(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Nashik Ganeshotsav : नाशिकची गणेश विसर्जन मिरवणूक ऐन रंगात, बाप्पाच्या निरोपासाठी पाऊसही बरसला!
Nashik Ganeshotsav : नाशिकमध्ये (Nashik) गणेश विसर्जन (Ganesh Immersion) मिरवणुकीवर पावसाचं सावट होतं. अखेर सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास पावसाने (Rain) हजेरी लावली.
Nashik Ganeshotsav : नाशिकमध्ये (Nashik) सकाळी 11 वाजेपासून सुरू असलेली गणेश विसर्जन (Ganesh Immersion) मिरवणूक अद्यापही सुरूच असून या मिरवणुकीवर पावसाचं सावट होतं. अखेर सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास पावसाने हजेरी लावली, मात्र काही वेळातच पावसाने ब्रेक घेतल्याने पुन्हा मिरवणूक उत्साहात सुरु झाली.
नाशिकमध्ये अत्यंत उत्साहाच्या वातावरणात सर्वत्र गणेश विसर्जन मिरवणुकीला उधान आले आहे ढोल ताशांच्या निराळात वातावरण अगदी चैतन्यमय झाले असून लाडक्या गणपती बाप्पांना निरोप देण्यासाठी अख्ख नाशिक एकवटल आहे. दरम्यान ज्या थाटात गणपती बाप्पांचे स्वागत झालं, त्याच थाटात गणपती बाप्पांना निरोप देखील देण्यात येत आहे. आत्तापर्यंत नाशिकच्या मिरवणुकीत 11 मंडळ ही विसर्जनासाठी मार्गस्थ झाले आहेत. दरम्यान बाप्पांना निरोप देण्यासाठी पावसात देखील हजेरी लावल्याचे दिसून आले. नाशिकमध्ये मिरवणुकी दरम्यान काही काळ पावसाचा शिडकावा झाल्यानंतर मिरवणुकीत व्यत्यय आला खरा मात्र यावेळी नाशिककरांसह सार्वजनिक गणेश मंडळाच्या कार्यकर्त्यांनी देखील पावसाचा उत्साहात स्वागत केलं आणि तेवढ्यात उत्साहात ढोल वादनही यावेळी पाहायला मिळालं.
दरम्यान पाऊस आल्यानंतर मिरवणूक थांबणार की काय? असा प्रश्न असतानाच पावसाने मात्र ब्रेक घेत सर्वांना दिलासा दिला. आणि पुन्हा एकदा उत्साहात मिरवणुकीला सुरुवात झाली. गेल्या दोन-तीन दिवसांपासून जिल्हाभरात पावसाने दमदार फायरिंग केली आहे. आणि आज गणेश विसर्जनाच्या दिवशी देखील पावसाची शक्यता वर्तवण्यात आली होती. त्यानुसार सायंकाळी पाच वारीच्या सुमारास ढगाळ वातावरण होऊन काही वेळ पावसाने मिरवणुकीवर बरसात केली. यावेळी पावसात धुंद होत नाशिककरांनी मिरवणुकीचा आनंद घेतला.
नाशिकमध्ये कालही दमदार पाऊस
दरम्यान नाशिक सह जिल्ह्यातील काही भागात काल देखील पावसाने तुफान बॅटिंग केल्याचे पाहायला मिळाले. मुसळधार पावसामुळे शहरातील ठिकाणी पाणी साचून सर्वत्र पाण्याचा साम्राज्य निर्माण झालं होतं. त्यामुळे अनेक भागात वाहतुकीची कोंडी देखील बघायला मिळाली, तर सराफ बाजार, फुल बाजार आदी भागात पाणी साचल्याने पुन्हा एकदा वाहतूक कोंडीला सामोरे जावे लागले, द्वारका, मखमलाबाद लिंक रोड, गोविंद नगर, मुंबई नाका या भागांमध्ये मोठ्या प्रमाणात वाहत कोंडी झाली होती. तर द्वारका ते मुंबई नाका या उड्डाणपुलावर देखील पाण्याचा पाट वाहताना दिसून आला. रस्त्यातून वाट काढत वाहनधारकांनी घर गाठले. यामुळे गणेशोत्सवाचा शेवटचा दिवस असून देखील नाशिककरांना मात्र घराबाहेर पडता आले नाही, मात्र आज विसर्जनाच्या दिवशी नाशिककर रस्त्यावर आले असून सर्वत्र उत्साहाचे वातावरण पाहायला मिळत आहे.