Nashik Smart City : स्मार्ट सिटी विरोधात नाशिककरांचा एल्गार, गोदाकाठच्या मंदिरांना वाहिली श्रद्धांजली
Nashik Smart City : नाशिककरांनी सत्याग्रह आंदोलन छेडत वारसास्थळांना श्रद्धांजली वाहत स्मार्ट सिटीचा निषेध केला आहे.
Nashik Smart City : नाशिक (Nashik) शहरात स्मार्ट सिटीच्या माध्यमातून दोन वर्षांपासून सुरु असलेल्या कामांबाबत नाशिककरांनी तीव्र नाराजी आहे. आज गोदाकाठावर 9Godavari) नाशिककरांनी एकत्र येत सत्याग्रह आंदोलन छेडत नाशिकच्या वारसास्थळांना श्रद्धांजली वाहत स्मार्ट सिटीचा निषेध केला आहे.
नाशिक महानगरपालिका (Nashik NMC) स्मार्ट सिटीच्या (Smart City) वतीने शहरात विविध कामे केली जात आहे. दोन वर्षांपासून स्मार्ट सिटीचे काम सुरु असल्याने अनेक भागातील रस्ते खाेदले आहेत. यामुळे नागरिकांच्या वाहतुकीसाठी त्रास सहन करावा लागत आहे. तर दुसरीकडे स्मार्ट सिटीच्या माध्यमातून गाेदावरीच्या घाट परसिरात सुशाेभीकरण सुरु आहे. या ठिकाणी पुरातन पायऱ्या तोडण्यात येऊन फरशा बसविल्या जात आहेत. मात्र या कामासाठी पुरातत्व विभागाची परवानगीच घेतली नसल्याचे समोर आले आहे. सुशोभीकरणाच्या नावाखाली गाेदेचा इतिहासच पुसण्याचे काम केले जात असल्याचा आरोप नाशिककरांनी केला आहे.
या पार्श्वभूमीवर आज नाशिककरांनी गोदाकाठावर एकत्र येत सत्याग्रह आंदोलन छेडले. नाशिक स्मार्ट सिटी कंपनीकडून गोदाकाठावर पुरातन फरशा काढून नवीन फरशा बसविण्याचे काम सुरु आहे. अशातच या कामादरम्यान सांडव्यावरचा सप्तश्रुंगी देवीचा सांडवा तोडण्यात आला. गणपतीची मूर्तीसह छोटी मंदिरे भग्न केली. गोदा पात्रातील सुस्थितीत असलेल्या ६५० वर्ष जुन्या पायऱ्या तोडल्या. सदरहू वारसा स्थळे पुनः बांधणीचे आश्वासन देऊन वर्ष उलटून गेले तरी सुद्धा स्मार्ट सिटी कंपनी जिर्णोद्धाराचे काम करत नसल्याचा आरोप नाशिककरांनी केला. यासाठी स्मर सिटीच्या कामांना विरोध दर्शवण्यासाठी आज नाशिककर रस्त्यावर उतरले. यावेळी गोदाकाठावरील वारसा स्थळांना श्रध्दांजली अर्पण करण्यात आली.
गोदा घाटावर सुशोभीकरणाच्या सुरू असलेल्या कामांमुळे छोट्या मंदिरांना तडे जात असल्याचे समोर आले आहे. शिवाय देवांच्या मूर्ती भग्न होत आहेत. यासाठी पुरातत्व विभागाची परवानगी न घेता सुरू असलेली कामे थांबवा अशी मागणी नाशिककर करत आहेत. अनेक महिन्यांपासून स्मार्ट सिटीची काम नाशिकच्या गोदा घाटावर सुरू आहेत. त्यामध्ये प्रामुख्याने गोदा घाट सुशोभीकरण हे महत्त्वाचं काम हाती घेण्यात आले आहे. गोदाकाठावरील जुने बांधकाम तोडून तिथे नवीन बांधकाम उभं केलं जातं आहे. पुरातन पायऱ्या काढण्याचे काम केले जात आहे. मात्र हे काम सुरु असताना परिसरातील इतर मंदिरांना तडे जात असल्याचे दिसून येत आहे. अनेक गोदाकाठावरची छोटी मोठी मंदिर होती,काही त्या मंदिरांना हादरे बसलेले आहेत.
पुरातत्व विभागाची परवानगीच नाही...
गोदा घाटावरील नीलकंठेश्वर महादेव मंदिर पुरातन विभागाने संरक्षित वारसा स्थळ म्हणून घोषित केले आहे. या मंदिराच्या तीनशे मीटर परिघात बांधकाम करण्यासाठी मनाई करण्यात आले आहे. असे असताना स्मार्ट सिटी ने मंदिर परिसरात दगडी फरशा काढून बांधकाम सुरू केले आहे. येथील अनेक मंदिरे ही नॅशनल मोनुमेंट्स म्हणून सुरक्षित आहेत. या मंदिराच्या तीनशे मीटरच्या रेडियसमध्ये कुठल्याही प्रकारची कन्स्ट्रक्शन ऍक्टिव्हिटीज आपल्याला करता येत नाही. मात्र पुरातत्त्व विभागाची परवानगीची आवश्यकता असताना स्मार्ट सिटी अशी कोणतीही परवानगी पुरातत्त्व विभागाची घेतली नाही असे खुद्द पुरातत्त्व खात्याने पत्र व्यवहार करतेवेळी पत्रात उल्लेख केला आहे.