Telegram Crime : सायबर चोरट्यांचा हायटेक फ्रॉड, टेलिग्रामवर टास्क देऊन लुटलं जातंय, काय आहे टास्क सायबर फ्रॉड?
Telegram Crime : नाशिकमध्ये सातत्याने सायबर गुन्ह्यांचे नव नवीन प्रकार समोर येत असून टास्क सायबर फ्रॉड (Cyber Fraud) हा नवा ट्रेंड आला आहे.
Nashik Cyber Crime : सायबर गुन्ह्यांचे (Cyber Crime) मोठे आव्हान महाराष्ट्र पोलिसांसमोर आहे, हे आव्हान पेलण्यासाठी आपलं दल सज्ज असणार असून देशातील सगळ्यात मोठा सायबर प्लॅटफॉर्म महाराष्ट्रात तयार करण्यात येत असल्याचं नुकतंच गृहमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी नाशिकमध्ये म्हटलं. मात्र सायबर गुन्ह्यांचं आव्हान नक्की किती मोठं आहे, हे सांगण्यासाठी नाशिकमध्येच समोर येणारे सायबर गुन्ह्यांचे नव नवीन प्रकार पुरेसे असून टास्क सायबर फ्रॉड (Cyber Fraud) हा सध्या एक नवा ट्रेंड महाराष्ट्र सायबर पोलिसांसाठी डोकेदुखी ठरतो आहे.
सेक्स एक्सटॉर्शन.. लिंक बेस्ड फ्रॉड.. आणि त्यानंतर आता टास्क सायबर फ्रॉड.. (Task Cyber Fraud) सध्या हा फ्रॉड ट्रेंडिंगला असून महाराष्ट्र सायबर (Maharashtra Cyber Police) पोलिसांसाठी मोठ्या प्रमाणावर डोकेदुखी ठरत आहे. आता तुम्ही म्हणाल की हे टास्क सायबर फ्रॉड म्हणजे नक्की आहे तरी काय? तर बघा.. टास्क सायबर फ्रॉड ही एक सायबर गुन्हेगारांनी नागरिकांना आपल्या जाळ्यात ओढण्यासाठी लढवलेली एक नवी आणि अनोखी शक्कल आहे आणि यासाठी वापर केला जातोय टेलिग्रामचा.. तुम्हाला घरबसल्या पैसे कमवण्याची मोठी संधी आहे, किंवा कमी वेळात अधिक नफा मिळवा असे मेसेजेस टेलिग्रामवर अनोळखी नंबरवरुन प्राप्त होतात, त्या मेसेजला रिप्लाय देताच कंपनीची पूर्ण प्रोफाईल सांगितली जाऊन आम्ही विदेशी कंपन्यांसोबत जोडले गेलेलो आहोत.
तसेच आजपर्यंत किती लोकांनी असे पैसे कमवले आहेत. त्याची माहिती दिली जाऊन नागरिकांचा विश्वास संपादन केला जातो. त्यानंतर आपण काम करण्याची तयारी दर्शवताच त्यांच्याकडून एक टास्क म्हणजेच काम दिले जाते आणि काम करण्यास सुरुवात करताच आपण सायबर गुन्हेगारांच्या जाळ्यात अडकतो. नाशिकच्या (Nashik) एका आयटी कंपनीत काम करणाऱ्या महिलेला अशाच प्रकारे 5 लाख रुपयांना ऑनलाईन गंडा घालण्यात आला आहे. त्यासाठी त्यांना हॉटेल बुकिंगचा एक टास्क दिला गेला होता..
अशी झाली टेलिग्रामवर फसवणूक!
फसवणूक झालेली महिला म्हणाली, टेलिग्रामवर (Telegram) आलेल्या मेसेजवर मी विश्वास ठेवला होता. मला हॉटेल बुकिंगचा एक टास्क दिला होता, फॉरेनमधील पण काही हॉटेल होते. रिझर्वेशन करण्यासाठी 30 सेट दिले होते. सुरुवातीला मला फोन पे वरुन कमिशन भेटले. त्यानंतर पुढे त्यांनी मला गुंतवणूक करण्यास सांगितली, बोनस पॅकेज मिळेल असे सांगत मी पैसे भरल्यावर एक दिवसात बोनससह रक्कम मिळायची, असे मी 5 लाख भरले. मला करंट अकाऊंट नंबर दिले जायचे आणि त्यावर 10 मिनिटाच्या आत पैसे ट्रान्सफर करण्यास सांगितले जायचे. 10 मिनिटानंतर लगेच दुसरा अकाऊंट नंबर द्यायचे. त्यांच्या टेलिग्राम गृपमध्ये हजारो असे मेंबर होते की जे असे टास्क करत पैसे कमवत असल्याचे दिसायचे. ते फक्त टेलिग्रामवरुन चॅटिंग करत बोलायचे, कॉल लागायचा नाही. मी फसले ईतर कोणी फसू नका, पैसे गोळा करत मी भरले होते, टेलिग्राम किंवा इतर अॅपवर सरकारचे नियंत्रण हवे."
