Nashik Kazi Gadhi : इर्शाळवाडी दुर्घटनेनंतर नाशिकची काझीगढी चर्चेत, गोदाकाठावर वसलेली 'इर्शाळवाडी' धोकादायक स्थितीत!
Nashik News : नाशिक शहरातील धोकादायक स्थितीत असलेल्या काझी गढी (Kazi Gadhi) परिसर देखील चर्चेत आला आहे.
Nashik News : इर्शाळवाडी दुर्घटनेनंतर (Irshalvadi) नाशिक शहरातील धोकादायक स्थितीत असलेल्या काझी गढी (Kazi Gadhi) परिसर देखील चर्चेत आला आहे. पावसाळ्यात काझीगढी येथे भूस्खलन होऊन मोठी दुर्घटना घडण्याची भीती पाहता मनपा प्रशासन अलर्ट झाले असून तेथील शंभरहून अधिक धोकादायक घरांतील रहिवाशांना तत्काळ घरे रिकामी करावीत, अशा नोटिसा पाठवल्या आहेत.
रायगडच्या इर्शाळवाडी (Irshalvadi Landslide) दरड कोसळल्याची दुदैवी घटना काल रात्रीच्या सुमारास घडली. या घटनेने महाराष्ट्र (Maharashtra Rain) हादरला असून सोळा जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. अशातच नाशिक (Nashik) शहरातील गोदाकाठावरील काझीगढी चर्चेत आली आहे. मुळात गेल्या अनेक वर्षांपासून धोकादायक स्थितीत इथल्या नागरिकांचे वास्तव आहे. काझीगढीप्रश्नी दरवर्षी पावसाळ्यापूर्वी यंत्रणा खडबडून जागी होते, आता इर्शाळ वाडीच्या घटनेमुळे पुन्हा काझी गढीचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. त्यानुसार पालकमंत्री दादा भुसे यांनी देखील प्रशासनाला प्रत्यक्ष पाहणीच्या सूचना करत रहिवाशांचे स्थलांतर करण्याच्या आदेश दिले आहेत.
काझी गढीच्या जागेवर जाऊन पाहणी करावी, अशा सूचना पालकमंत्री दादा भुसे (Dada Bhuse) यांनी जिल्हा प्रशासनाला दिल्या आहेत. नाशिक शहरातील अमरधाम परिसरात असलेली काझी गढी गेल्या अनेक वर्षांपासून धोकादायक स्थितीत आहे. गोदाकाठालगत शंभर फूट उंचीवर असलेल्या या गढीचा ढिगारा दरवर्षी ढासळतो. त्यामुळे दर पावसाळ्यात उपपयोजना करण्यावर महापालिका प्रशासन भर देत असते. मात्र नंतरच्या काळात पुन्हा जैसे थे परिस्थिती असते. त्यामुळे गढीच्या संरक्षक भिंतीसह इतर उपाययोजना तातडीने करण्याची गरज आहे. सरकारी उदासीनतेत काझीगढीवरील रहिवाशांचा बळी जाण्याची भीती आहे. यासंदर्भात अनेकदा बैठका घेत उपायोजना संदर्भात सूचना दिल्या आहेत. मात्र आजही या परिसरात नागरिक वास्तव करत आहेत. येथील शंभर घरांना नोटिसा देण्यात आल्या असून महापालिका कर्मचाऱ्यांना संबंधित ठिकाणी पाहणी करण्याच्या सूचना प्रशासनाकडून देण्यात आलेल्या आहेत.
धोकादायक वाड्यानाही नोटिसा
इर्शाळवाडी दुर्घटनेनंतर महापालिकेने शहरातील धोकादायक वाडे, इमारतींसह काझी गढीवरील रहिवाशांना नोटिसा बजावण्यात सुरुवात केली आहे. शहरातील धोकादायक 1192 वाडे व इमारतीत रहिवास करणाऱ्या नागरिकांनी स्थलांतर करावे, असे आवाहन महापालिकेकडून करण्यात आले आहे. नाशिक महापालिकेकडून दरवर्षी पावसाळ्यात शहरातील धोकेदायक इमारती घरे व मोडकळीस आलेल्या जुन्या वाड्यांना नोटीसा देण्याचे सोपस्कार पार पाडले जातात. मात्र गंभीर घटना होईपर्यंत या इमारतीतील रहिवाशांना स्थलांतरित करण्यासाठी प्रयत्नच होत नाहीत, असे सांगितले जात आहे.
इतर महत्वाच्या बातम्या :
What Happened In Irshalwadi Specail Report : एक होती इर्शाळवाडी... इर्शाळवाडीत नेमकं काय झालं?