Nashik Crime : 'ऑक्सिटोसीन'ची अवैधरित्या विक्री, गायी, म्हशींचे दूध वाढविण्यासाठी वापर, मालेगाव पोलिसांची कारवाई
Nashik Crime : 'गायी, म्हशींचे दुध वाढावे, म्हणून 'ऑक्सिटोसीन'ची अवैधरित्या विक्री होत असल्याचे मालेगाव शहरात समोर आले आहे.
Nashik Crime : दुधात भेसळ (Adulteration in milk) होत असल्याच्या अनेक घटना सातत्याने उघडकीस येत असताना मालेगावमधून (Malegaon) धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. गायी, म्हशींचे दूध जास्त वाढावे, यासाठी 'ऑक्सिटोसीन' नावाचे औषध अवैधरित्या विक्री होत असल्याचे समोर आले आहे. या प्रकरणी एका संशयिताला मालेगाव पोलिसांनी (Malegaon Police) ताब्यात घेतले आहे.
मालेगाव शहरातील (Malegaon) हिरापुरा भागात पोलिसांनी छापा टाकत मोहम्मद इकबाल या व्यक्तीला ताब्यात घेत त्याच्या कडून 1 हजार ऑक्सिटोसीन (Oxytocin) औषधी बाटल्या जप्त करण्यात आल्या आहेत. या औषधाच्या बाटल्याचा वापर जनावरांचे दूध वाढविण्यासाठी केला जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाल्या आहेत. पोलिसांनी छापा टाकत सर्व मुद्देमाल जप्त केला आहे. या औषधाचा वापर अन्य वैद्यकिय कामासाठी देखील होत असतो. मात्र जनावरांचे दूध वाढावे यासाठी या औषधांचा सर्रास वापर होत असल्याने त्याचा अवैधरित्या साठा करुन ते मालेगावमध्ये वितरीत होत असल्याच समोर आल्याने पोलिसांनी कारवाई केली आहे.
मालेगाव शहरातील किल्ला पोलीस ठाण्याचे प्रभारी ठाणे अंमलदार गौतम तायडे यांना मिळालेल्या गुप्त माहितीवरून त्यांनी पोलीस कर्मचारी पंकज भोये, सचिन भामरे, निलेश निकाळे यांच्या पथकाने मंगळवारी दुपारी दोनच्या सुमारास हिरापुरा भागातील मोकळ्या मैदानाच्या बाजूला असलेल्या पत्र्याच्या खोलीवर छापा टाकला. यावेळी मोहम्मद अन्वर मोहम्मद इकबाल हा विना रंगाच्या ऑक्सिटोसीन औषधाच्या बाटल्या विक्री करताना आढळून आला. पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन त्याच्या जवळून 60 हजार च्या प्रत्येकी 100 ml च्या पाच खोक्यांमध्ये ठेवलेल्या 1000 प्लास्टिकच्या बाटल्या जप्त केल्या. या प्रकरणी अन्न व औषध प्रशासन विभागाच्या औषध निरीक्षक प्रशांत विठ्ठल ब्राह्मणकर यांनी संशयितांविरुद्ध किल्ला पोलिसांत तक्रार दिली.
ऑक्सिटोसिन हे औषध हार्मोन असून....
दरम्यान ऑक्सिटोसिन हे औषध हार्मोन असून त्याचा वापर सुरळीत प्रसुतीसाठी करण्यात येतो, त्याच्या विक्रीसाठी वैद्यकीय अधिकाऱ्यांचे प्रिस्क्रिप्शन तसेच रजिस्टर फार्मसिस्ट सेवा आवश्यक असते. मात्र या औषधाचा उपयोग गाई, म्हशीचे दूध बनवण्यासाठी अवैधपणे केला जातो. या औषधाच्या साहाय्याने मिळणारे दूध मानवी आरोग्यास हानिकारक असल्याचे सांगण्यात येत आहे. संशयित अन्वर याच्याकडे कोणतेही औषध व सौंदर्यप्रसाधने कायद्यांतर्गत परवाना नसताना अवैधपणे विक्री व वितरणासाठी या औषधाची साठवण करत होता. याप्रकरणी उपनिरीक्षक एमपी महाजन तपास करत आहेत.