Nashik Smart City : नाशिक स्मार्ट सिटीचे टेंडर नावालाच, दीपस्तंभ बेसॉल्टचे, उभारले सिमेंट काँक्रिटचे!
Nashik Smart City : नाशिकमध्ये रामकुंड परिसरात दीपस्तंभ उभारण्यात आले आहेत.
Nashik Smart City : स्मार्ट सिटीच्या (Smart City) माध्यमातुन गोदावरीचं परिसरात (Godavari) सुशोभीकरणाच्या कामे केली जात आहेत. काही दिवसांपूर्वी पुरातन पायऱ्या तोडल्याचा प्रकरणानंतर आता आणखी एका कामामुळे स्मार्ट सिटीच्या कामावर ताशेरे ओढले जात आहेत. दगडात साकारल्या जाणाऱ्या दीपस्तंभ अक्षरश काँक्रीट सिमेंटमध्ये उभारण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.
एकीकडे नाशिकमध्ये (Nashik) स्मार्ट सिटीचा कारभार दिवसेंदिवस उघड्यावर पडत आहेत. या पार्श्वभूमीवर नाशिककरांनी एकत्र येत आंदोलन केले होते. मात्र आता नव्या कामांत देखील सावळागोंधळ केल्याने नागरिक संतापले आहेत. सध्या गोदावरी परिसरात सुशोभीकरणाचे काम सुरु असून एकही दिवसांपूर्वी येथील पुरातन पायऱ्यांना तोडण्यात आले. त्याचबरोबर इतर कामे सुरु असताना परिसरातील मंदिरांना तडे जात असल्याचा प्रकार निदर्शनास आला. यावरून देखील नाशिककरांनी स्मार्ट सिटी विरोधात जोरदार आंदोलन केले. दरम्यान आता रामकुंड परिसरात दीपस्तंभ उभारण्यात आले आहेत. हे दीपस्तंभ पूर्णतः बेसॉल्ट दगडात बांधणे आवश्यक असते, मात्र ठेकेदाराने या कामातही कुचराई केल्याने यावर कठोर कारवाईची मागणी नाशिककरांकडून करण्यात येत आहे.
नाशिक महानगरपालिका (Nashik NMC) स्मार्ट सिटीच्या (Smart City) वतीने शहरात विविध कामे केली जात आहे. दोन वर्षांपासून स्मार्ट सिटीचे काम सुरु असल्याने अनेक भागातील रस्ते खाेदले आहेत. यामुळे नागरिकांच्या वाहतुकीसाठी त्रास सहन करावा लागत आहे. तर दुसरीकडे स्मार्ट सिटीच्या माध्यमातून गाेदावरीच्या घाट परसिरात सुशाेभीकरण सुरु आहे. या ठिकाणी पुरातन पायऱ्या तोडण्यात येऊन फरशा बसविल्या गेल्या, मात्र या कामासाठी पुरातत्व विभागाची परवानगीच घेतली नसल्याचे समोर आले होते. सुशोभीकरणाच्या नावाखाली गाेदेचा इतिहासच पुसण्याचे काम केले जात असल्याचा आरोप नाशिककरांनी केला आहे. असे असताना आता दीपस्तंभाच्या कामांबाबत देखील सांशकता निर्माण झाली आहे.
गोदा पात्रात उभारण्यात येत आलेले दीपस्तंभ हे बेसॉल्ट दगडात बांधण्याचे टेंडरमध्ये नमूद आहे. शिवाय एखाद्या अभियंत्याच्या मार्गदर्शनाखाली हे उभारण्यात यावेत. मात्र दीपस्तंभ हे टेंडरनुसार न बांधता सिमेंट काँक्रिटमध्ये उभारण्यात आले आहेत. तसेच दिपस्तंभाला आकार दिले जातात, त्यासाठी साचाचा उपयोग करण्यात आला आहे. यासाठी विशेष कारागिरांकडून हे काम केले जाते. मात्र साचे वापरून नक्षी बनविण्यात आल्या आहेत. या परिसरात अशा पद्धतीने एकूण 34 दीपस्तंभ उभारण्यात आले आहेत. मात्र एकही टेंडरनुसार नसल्याचा आरोप गोदावरी संवर्धन समितीचे देवांग जानी यांनी केला आहे. याचबरोबर स्मार्ट सिटीच्या इतरही कामांबाबत अशाच पद्धतीने लूटमार केल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.
दरम्यान याबाबत देवांग जानी म्हणाले कि, ज्या पद्धतीने पुरातन मंदिरामध्ये दीपस्तंभ पाहायला मिळतात, त्याप्रमाणे एकही दीपस्तंभ स्मार्ट सिटीने बनवला नाही. स्मार्ट सिटीच्या कामांच्या टेंडरमध्ये याबाबत धडधडीत लिहले असताना बेसॉल्ट खडकाचा कुठेही वापर केला नसल्याचे दिसून येते. त्यामुळे या कामाबाबत स्मार्ट सिटी अधिकाऱ्यांना जाब विचारणार असून लवकरच बैठक घेऊन कारवाईची मागणी करणार असल्याचे म्हणाले.