Nashik Saptshrungi Devi : सप्तशृंगीगडावर भाविकांसाठी ड्रेस कोड? विश्वस्त, ग्रामपंचायत आणि ग्रामस्थ सकारात्मक; लवकरच निर्णय
Nashik Saptshrungi Devi : नाशिकच्या सप्तशृंगी गडावर (saptshrungi Gad) देखील भाविकांसाठी ड्रेसकोड लागू करण्यात येणार असल्याचं बोललं जात आहे.
Nashik Saptshrungi Devi : नागपूर (Nagpur), पुणे (Pune) येथील काही मंदिरांत भाविकांना ड्रेस कोड (Dresscode) लागू करण्याचा निर्णय मंदिर फेडरेशन, ग्रामस्थ आणि विश्वस्त मंडळाने घेतला आहे. याच पार्श्वभूमीवर नाशिकच्या सप्तशृंगी गडावरील (Saptshrungi Gad) आदिमायेच्या मंदिरातही पावित्र्य जपण्यासाठी भाविकांना ड्रेस कोड लागू व्हावा, त्यासाठी विश्वस्त मंडळातील काही सदस्यांसह सप्तशृंगगड ग्रामपंचायत, ग्रामस्थ आणि भाविक सकारात्मक असून, लवकरच निर्णय घेण्याचे सूतोवाच सप्तशृंगगडचे सरपंच रमेश पवार, विश्वस्त ॲड. ललीत निकम आणि ग्रामस्थांनी केले आहे.
गेल्या काही दिवसांपासून मंदिरामध्ये भाविकांसाठी ड्रेसकोडचा मुद्दा चांगलाच गाजत आहे. काही दिवसांपूर्वी लाखो महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी देवीच्या (Tuljabhavani Devi) मंदिरात प्रवेशासाठी ड्रेसकोड बंधनकारक करण्यात आला होता. मात्र काही तासांतच हा निर्णय मागे घेण्यात आला होता. आता याच धर्तीवर भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या सप्तशृंगी देवी मंदिरात ड्रेस कोडचा निर्णय घेण्याच्या हालचाली सुरु झाल्या आहेत. याबाबत देवस्थान ट्रस्ट आणि वणी ग्रामस्थ सकारात्मक असून लवकरच याबाबत चर्चा करून हा निर्णय लागू केला जाणार आहे. त्यामुळे आता सप्तशृंगी देवी मंदिरात दर्शन घेण्यासाठी भाविकांना ड्रेसकोड आवश्यक असणार आहे.
दरम्यान, नाशिक (Nashik) जिल्ह्यातील सप्तशृंगी देवी मंदिर (Saptshurngi Devi Mandir) हे देशभरात प्रसिद्ध असून रोजच हजारो भाविक दर्शनासाठी येत असतात. त्याचबरोबर वणी गडावर दर्शनासह इतरही अनेक पर्यटनस्थळे असल्यानं अनेक भाविक पर्यटनस्थळांना भेटी देत असतात. मात्र पर्यटनस्थळांबरोबरच धार्मिक स्थळांना भेट देण्यासाठी आलेले काही भाविक येताना तोकडे कपडे घालून येतात. त्यामुळे अशा भक्तांना आळा घालण्यासाठी सप्तशृंगगडावर भाविकांना ड्रेस कोड लागू करण्याबाबत सप्तशृंग निवासिनी देवी ट्रस्टचे विश्वस्त, ग्रामपंचायत पदाधिकारी आणि ग्रामस्थ भाविक सकारात्मक, विचाराधीन असून लवकरच त्यावर निर्णय होईल, असे सूतोवाच विश्वस्तांनी व्यक्त केले आहे.
सप्तशृंगी मंदिर प्रशासन सकारात्मक
सद्यस्थितीत राज्यातील सर्व शासकीय कार्यालयात ड्रेसकोड लागू आहे. त्याचबरोबर देशातील अनेक मंदिरे, गुरुद्वारा, चर्च, मशिदी आणि इतर प्रार्थना स्थळी ड्रेसकोड लागू आहे, त्याच धर्तीवर राज्यातील मंदिरांमध्ये ड्रेसकोड लागू करण्याचा निर्णय काही मंदिर प्रशासनाने घेतला आहे. यात नागपूर, पुणे, अमळनेर येथील काही मंदिरात भाविकांना ड्रेसकोड बंधनकारक करण्यात आलेला आहे. यानुसार दर्शनासाठी आलेल्या भाविकांनी तोकडे, अंगप्रदर्शन करणारी अथवा उत्तेजक कपडे परिधान केल्यास त्यांना दर्शन घेता येणार नाही, अशी स्पष्ट भूमिका मंदिर प्रशासनाकडून घेण्यात आली आहे. याच धर्तीवर सप्तशृंगी मंदिरात यावर विचार सुरु आहे.
नागपूरसह अमळनेर येथील मंगळग्रह मंदिरात ड्रेसकोड
दरम्यान, काही दिवसांपूर्वी तुळजापूर मंदिर (Tuljapur Mandir) प्रशासनाने ड्रेसकोड संदर्भातील निर्णय घेतला होता. मात्र राज्यभरातून प्रतिक्रिया उमटल्याने हा निर्णय काही तासांत मागे घेण्यात आला होता. त्यानंतर जळगाव जिल्ह्यातील अमळनेर येथील मंगळग्रह मंदिर समितीने मंदिराबाहेर फलक लावून भाविकांना ड्रेसकोड बंधनकारक करण्यात आला आहे. तसेच दोन दिवसांपूर्वी नागपूर शहरातील चार मंदिरांना हा निर्णय घेण्यात आला आहे. येथील मंदिरामध्ये दर्शनासाठी जाताना भाविकांसाठी नियमावली आखून देण्यात आली आहे. अंगप्रदर्शक, उत्तेजक, असभ्य, अशोभनीय आणि तोकडे वस्त्र तसेच असात्विक वेशभूषा करून मंदिरात प्रवेश करू नये. भारतीय संस्कृतीचे पालन करून सात्विक वेशभूषेतच दर्शन घ्यावे", अशा आशयाचे पोस्टर लावण्यात आले आहे.