(Source: ECI/ABP News/ABP Majha)
नाशिकमध्ये पुन्हा आगीचा थरार, सिन्नरजवळील औषधांच्या कंपनीला भीषण आग
Marathi News Update : सिन्नर जवळील मुसळगाव औद्योगिक वसाहतीतील फार्मास्युटिकल साई टेक कंपनीला आज सायंकाळी भीषण आग लागल्याचे घटना घडली.
Nashik Latest Marathi News Update : सिन्नर जवळील मुसळगाव औद्योगिक वसाहतीतील फार्मास्युटिकल साई टेक कंपनीला आज सायंकाळी भीषण आग लागल्याचे घटना घडली. शॉर्ट सर्किटमुळे ही आगल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात येत असून आगीत कंपनीचे लाखोंचे नुकसान झाले आहे.
नाशिक जिल्ह्यात दिवसेंदिवस आगीच्या घटनांमध्ये वाढ होत असून आज सिन्नर तालुक्यातील मुसळगाव एमआयडीसी मधील साई टेक फार्मा कंपनीस भीषण आग लागल्याची घटना आज दुपारच्या सुमारास घडली. आगीत सुदैवाने कुठल्याही प्रकारची जीवितहाणी झाली नसली तरी कंपनीचे लाखोंचे नुकसान झाले आहे. मुसळगाव एमआयडीसी येथे साई टेक फार्मा यांच्या दोन कंपनी असून आग लागलेल्या ठिकाणी कंपनीत बनवण्यात येणाऱ्या गोळ्या औषधांची साठवणूक करण्यात येते. विविध प्रकारच्या बॉक्समध्ये ही औषधे पॅकिंग करुन ठेवण्यात येत असतात. नेहमीप्रमाणे काम सुरू असताना अचानक शॉर्ट सर्किटमुळे कंपनीला आग लागली.
दरम्यान आग लागल्यानंतर औषधांचा साठा ठेवलेल्या पुठ्याच्या बॉक्सलाही आग लागल्याने काही क्षणातच आगीने रौद्ररूप धारण केले. आग लागल्याचे कंपनीतील काम करणाऱ्या कामगारांना निदर्शनास येताच सर्वांनी तात्काळ कंपनीतून पळ काढला. कंपनी प्रशासनाने सिन्नर नगरपरिषद व एमआयडीसीच्या अग्निशमन विभागाला माहिती दिली. त्यानंतर लागलीच दोन्ही दलाचे पथकांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. मात्र, तोपर्यंत आगीने रौद्ररूप धारण केले होते. अग्निशमन दलाच्या जवानांच्या 1 ते 2 तासाच्या अथक प्रयत्नानंतर आग आटोक्यात आणली. एमआयडीसी व सिन्नर अग्निशमन दलाच्या कर्मचारी व स्थानिकांच्या मदतीने आग आटोक्यात आणण्यात यश मिळाले. घटनेमध्ये जीवितहानी झाली नसली तरी या आगीत कंपनीचे लाखोंचे नुकसान झाले आहे.
फार्मास्यूटीकल कंपनी असल्याने अनेक औषधे तयार केली जातात. यामुळे कंपनीत अनेक मोठ्या मशिनरी असल्याने तसेच औषधांचा साठाही मोठ्या प्रमाणावर केला जात असल्याने सर्व साहित्य आगीत खाक झाले. यामुळे कंपनीचे मोठे नुकसान झाल्याचे सांगण्यात येत आहे. यावेळी उपविभागीय पोलिस अधिकारी अर्जुन भोसले, एमआयडीसी पोलीस ठाण्याचे निरीक्षक दशरथ चौधरी, सिन्नर पोलीस ठाण्याचे निरीक्षक संतोष मुटकुळे यांनी घटनास्थळी येऊन पाहणी केली.