Nashik News : तिघांना दिलं जीवदान! अवयव दानाचा फॉर्म भरला अन् चारच दिवसात अवयव दान करण्याची दुर्दैवी वेळ
Nashik News : धुळे (Dhule) येथील तरुणाने अवघ्या चार दिवसांपूर्वी अवयवदानाचा (Organ Donation) निर्णय घेत फॉर्म भरला.
Nashik News : प्रत्येकाला मृत्यू हा अटळ आहे, मात्र मृत्यू हा कधी, कोणाला येईल हे सांगता येणं कठीण आहे. नाशिकच्या (Nashik) एका तरुणाबाबत असाच काहीसा प्रकार घडला आहे. अवघ्या चार दिवसांपूर्वी या तरुणाने अवयवदानाचा (Organ Donation) निर्णय घेत फॉर्म भरला. मात्र चार दिवसांनंतर अपघाती मृत्यू झाल्याने या तरुणाला अवयव दान करण्याचा दुर्दैवी प्रसंग ओढवला.
धुळे (Dhule) येथील रहिवासी असलेल्या मनीष कनेर (Manish Kaner) हा 31 वर्षीय तरुणासोबत ही घटना घडली आहे. काही दिवसांपूर्वी मनिषाने अवयव दान करण्याची इच्छा बोलून दाखवली होती. त्यानुसार त्याने मृत्यूच्या चार ते पाच दिवस आधीच अवयव दानाचा फॉर्म भरला होता. अवयव दानाचा फॉर्म भरल्यानंतर डोनर कार्डही त्याच्या घरी कुरिअरने आलं आणि दुर्दैवाने चारच दिवसात अवयव दान करण्याची वेळ आली. मुंबई आग्रा महामार्गावर इगतपुरी (Igatpuri) जवळ दोन चारचाकी वाहनांचा अपघात (Accident) झाला होता. या अपघातात मनीष सनेर याच्या डोक्याला गंभीर मार लागला. त्याला नाशिकच्या एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्याची प्रकृती अत्यंत नाजूक असल्याने त्या ठिकाणाहून हलवत त्याला नाशिकमधल्या खासगी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले.
मात्र उपचारादरम्यान मनीष कोमात गेला आणि त्याचा मेंदू मृत अवस्थेकडे गेल्याचं डॉक्टरांच्या लक्षात आलं. त्यानंतर डॉक्टरांनी तातडीने सर्व प्रकारच्या तपासण्या करण्यात येऊन त्याला ब्रेन डेड घोषित केलं. तर काही दिवसांपूर्वी मनीषने अवयव दानाची इच्छा बोलून दाखविल्या नुसार मनीषच्या आई-वडिलांनी अवयव दान करण्याचा निर्णय घेतला. अवयव दानासाठी मनीषच्या कुटुंबियांसह नातेवाईकांची सहमती असल्याने अवयव दानाची प्रक्रिया सुरू करण्यात आली. शासनाच्या ZTCC या अवयवदान कमिटीला कळविण्यात आले आणि संपूर्ण कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करण्यात आली.
आई वडिलांचे दुःखाच्या क्षणी सकारात्मक पाऊल
दरम्यान भारतात अवयव दान करणाऱ्यांची संख्या कमी असून मनीष आणि त्याच्या आई-वडिलांनी घेतलेला अवयव दानाचा निर्णय हा एक समाज प्रबोधनाच्या दृष्टीने चांगलं पाऊल असल्याची भावना यावेळी डॉक्टरांनी व्यक्त केली. अवयव दानाची प्रक्रिया सुखरूपपणे पार पडल्यानंतर मनीषनी घेतलेला अवयव दानाचा निर्णय आणि त्याच्या आई-वडिलांनी अत्यंत दुःखाच्या क्षणी अवयवदानाबद्दल दाखवलेली सकारात्मकता बघता मनीषला हॉस्पिटल मधील सर्व डॉक्टर्स नर्स कर्मचाऱ्यांनी उपस्थित राहून मानवंदना दिली.
अवयवदान हेच सर्वश्रेष्ठ दान
हल्ली अनेकजण आपल्या कृतीतून अनेकांना मदत करत असतात. तुम्ही केलेली मदत एखाद्याला नवी उभारी देण्याचे करत असते. तसेच मृत्यनंतर केलेले देहदान देखील एखाद्या व्यक्तीसाठी नवे जीवन देणारे असते. किंवा तुम्ही दिलेला अवयव एका व्यक्तीचे नाही तर अनेक व्यक्तींच्या जीवनात आनंद पेरण्याचे काम करू शकतो. त्यामुळेच हल्ली अनेकजण अंत्यविधी न करता आपल्या कुटुंबियांचे नातेवाईकांचे अवयवदान करत असतात. अवयवदान हे जिवंत असताना आणि मृत्यूनंतर अशा दोन्ही वेळी करता येते. एक व्यक्ती मृत्यूनंतर अवयवदान केल्यास 8 जणांना नवे जीवन मिळते.