संबंधित महिलेने एक आठवडा टास्कवर काम तर केले, मात्र 5 लाख रुपये आपण भरल्यानंतर बोनस येत नसून आणखी पैशांची मागणी होत असल्याचं बघताच आपली फसवणूक झाल्याचं लक्षात येताच तिने थेट नाशिक सायबर पोलीस ठाणे गाठलं आणि तक्रार दाखल केली, विशेष म्हणजे ईथे येताच महिनाभरातच असे 5 गुन्हे दाखल झाल्याचं समजताच तिला धक्काच बसला. सध्या हा फ्रॉड ट्रेंडिंग आहे, अनेक टास्क दिले जाऊन नागरिकांना त्यात अडकवले जाते. सुरुवातीला पैसे मिळत असल्याने नागरिकांचा विश्वास बळावतो पण नंतर पैसे येणे बंद होतात तर अनेक जण वयक्तिक माहिती देतात त्यामुळे त्यांच्या अकाऊंटमधूनही गायब होतात. काहींना तर फक्त व्हर्च्युअली पैसे तुमच्या खात्यात जमा झाल्याचे दाखवले जाते. अधिक तपास सुरु आहे. नागरिकांनी काळजी घेणं गरजेचं असल्याचे सायबर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रियाज शेख म्हणाले.
काय आहे सायबर फ्रॉड?
टेलिग्रामवरुन कधी यू ट्यूब व्हिडीओ (Youtube Video) लाईक करण्याचा टास्क दिला जातो, तर कधी नागरिकांना सोपे वाटेल असे काम दिले जाते आणि त्या माध्यमातून नागरिकांची ऑनलाईन फसवणूक केली जाते. महिनाभरातच एकट्या नाशिक शहरात असे 5 गुन्हे दाखल झाले असून अशाप्रकारे हजारो नागरिक या नव्या फ्रॉडला बळी पडत असल्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे टास्क सायबर फ्रॉड हा टेलिग्रामच्या माध्यमातून होत असल्याने टेलिग्रामचा वापर कितपत सुरक्षित आहे? यांसारख्या अॅप्सवर सरकारी यंत्रणेचे नियंत्रण नाही का? असा प्रश्न फसवणूक झालेले तक्रारदार उपस्थित करत असतानाच दुसरीकडे सायबर आणि आर्थिक गुन्ह्यांचे मोठे आव्हान महाराष्ट्र पोलिसांसमोर आहे, हे आव्हान पेलण्यासाठी आपलं दल सज्ज असणार असून देशातील सगळ्यात मोठा सायबर प्लॅटफॉर्म महाराष्ट्रात तयार करण्यात येत असल्याचं नुकतंच गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नाशिकमध्ये म्हटलं आहे.
लवकरच सायबर प्लॅटफॉर्म
काही दिवसांपूर्वी देवेंद्र फडणवीस नाशिक म्हणाले होते की, गृहमंत्री विशेष ट्रेनिंग देतो आहे, ते आव्हान पेलण्यासाठी आपलं दल सज्ज असेल. देशातील सगळ्यात मोठा सायबर प्लॅटफॉर्म महाराष्ट्रात तयार करतो आहे. ज्यात सोशल मीडिया, बँकिंग सेकटर, आर्थिक व्यवहार करणाऱ्या फायनान्स इन्स्टिट्यूट अशा सगळ्यांना एका प्लॅटफॉर्मवर आणण्याचा प्रयत्न आहे जेणेकरून रिस्पॉन्स टाईम फास्ट असेल आणि आपल्याला सायबर आणि आर्थिक गुन्हेगारी मोडून काढता येईल. मात्र दुसरीकडे नाशिकमध्ये मोठ्या प्रमाणावर सायबर क्राईमच्या घटना समोर येत असल्याने चिंता व्यक्त केली जात आहे.
वैयक्तिक माहिती शेअर करु नका
तुमचे डेबिट-क्रेडिट कार्ड डिटेल्स, ओटीपी आणि इतर वैयक्तिक माहिती खात्री केल्याशिवाय कोणालाही शेअर करु नका असं आवाहन वारंवार सायबर पोलिसांकडून नागरिकांना केलं जातं. मात्र तरी देखील नागरिक याला गांभीर्याने घेत नसल्याचं बघायला मिळतं. सायबर गुन्हेगार अशाप्रकारे काहींना काही अनोखी शक्कल लढवत तसेच आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करत अगदी सहजरित्या नागरिकांना आपल्या जाळ्यात ओढत असून दुसरीकडे सायबर गुन्ह्यांची उकल होण्याचं प्रमाणही अल्प असल्याने महाराष्ट्र पोलिसांसमोर हे सायबर गुन्हे रोखण्याचं आव्हान नक्कीच मोठं आहे यात शंका नाही. यासोबतच नागरिकांनीही आपली फसवणूक होणार नाही यासाठी थोडं जागरुक राहून सावधानता बाळगणेही तेवढंच गरजेचं आहे.
इतर महत्वाच्या बातम्या :