Nashik Child Trafficking : आधार कार्ड, रेल्वेचे आरक्षण तिकीटही दाखवलं, मग बाल तस्करीचं प्रकरण कस? पालकांचा सवाल
Nashik Child Trafficking : नाशिकच्या बाल तस्करी (Trafficking) प्रकरणातील मुलांना बिहारमध्ये पाठविण्याच्या हालचाली सुरु झाल्या आहेत.
Nashik Child Trafficking : एकीकडे आईबापांनी आपल्या पोराना शिक्षणासाठी (Education) लाखो किलोमीटर दूर पाठवले, अशातच नाशिकच्या भुसावळ, मनमाड परिसरात या मुलांना रेल्वे पोलिसांकडून ताब्यात घेतले जाते. पोलिसांनी सोबत असलेल्या व्यक्तीवर गुन्हे दाखल करून बाल तस्करीचे (Child Trafficking) प्रकरण असल्याचे सांगण्यात आले. मात्र या सगळ्यात आतापर्यंत बालकांसह पालकांची ससेहोलपट झाल्याचे चित्र पाहायला मिळाले. अद्यापही मुलांचा ताबा न मिळाल्याने हताश झालेले पालक पुन्हा जिल्हाधिकाऱ्यांच्या (Nashik Collector) दरबारी निवेदन देऊन आले.
गेल्या पंधरा दिवसांपासून बाल तस्करीच्या (Trafficking) प्रकरणाचा तिढा सुटता सुटत नसल्याचे चित्र आहे. रेल्वेने प्रवास करणाऱ्या 59 बालकांना भुसावळ रेल्वे स्थानकावर आणि मनमाड रेल्वे स्थानकावर ताब्यात घेण्यात आले. यानंतर मानवी तस्करीचे प्रकरण म्हणून राज्यभरात गाजलं. या मानवी तस्करी प्रकरणात भुसावळ रेल्वे पोलिसांनी (Bhusawal Railway Police) 29 मुलांना बाल निरीक्षण गृहात ठेवले होते. तर नाशिकच्या बाल सुधारगृहात 30 बालकांना ठेवण्यात आले आहे. अशातच बालकांना नेण्यासाठी बिहारहून त्यांचे पालक काही दिवसांपूर्वी नाशिकला पोहचले आहेत. आतापर्यंत अनेक घडामोडी घडल्यानंतर मुलांना बिहार राज्यात पाठविण्याच्या हालचाली सुरु झाल्या आहेत.
नाशिक जिल्हा बाल कल्याण (Nashik Bal Kalyan) समितीकडून संबंधित पालकांना बिहारला माघारी जाण्यास सांगितले आहे. बालकांना रेल्वेद्वारे पाठविण्यात येणार असून तह पालकांच्या ताब्यात दिले जाणार नसल्याचे समितीचे म्हणणे आहे. मात्र दुसरीकडे पालक मुलांना घेऊन जाण्यावर ठाम आहेत. बाल कल्याण समितीच्या माध्यमातून कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करण्यात आली आहे. येथून बालके रेल्वेने बिहारला पाठविण्यात येतील , त्यांनतर स्थानिक बाल कल्याण समितीच्या माध्यमातून ओळख परेड करून पालकांच्या हाती सुपूर्द करणार आहेत.
आधार कार्ड, रेल्वेचे आरक्षण तिकीटही दाखविले....
मात्र दुसरीकडे सगळं प्रकरण जेव्हा पालकांना माहित झाले. त्यावेळी अनेक पालकांनी नाशिकसह जळगाव गाठले. त्यावेळी पालकांनी संबंधित समितीला मुलांचे आधार कार्ड, ओळखपत्र, त्याचबरोबर रेल्वेचे आरक्षण तिकीटही दाखवले, मात्र अद्यापही मुलांचा ताबा पालकांकडे दिला जात नसल्याचे पालकांचे म्हणणे आहे. त्याचबरोबर संबंधित बालकांना ज्या बाल सुधारगृहात ठेवण्यात आले आहे, त्या ठिकाणी गुन्हे करून आलेले अल्पवयीन संशयित बालके असल्याने या मुलांवर त्याचा परिणाम होत असल्याचे देखील पालकांनी सांगितले . अद्यापही आम्हाला भेटू दिले जात नसल्याचा आरोप पालकांनी केला आहे.
पालकांकडून पुन्हा निवेदन
मागील दहा दिवसांपासून सुमारे दहा ते बारा बिहारचे नागरिक नाशिकमध्ये दाखल झालेले आहेत. बिहारच्या रेल्वे स्थानकाद्वारे त्या सर्व मुलांचे आरक्षण तिकिटदेखील आहेत, असे पालकांनी जिल्हाधिकाऱ्यांना सांगितले. दरम्यान, आमदार हिरामण खोसकर, हिंद मुस्लीम हक सुरक्षा व विकास महासमितीचे अंजुम मकरानी, नुरी अकादमीचे हाजी वसीम पिरजादा, एजाज रजा मकरानी यांच्यासह मुलांच्य पालकांच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी गंगाथरन डी यांची भेट घेतली. सर्व 59 मुलांना तातडीने त्यांच्या पालकांकडे सोपवावेत अशी मागणी केली. या मुलांचा कुठलाही दोष नाही, किंवा ते गुन्हेगारही नाही, मग त्यांना अन्यायकारक वागणूक का दिली जात आहे? असा सवालही उपस्थित केला.