Nashik News : बागलाण तालुक्यात वीज पडून बारा वर्षीय बालकाचा दुर्दैवी मृत्यू, कुटुंबासह गावावर दुःखाचा डोंगर
Nashik : कांदे झाकण्यासाठी गेला असता वीज कोसळली, या घटनेने गावावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
Nashik News : नाशिकसह (Nashik) जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह आलेल्या पावसाने अनेक भागातील नुकसान केले. बागलाण (Baglan) तालुकयातील नामपूर परिसरात देवळाणे येथे वीज पडून (lightning Strike) बालकाचा मृत्यू झाल्याची घटना घडली. रविवारी झालेल्या पावसात ही हृदयद्रावक घटना घडली आहे. कांदे झाकण्यासाठी गेला असता वीज कोसळली, या घटनेने गावावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
मागील आठवडाभरापासून नाशिक जिल्ह्यात (Nashik District) उन्हाच्या तीव्र झळा जाणवत असून प्रचंड उकाड्याने नागरिक हैराण झाले आहेत. मात्र तीन दिवसांपासून तापमानात घसरण झाल्याचे पाहायला मिळाले. अशातच काल या वातावरणात बदल झाले. सकाळपासून अनेक भागांत ढगाळ वातावरण झाले. नाशिक शहरासह जिल्ह्यात दुपारी वादळी वाऱ्यासह पावसाला सुरुवात झाली. अकस्मात आलेल्या पावसाने नागरिकांची तारांबळ उडाली. बागलाण तालुक्यातील देवळाणे परिसरातही रविवारी ढगाळ वातावरण होते. अचानक वादळी वाऱ्यासह पावसाला सुरवात झाली. याचवेळी वीज पडून बारा वर्षीय बालकाचा मृत्यू झाला.
पवन रामदास सोनवणे (Pawan Sonwane) असे या बालकाचे नाव आहे. प्रगतशील शेतकरी रामभाऊ त्रंबक सोनवणे यांचा तो मुलगा होता. कांदे झाकण्यासाठी तो गेला असताना ही घटना घडली. तर संपूर्ण जिल्ह्यात अनेक भागात मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. यात शहर व ग्रामीण भागात झाडांची पडझड झाली. वादळात कुक्कुटपालन केंद्र, काही घरांवरील पत्रे उडून नुकसान झाले. मनमाडसह अनेक ठिकाणी कित्येक तास वीजपुरवठा खंडित झाला. झाडांवरील कैऱ्या, चाळीतील कांद्याचे नुकसान झाले. पावसाने काही ठिकाणी झाडे उन्मळून पडली. त्याचबरोबर मालेगाव, येवला आदी भागातही पावसाचे आगमन झाल्याचे चित्र होते.
अनेक भागात नुकसान
इगतपुरी तालुक्यातील टाकेद परिसराला वादळी पावसाने झोडपून काढले. वादळी वाऱ्यामुळे सुरेश चंदर नवले व शेतकरी बाळू लक्ष्मण गायकवाड यांच्या घरांवरील पत्रे उडून गेल्याने नुकसान झाले. याशिवाय निफाड, सिन्नर तालुक्यांतही पावसाने सलामी दिली. येवला शहर परिसरात वादळी वाऱ्यासह आलेल्या पावसाने एका घराचे छत कोसळून दोघे जखमी याले आहेत. अनेक भागात वादळात कुक्कुटपालन केंद्र, काही घरांवरील पत्रे उडून नुकसान झाले. मनमाडसह अनेक ठिकाणी कित्येक तास वीजपुरवठा खंडित झाला. झाडांवरील कैऱ्या, चाळीतील कांद्याचे नुकसान झाले.
त्र्यंबकेश्वर भागात जोरदार पाऊस
त्र्यंबकेश्वर शहरासह तालुक्यात पावसाने जोरदार हजेरी लावली. तर पावसाने त्र्यंबकेश्वरमध्ये भाविकांची तारांबळ उडवली. त्र्यंबक राजाच्या दर्शनासाठी रविवारी तुलनेत अधिक गर्दी असते. दर्शन रांगेत तीन, चार तास प्रतीक्षा करावी लागते. या भागात अर्धा ते पाऊण तास पाऊस झाला. शहरासह हरसूलच्या दावलेश्वर परिसरात दोन तास पाऊस झाला. अनेक शेतांमध्ये पाणी साचले. जनावरांची वैरण पाण्यात गेली. वादळी वारा व पावसाने ग्रामीण भागात छप्पर उडून गेले.