Nashik Crime : नाशिकमध्ये खुनाची मालिका सुरूच, भंगार गोळा करणाऱ्या सतरा वर्षीय युवकाचा खून
Nashik Crime : नाशिकमध्ये (Nashik) खुनाची (Murder) मालिका सुरूच असून भंगार गोळा करणाऱ्या सतरा वर्षीय युवकाचा खून झाल्याची खळबळजनक घटना घडली आहे.
Nashik Crime : नाशिकमध्ये (Nashik) खुनाच्या घटनांना ऊत आला आहे. एक घटना घडली कि दुसरी, अशा एकामागोमाग एक खुनाच्या (Murder) घटना उघडकीस येत आहेत. जिल्ह्यातील वडनेर भैरव येथील भंगार गोळा करणाऱ्या सतरा वर्षीय युवकाचा अज्ञात इसमाने खून केल्याची खळबळजनक घटना घडली आहे.
चांदवड तालुक्यातील (Chandwad) वडनेर भैरव या गावात ही घटना उघडकीस आली आहे. वडनेर भैरव येथील राजेश राधेश्याम गुप्ता याने या घटनेबाबत पोलिसांत फिर्याद दाखल केली आहे. सदर फिर्यादीनुसार राजेश गुप्ता यांचे वडनेरभैरव येथे भंगार व्यवसाय आहे. या दुकानात सुरज तीलक प्रजापती (17) हा कामाला होता. सुरज हा सकाळी येऊन भंगार गोळा करण्यास जात असे. आज नेहमीप्रमाणे भंगार गोळा करण्यास गेला असता सुरज यास गावात अज्ञात व्यक्ती भेटला. त्या व्यक्तीने सुरज यास 'तुला जास्त भंगार मिळवून देतो' असे सांगून सोबत घेऊन गेला.
दरम्यान गावापासून काही अंतरावर असलेल्या पिंपळणारे परिसरातील जांबुटके धरणाजवळ नेले. या ठिकाणी सदर व्यक्तीने सुरज याच्या डोक्यात दगडाने मारहाण केली. मारहाणीत सुरज हा जागीच ठार झाला. दरम्यान सुरज हा बराच वेळ झाला तरी पिंपळगावला परतला नाही, म्हणून त्याचा मालक राजेश गुप्ता यांनी चौकशी केली असता त्याला सुरज याचा खून झाल्याचे कळले. त्यानंतर गुप्ता यांनी वडनेर भैरव पोलिस ठाणे गाठून फिर्याद दिली. त्यानंतर अज्ञात व्यक्तीविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नाशिकला झालंय काय?
नाशिकला झालंय काय? असा प्रश्न सध्या उपस्थित होतो आहे. एकीकडे स्मार्ट शहर म्हणून ओळख असताना अलीकडच्या खुनाच्या घटना पाहता 'खुनी शहर' होतंय कि काय? असाही सवाल उपस्थित झाला आहे. गुन्हेगारी थोपवण्यासाठी नाशिक पोलीस या ना त्या मार्गाने गुन्ह्यांचा छडा लावत असताना एक गुन्हा मिटत नाही तोच दुसरी घटना घडत असल्याने नाशिक पोलीस देखील हैराण झाले आहेत.