Nashik News : नाशिक जिल्ह्यात वर्षभरात फक्त 854 पुरुषांनीच केली नसबंदी, स्त्रियांचे प्रमाण 95 टक्के
Nashik News : नाशिक जिल्ह्यात स्त्री-पुरुष नसबंदी प्रक्रियेत पुरुषांचे प्रमाण कमी असल्याचे आढळून आले आहे.
Nashik News : चीनला मागे टाकत भारत लोकसंख्येच्या बाबतीत प्रथम क्रमांकावर आलेला आहे. दुसरीकडे आरोग्य प्रशासन लोकसंख्या कमी करण्यासाठी कुटुंब नियोजन सारख्या योजना राबवत असते. मात्र फारसा प्रतिसाद नसल्याचे सध्याच्या लोकसंख्यावाढीवरून दिसून येत आहे. मात्र नाशिक (Nashik) जिल्ह्यात आरोग्य प्रशासनाने कुटुंब कल्याणासाठी (Health Department) निर्धारित करुन देण्यात आलेल्या स्त्री-पुरुष नसबंदीच्या (Sterilization) उद्दिष्टांपैकी 72 टक्के यश आले आहे.
भारतातील लोकसंख्येचा (Population) झालेला स्फोट, वाढती महागाई यामुळे एकत्र कुटुंब पद्धती हळूहळू नाहीशी होत असून विभक्त कुटुंब पद्धती अस्तित्वात येत आहे. त्यामुळे कुटुंबात एक किंवा जास्तीत जास्त दोन अपत्ये असावीत असा कल कुटुंबीयांचा राहिलेला आहे. दरम्यान, कुटुंब नियोजन शस्त्रक्रियांसाठी स्त्रियांनाच पुढे केले जात असल्याचे दिसून येत असून या अनेक गैरसमजांमुळे या शस्त्रक्रिया करण्यात पुरुषांचे प्रमाण मात्र कमी असल्याचे आढळून आले आहे. दरम्यान नाशिक जिल्ह्यातील गेल्या वर्षभरात जवळपास 19 हजार 428 कुटुंबकल्याणच्या शस्त्रक्रिया करण्यात आल्या. यात केवळ 854 शस्त्रक्रिया पुरुषांच्या असून 18 हजार 574 शस्त्रक्रिया महिलांच्या आहेत. टक्केवारीनुसार पुरुष नसबंदीचे प्रमाण फक्त 4.39 टक्के तर स्त्रियांचे प्रमाण 95 टक्के आहे. त्यावरून स्रियांचा कुटुंब कल्याण नियोजनासाठी चांगला प्रतिसाद असल्याचे या आकडेवारीवरून दिसून येत आहे.
नाशिक जिल्ह्यात (Nashik District) आरोग्य विभागाला कुटुंब कल्याणासाठी निर्धारित करुन देण्यात आलेल्या स्त्री-पुरुष नसबंदीच्या उद्दिष्टांपैकी 72 टक्के यश आले आहे. नाशिक तालुक्यात सर्वाधिक 126 टक्के तर सिन्नर तालुक्यात 37 टक्के इतकेच प्रमाण आहे. शस्त्रक्रियेत महिलांचे प्रमाण नेहमीप्रमाणे पुरुषांच्या तुलनेत बरेच अधिक आहे. पुरुष नसबंदीचे प्रमाण हे महिलांच्या तुलनेत नगण्यच आहे. नाशिक तालुक्यानंतर पेठ या आदिवासी तालुक्याचा 102 टक्क्यांसह दुसरा क्रमांक लागतो. 94 टक्क्यांसह त्र्यंबकेश्वर तालुका तिसऱ्या क्रमांकावर असल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. हर्षल नेहते यांनी दिली.
दरम्यान नाशिक जिल्ह्यात मागील वर्षभरात आरोग्य प्रशासनाने जगजागृतीच्या माध्यमातून लोकांपर्यत कुटुंब नियोजन उपक्रम पोहचवला आहे. या उपक्रमाला जिल्ह्याच्या अनेक भागातून चांगला प्रतिसाद लाभत आहे. मागील वर्षाची आकडेवारी पाहिली असता नाशिक तालुका (126 टक्के), त्र्यंबकेश्वर (94), पेठ (102), देवळा (87), बागलाण (85), मालेगाव (84), कळवण (81), इगतपुरी (75), निफाड (66), चांदवड (64), दिंडोरी (64) सुरगाणा (59), येवला (52), नांदगाव (43), सिन्नर (37) इतके प्रमाण पुरुषांच्या नसबंदी शस्त्रक्रियेचे आहेत, अशी माहिती वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिली.
पुरुषांचा प्रतिसाद नाही....
दरम्यान कोणत्याही प्राथमिक आरोग्य केंद्रात मूल जन्माला घालण्याबाबत पती पत्नीला कुटुंबनियोजनाचा सल्ला आणि साधने उपलब्ध करून दिली जातात. जोडप्यांमध्ये सुरक्षित शरीर संबंध, पत्नीवर मातृत्व न लादणे आणि लैंगिक रोगापासून बचाव ही कुटुंब नियोजनाची त्रिसूत्री आहे. कुटुंब नियोजनात पुरुषाच्या शुक्रवाहिन्या नलिका कट कराव्या लागत असल्याने अशा शस्त्रक्रियेसाठी पुरुषवर्ग तयार होत नाही. उलट त्यासाठी महिलांना पुढे केले जाऊन त्यांच्यावर लॅप्रोस्कोपीने शस्त्रक्रिया अथवा गर्भाशयाच्या मुखाजवळ डायफ्रेम बसविली जाते. यासाठी नाशिक जिल्ह्यातील स्रियांचा चांगला प्रतिसाद दिसून येत आहे.