Nashik Crime : स्नॅपचॅटवरील मैत्री अल्पवयीन मुलीला महागात; नाशिकमध्ये महिनाभरात 12 विनयभंगाच्या घटना
Nashik Crime : नाशिकमध्ये एका अल्पवयीन मुलीला स्नॅप चॅटवरील मैत्री चांगलीच महागात पडली आहे.
Nashik Crime : नाशिकच्या (Nashik) देवळाली कॅम्प परिसरात एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका 14 वर्षीय शाळकरी मुलीचे आक्षेपार्ह व्हिडीओ स्नॅपचॅट आणि इन्स्टाग्रामवर व्हायरल करुन तिचा विनयभंग (Molestation) करण्यात आला आहे. देवळाली कॅम्प पोलीस ठाण्यात पॉक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
काय आहे नेमकं प्रकरण?
देवळाली कॅम्प पोलीस ठाण्याच्या (Deolali Camp) हद्दीत राहणाऱ्या एका अल्पवयीन मुलीला स्नॅपचॅटवरील (Snapchat) मैत्रीच महागात पडली आहे. या अॅपवरील अनोळखी संशयिताने मुलीचे अश्लील फोटो घेत ते इन्स्टाग्रामवर व्हायरल केले आहे. याबाबत अनोळखी संशयिताविरोधात देवळाली कॅम्प पोलीस ठाण्यात पॉक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, पीडित मुलीच्या आईने देवळाली कॅम्प पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीनुसार माझ्या मुलीने स्नॅपचॅटवर आलेली एका अनोळखी इसमाची रिक्वेस्ट शाळेतील मित्र असावा असे समजून स्वीकारली. त्यानंतर ते दोघेही चॅटिंग करु लागले होते. दरम्यान आरोपीने मुलीला धमकावून तिला स्वतःचे आक्षेपार्ह व्हिडीओ पाठवण्यास भाग पाडले आणि त्यानंतर ते व्हिडीओ स्नॅपचॅट तसेच इन्स्टाग्रामवर व्हायरल करत मुलीची बदनामी केली आहे.
देवळाली कॅम्प परिसरात राहणाऱ्या संबंधित अल्पवयीन मुलीने जानेवारी महिन्यात स्नॅपचॅट या अॅपवर अकाऊंट ओपन केले होते. त्यावर पीडित आपल्या मैत्रिणींसोबत फोटो काढून चॅटिंग करायची. त्यानंतर संशयिताने हे फोटो इन्स्टाग्राम अकाऊंटवर व्हायरल केले. ही घटना पीडित मुलीच्या लक्षात येताच तिने आपल्या पालकांना घडलेली हकीकत सांगितली. पालकांनी लागलीच देवळाली कॅम्प पोलीस ठाण्यात धाव घेत संशयित व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल केला आहे. देवळाली कॅम्प पोलीस ठाण्यात याप्रकरणी अज्ञाताविरोधात विनयभंग, बाल लैंगिक अत्याचारापासून प्रतिबंध अधिनियम आणि माहिती तंत्रज्ञान कायद्यानूसार गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास केला जातो आहे. शहरात गेल्या एकच महिन्यात पॉक्सो आणि विनयभंगाचे 12 गुन्हे दाखल झाल्याने महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
शाळा, महाविद्यालयांतील मुलामुलींच्या हातात मोबाईल
मोबाईलचा जमाना असल्याने अनेक शाळा, महाविद्यालयांतील मुलां मुलींच्या हातात मोबाईल दिसून येतात. त्यामुळे मोबाईलच्या वापरामुळे अनेक अनुचित घटना समोर येत आहेत. शाळकरी मुलींना हेरुन अनेक वाईट वृत्तीचे लोक त्यांच्या अज्ञानपणाचा फायदा घेत त्यांना एकांतात आपले आक्षेपार्ह फोटो काढून पाठवण्यास भाग पाडतात. त्याला या शाळकरी मुली अनेकदा बळी पडत असल्याचे दुर्दैवी चित्र दिसत आहे. त्यामुळे अनेकदा बदनामीला घाबरुन आत्महत्या करण्यासारख्या दुर्दैवी घटना समाजात घडत आहे. यासाठी पालकांनी आपल्या मुलांच्या हाती मोबाईल देणे टाळणे गरजेचे आहे.