(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Nashik Shivsena : नाशिकमधून अयोध्या दौऱ्यासाठी स्वतंत्र रेल्वेगाडी, 18 बोगीतून बाराशे शिवसैनिक जाणार
Nashik Shivsena : नाशिकहून (Nashik) शिवसैनिक विशेष रेल्वेने अयोध्येला रवाना होणार असून 18 बोगीतून 1200 शिवसैनिक जाणार आहेत.
Nashik Shivsena : नाशिकहून (Nashik) शिवसैनिक विशेष रेल्वेने दुपारी चारनंतर अयोध्येला रवाना होणार आहेत. 18 बोगीतून 1200 शिवसैनिक आयोध्येत दाखल होणार आहेत. याची तयारी अंतिम टप्प्यात आली असून खास टीशर्ट बनविण्यात आले आहे. रेल्वे बोगीवर लावण्यासाठी स्टिकर्स तयार करण्यात आले असून त्याचे वाटप सुरू झाले आहे. तालुका आणि विधानसभा मतदारसंघ निहाय कार्यकर्त्यांसाठी बोगी आरक्षित करण्यात आली आहे.
शिवसेना (Shivsena) नाव आणि पक्षचिन्ह मिळाल्यानंतर राज्यभरात शिवसेना शिंदे गटाचा उत्साह आहे. याच पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM eknath Shinde) येत्या रविवारी अयोध्येच्या दौऱ्यावर जात आहेत. या अयोध्या दौऱ्याची धुरा नाशिकच्या (Nashik) पदाधिकाऱ्यांवरच सोपविण्यात आली आहे. मुख्यमंत्री शिंदे यांच्या या दौऱ्याची पूर्वतयारी यापूर्वी उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरेंच्या अयोध्या दौऱ्याचे यशस्वी नियोजन करणाऱ्या पदाधिकाऱ्यांनी केली आहे. आता शिंदे गटात असणारे संपर्कनेते भाऊसाहेब चौधरी, सचिव नरेश म्हस्के यांच्यासह जिल्हाप्रमुख अजय बोरस्तेंचे पथक अयोध्येत दाखल झाले आहे. यासोबतच या दौऱ्यासाठी नाशिकमधून तीन हजार कार्यकर्तेही रेल्वेने रवाना होणार आहेत.
भाजप तसेच मनसेने शिवसेनेला डिवचल्यानंतर महाविकास आघाडीचे (Mahavikas Aaghadi) सरकार असताना तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे अयोध्या दौऱ्यावर गेले होते. ठाकरेंचा तो अयोध्या दौरा यशस्वी करण्याची जबाबदारी खासदार संजय राऊतांच्या माध्यमातून शिवसेनेच्या नाशिकच्या पदाधिकाऱ्यांवर होती. रामलल्लाचे दर्शन, वाहनांचे नियोजन करणे, पदाधिकारी कार्यकर्ते जमविणे. भोजन व्यवस्था, शरयू नदी आरतीचे यशस्वी नियोजन नाशिकच्या पदाधिकाऱ्यांनी केले होते. आठ दिवस अगोदर नाशिकचे पदाधिकारी त्यावेळी अयोध्येत तळ ठोकून होते. त्यामुळे तो दौरा यशस्वी झाला होता. शिवसेनेचे दोन गट पडल्यानंतर त्या दौऱ्याचे यशस्वी नियोजन करणारे संपर्कप्रमुख चौधरी, बोरस्ते सध्या शिवसेना शिंदे गटात असून, आपसूकच शिंदेच्या अयोध्या दोऱ्याची जबाबदारी त्यांच्या खाद्यांवर आली आहे. उद्धव ठाकरेंना डिवचण्यासाठी शिंदे येत्या रविवारी अयोध्या दौऱ्यावर जाणार आहेत.
नाशिकमधून स्वतंत्र रेल्वेगाडी
गेल्या अनेक दिवसांपासून भाजप आणि शिवसेना हिंदुत्वाच्या भूमिकेवर आक्रमक झाली असून, अयोध्येत मोठ्या प्रमाणावर शक्तिप्रदर्शन केले जाणार आहे. त्याचाच एक भाग म्हणून 'अयोध्या में शंखनाद, आ रहे है एकनाथ' या बॅनरखाली अयोध्या दौऱ्याचा प्रचार सुरू केला आहे. या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिकमधून यंदाही स्वतंत्र रेल्वेगाडी करण्यात आली आहे. त्याद्वारे नाशिकमधून तीन हजार कार्यकतें महाआरतीमध्ये सहभागी होणार असल्याचा दावा करण्यात येत आहे.