Nashik Rain : इगतपुरीचा भावली डॅम ओव्हरफ्लो, गंगापूर धरण 59 टक्के तर 16 धरणे अद्यापही 50 टक्क्यांच्या खाली
Nashik Igatpuri : एकीकडे इगतपुरी तालुक्यात पाऊस (Heavy Rain) सुरु असल्याने भावली डॅम ओसंडून वाहू लागला आहे.
Nashik Igatpuri : इगतपुरीसह (Igatpuri) त्र्यंबकेश्वर, पेठ, सुरगाणा (Surgana) आदी तालुक्यात पावसाची रिपरिप सुरु आहे. मात्र नाशिक शहरासह येवला, निफाड भागात अद्यापही दमदार पावसाची प्रतीक्षा कायम आहे. एकीकडे इगतपुरी तालुक्यात पाऊस (Heavy Rain) सुरु असल्याने भावली डॅम ओसंडून वाहू लागला आहे. भावली धरण शंभर टक्के भरले असून 382 क्युसेकने विसर्ग सुरु करण्यात आला आहे. यंदा मात्र नऊ दिवस उशिराने भावली धरण भरल्याचे सांगितले जात आहे.
नाशिकसह जिल्ह्याला अद्यापही दमदार पावसाची प्रतीक्षा (Nashik Rain) असून आज सकाळपासून तर ढगाळ वातावरण देखील गायब झाले आहे. अशातच इगतपुरी तालुक्यातील पश्चिम पट्ट्यात काही दिवसांपासून मुसळधारेसह संततधार सुरू असल्याने भावली धरण (Bhavli dam) क्षेत्रात झपाट्याने वाढ झाली आहे, तर भावली, भाम, वाकी नद्या प्रवाहित झाल्याने दारणा धरणातही मोठ्या प्रमाणात जलसाठा उपलब्ध झाला आहे. आजमितीस भावली धरण ओव्हरफ्लो झाले असून, भावली धरणातून आजपासून 382 क्युसेकने विसर्ग (Water Discharged) सुरू करण्यात येत आहे. त्यामुळे दारणा धरणाच्या जलसाठ्यात कमालीची वाढ दिसत आहे. दारणा धरणही 78 टक्के भरले असल्याने धरणातून 3584 क्युसेकने विसर्ग सुरु करण्यात आला आहे.
नाशिक जिल्ह्यात अद्यापही दमदार पाऊस नसला तरी घाटमाथ्यावर व इगतपुरी परिसरात पावसाचे सातत्य असल्याने पश्चिम भागातील धरणे, नद्या यांच्या साठ्यात कमालीची वाढ झाली आहे. इगतपुरी परिसरातील धरणे वगळता नाशिक परिसरातील धरणांना अद्यापही पावसाची आवश्यकता आहे. सद्यस्थितीत त्र्यंबकेश्वर (Trimbakeshwer) भागात पावसाची रिपरिप सुरु असल्याने गंगापूर धरणसाठ्यात (Gangapur Dam) हळूहळू वाढ होत आहे. आजमितीस गंगापूर धरणात 59 टक्के जलसाठा आहे. तर नाशिकच्या 24 धरणांपैकी 16 धरणामध्ये अद्याप 50 टक्के जलसाठा सुद्धा होऊ शकलेला नाही. त्यामुळे चिंता व्यक्त केली जात आहे. दुसरीकडे इगतपुरी तालुक्यात पाऊस बरा असल्याने भावलीसह इतर धरणे भरली आहेत. यात भावली 100 टक्के, दारणा धरणात 78 टक्के जलसाठा झाल्याने विसर्ग सुरु करण्यात आला आहे. या धरणात जसजसा साठा वाढेल तसतसा विसर्गाचे प्रमाण वाढविले जाणार आहे.
धरणातील आजचा जलसाठा
गंगापूर 59 टक्के, कश्यपी 33 टक्के, पालखेड 43, ओझरखेड 26, दारणा 78 टक्के, मुकणे 57 टक्के, भावली 100 टक्के, नांदूरमध्यमेश्वर 07 टक्के, चणकापूर 46, हरणबारी 69 टक्के भरले आहे. तर नांदुरमध्यमेश्वर धरणातून 5576 क्युसेकने विसर्ग करण्यात येत आहे.
ईतर संबंधित बातम्या :