Jalgaon Crime : पत्नी आवडत नाही, म्हणून... रेल्वे कर्मचाऱ्यानं उचललं टोकाचं पाऊल, पत्नीसह आईलाही संपवलं
Jalgaon Crime : जळगाव (Jalgaon) जिल्ह्यात रेल्वे कर्मचाऱ्याने बायको आवडत नाही म्हणून टोकाचा निर्णय घेतला आहे.
Jalgaon Crime : जळगाव (Jalgaon) जिल्ह्यातून धक्कादायक बातमी समोर येत असून एका रेल्वे कर्मचाऱ्याने अख्ख्या कुटुंबाला संपवल्याची घटना घडली आहे. जळगाव जिल्ह्यातील भुसावळ (Bhusawal) शहरात कौटुंबिक कलहातून रेल्वे कर्मचाऱ्याने त्याच्या पत्नीसह वृध्द आईचा खून (Murder) केल्याच्या घटनेने जळगाव जिल्हा हादरला आहे. त्याचबरोबर संशयिताने मेव्हण्यावर देखील वार केले असून तो गंभीर जखमी झाला आहे.
एकीकडे नाशिक (Nashik) जिल्ह्यात गुन्हेगारी फोफावत असताना दुसरीकडे विभागात देखील गुन्हेगारीच्या (Crime) घटना वारंवार घडत आहेत. या सद्यस्थितीत कौटुंबिक वादातून अनेकदा वाईट प्रसंगाला सामोरे लागत असल्याचे अधोरेखित होत आहे. असाच काहीसा प्रकार जळगाव जिल्ह्यात समोर आले आहे. भुसावळ शहरात काळीज पिळवटून टाकणारी ही घटना मंगळवारी पहाटे घडली आहे. पत्नी आणि आई झोपेत असताना लोखंडी वस्तूने वार करत तरुणाने दोघांचा खून केला आहे. आराध्या हेमंत भूषण असे मयत पत्नी तर सुशीलादेवी भूषण असे मयत वृद्ध आईचे नाव आहे. या घटनेत संशयिताने त्याच्या शालकावर सुद्धा वार केले असून तो जखमी आहे, त्याच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. घटनेनंतर संशयित 32 वर्षीय हेमंत भूषण श्रवणकुमार यास पोलिसांनी अटक केली आहे.
भुसावळ शहरातील वांजोळा रोड, बालाजी लॉजमागील शगुन इस्टेटमध्ये या ठिकाणी ही घटना घडली आहे. संशयित हेमंत हा रेल्वे कर्मचारी असून आराध्या सोबत हेमंत यांचं 2 डिसेंबर 2022 रोजी लग्न झालं होतं. ती त्याला आवडत नसल्याने कुटुंबात वाद सुरू होते. याच वादातून रेल्वे कर्मचारी हेमंत याने मंगळवारी पहाटे झोपेत असलेल्या त्याची पत्नी आराध्या आणि आई सुशीलादेवी यांच्या डोक्यात तसेच तोंडावर घरातील लोखंडी तवा मारला. या घटनेत आराध्या आणि सुशीलादेवी या दोघांचा मृत्यू झाला आहे.
पत्नी आवडत नाही, म्हणून....
दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून वाद सुरू असल्याने हे वाद मिटवण्यासाठी रेल्वे कर्मचाऱ्याचा शालक हा सुद्धा त्याच्या भुसावळ शहरातील घरी आला होता. पहाटेच्या सुमारास वादातून हेमंत याने लोखंडी तवा झोपेत असलेल्या त्याची पत्नी आणि आई या दोघांना मारला. यापूर्वी हेमंत याने त्याचा झोपलेला शालक रिषभ यांच्यावर लोखंडी तव्याने मारहाण करून त्याला जखमी केले. त्याने हेमंत यास पकडुन ठेवले, मात्र संतापात असलेला हेमंत याने त्यांच्या तावडीतून सुटून पत्नी आराध्या व आई सुशीलादेवी या दोघांचा जीव घेतला.
नागरिकांसह परिसर हादरला
तर सद्यस्थितीत जखमी मेव्हण्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. मात्र या घटनेने परिसर हादरला असून अशा पद्धतीने पत्नी आणि आईचा जीव घेणाऱ्या संशयिताला कठोर शासन करावे अशी चर्चा नागरिकांमध्ये होत आहे. घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलीस अधीक्षक एम राजकुमार, पोलीस उपअधीक्षक सोमनाथ वाघचौरे, बाजारपेठचे पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड, सहाय्यक निरीक्षक मंगेश गोंटला, सहाय्यक निरीक्षक हरीष भोये आणि बाजारपेठ कर्मचारी घटनास्थळी दाखल असून त्यांच्याकडून खुनाची माहिती घेण्याचे काम सुरू आहे. घटनेनंतर आरोपी हेमंत श्रवण कुमार याला पोलिसांनी अटक केली आहे.