मंदिरही भाविकांसाठी खुले झाले, मात्र मंदिरात हार फुले नेण्यास बंदी जैसे थे ठेवण्यात आली. त्यामुळे गेल्या आठवडाभरापासून हा वाद चांगलाच पेटला होता. राज्यातील इतर मंदिरात हार फुले प्रसाद नेण्यास बंदी नसताना शिर्डी साईबाबा संस्थानला फुलांचे वावडे का? असा सवाल यावेळी आंदोलकांनी केला आहे.
दरम्यान या पार्श्वभूमीवर स्थानिक फुले हार विक्रेते, प्रसाद विक्रेते तसेच फुल उत्पादक शेतकऱ्यांनी शिर्डी साई मंदिराला वेढा घातला. तत्पूर्वी याच पार्श्वभूमीवर मंदिरात भाविकांना पुजा सामुग्री नेवू द्यावीत या मागणीसाठी येथील सामाजिक कार्यकर्ते संजय काळे यांनी अनोखे आंदोलन छेडले. कोपरगाव ते शिर्डी 18 किमी पाया फुलांची टोपली घेऊन ते फुल बाबांच्या व्दारकामाई समोर अर्पण करत मुख्य कार्यकारी अधिकारींच्या नावाने घोषणा दिल्या. यात आंदोलनात फुल विक्रेते, उत्पादक शेतकरी यांनी सहभाग घेतला.मात्र हे आंदोलन चांगलेच पेटल्याचे पाहायला मिळाले. यावेळी आंदोलक आणि मंदिर सुरक्षारक्षक यांच्यात हमरीतुमरी झाली.
विश्वस्त मंडळाकडून बैठक
गेल्या दोन-तीन दिवसांपासून शिर्डी साई संस्थान मंदिरात उपोषणासह आंदोलन सुरू आहेत. तर आज फुल विक्रेते आक्रमक झाले असून सकाळपासून आंदोलन सुरू आहे. याच पार्श्वभूमीवर विश्वस्त मंडळाची साई निवास येथे गेल्या दोन तासापासून बैठक सुरू आहे. तसेच या संदर्भात दिगंबर कोते यांचे देखील उपोषण सुरू असून आज पाचवा दिवस आहे. विश्वस्त मंडळाच्या माध्यमातून डॉक्टरांनी तपासणी करण्यात आलेली आहे. त्यानंतर सध्या विश्वस्त मंडळाची बैठक सुरू असून हार फुलांबाबत निर्णय होणार का? याकडे लक्ष लागून आहे.
फुल बंदीमुळे शेतकऱ्यांचे नुकसान
कोरोना आल्यापासून जी फुलांवर बंदी आली, ती उठलीच नाही. यामुळं शेतकऱ्यांचं नुकसान होऊ लागलं आहे. शेतातच फुले सडू लागली आहेत आणि इकडे शेतकऱ्यांच्या डोक्यावर कर्जाचा डोंगर वाढू लागला आहे. शिर्डी परिसरात जवळपास १०० एकरमध्ये शेतकरी फुल शेती करतात. शिर्डीत रोज सुमारे 15 लाख रुपयांची उलाढाल होते. मंदिर परिसरात जवळपास 300 फुल विक्रेते असून या व्यवसायावर 2 हजारांपेक्षाही जास्त लोक अवलंबून आहेत. ऑक्टोबर 2021 पासून ऑगस्ट 2022 पर्यंत दहा महिने फुल हारावर बंदी घालण्यात आली होती. त्यामुळे संताप अनावर होऊन आज फुल विक्रेत्यांसह शेतकऱ्यांनी आंदोलातून मंदिर प्रशासनाला जाब विचारला.
शिर्डी साईबाबा संस्थांनचे म्हणणे काय?
दरम्यान कोरोना काळात शिर्डी संस्थानने साईमंदिरात भाविकांना फुल हार प्रसाद नेण्यास बंदी घातली असून फुल-हार बंदीचा ठराव पारित केला आहे. याबाबत शिर्डी संस्थानचे म्हणणे असे आहे कि, फुल-माळांच्या निमित्ताने भाविकांची लूट होत असून दोनशे रुपयांची फुल माळ दोन हजारांना विकली जाते. तसेच समाधीवर चढवलेली फुले गर्दीत भाविकांच्या हातून मंदिरात पडत असल्यानं ती पायदळी तुडवली जातात. यामुळे एक प्रकारे फुलांचा चिखल तयार होत आहे. यामुळे अस्वच्छता होत असून सफाईसाठी अधिक वेळ लागत असल्याने याचा परिणाम भाविकांच्या दर्शन वेळेवर होत असल्याने साई संस्थानच्या विश्वस्त मंडळाने फुल हार बंदीचा ठराव करुन अंमलात आणल्याचे साई संस्थानचे स्पष्ट केले आहे.