(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Nashik News : पेट्रोल न मिळाल्याने आमदार नितीन पवार यांच्या पेट्रोल पंपावर तोडफोड, घटना सीसीटीव्हीमध्ये कैद
Nashik News : कळवणचे आमदार नितीन पवार (Nitin Pawar) यांच्या पेट्रोल पंप कार्यालयाची तोडफोड करण्यात आल्याचा प्रकार घडला आहे.
Nashik Crime : कळवणचे आमदार नितीन पवार (Nitin Pawar) यांच्या पेट्रोल पंपाच्या काचेची अज्ञाताकडून तोडफोड करण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. शनिवारी (29 जुलै) पहाटेच्या सुमारास ही घटना घडली असून चार संशयितांनी पेट्रोल पंपावर येत तोडफोड केली. यात पेट्रोल पंप कार्यालयाचे (Petrol Pump) नुकसान झाले आहे. ही घटना पंपावरील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात (CCTV) कैद झाली असून याबाबत कळवण पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नाशिक शहरासह (Nashik) आजूबाजूच्या परिसरात लूटमार, चोरी, दरोडे आदी प्रकार घडत असून कळवणचे (Kalwan) आमदार नितीन पवार यांचा पेट्रोल पंप असलेल्या मानूर येथील पेट्रोल पंपावर तीन अज्ञात व्यक्तींनी हल्ला करुन केबिनच्या दरवाजाच्या काचा फोडल्या. ही घटना पंपावरील सीसीटीव्हीत कैद झाली असून याबाबत कळवण पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कळवण सुरगाणा मतदारसंघाचे राष्ट्रवादी काँग्रेस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार गटाचे आमदार नितीन पवार यांचा कळवण नाशिक मार्गावर (Kalwan Nashik Highway) मानूर शिवारातील श्री पेट्रोल पंप आहे. याच पेट्रोल पंपावर तीन अनोळखी व्यक्ती डिझेल पेट्रोल भरण्यासाठी स्विफ्ट डिझायर या वाहनातून आले होते. रात्री उशीर झाल्याने पंपावरील कर्मचारी उठले नाहीत. त्यामुळे एका तरुणाने दगडाने हल्ला करुन पंपाच्या केबिनच्या दरवाजाच्या काचा फोडल्या.
दरम्यान या घटनेतील वाहन देवळाकडून (Deola) नांदुरीकडे जात असल्याची चौकशीत आढळून आले आहे. सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे कळवण पोलीस तपास करत असून शरद पवार पब्लिक स्कूल, एच पी पेट्रोल पंप आणि कळवण शहरातील पोलीस ठाणे व इतर दुकानातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यातील फुटेज तपासून संशयितांचा माग काढला जात आहे. ही घटना शनिवारी पहाटे एकच्या सुमारास घडली. याबाबत पेट्रोल पंपाची व्यवस्थापक नामदेव साबळे यांच्या फिर्यादीवरून अज्ञात व्यक्तिविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा तपास पोलीस निरीक्षक समाधान नागरे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक घोडे करत आहेत. ही घटना राजकीय वैमनस्यातून झाली असावी, असे प्रथमदर्शनी दिसत नसून फक्त त्यांना डिझेल मिळाले नसल्याने या गोष्टीच्या रागातून झाली असावी. कारण एक तरुण मद्यधुंद अवस्थेत दगड घेऊन फिरत असल्याचे सीसीटीव्हीत दिसत असल्याचे पोलीस निरीक्षक समाधान नागरे यांनी म्हटले आहे.
जिल्ह्यातही गुन्हेगार मोकाट
नाशिक शहरात तर गुन्हेगारी वाढलीच आहे, मात्र जिल्ह्यातही अनेक भागात गुन्हेगारी फोफावत आहे. अनेक भागात खून, हाणामाऱ्या अशा घटना समोर येत असून ग्रामीण भागातही दहशतीचे वातावरण आहे. ग्रामीण पोलिसांकडून अवैध व्यवसायांवर चाप लावला जात असताना अशा गुन्हेगारीचा बंदोबस्त होणे गरजेचे असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.
हेही वाचा :
Petrol Pump owner Assassination Ahmednagar : अहमदनगरमध्ये किरकोळ वादातून पेट्रोल पंप मॅनेजरला संपवलं