Nashik Saptshrungi Devi : सप्तशृंगी देवी मंदिरात दर्शनासाठी ड्रेसकोड; वणी ग्रामपंचायतीचा ठराव, आज अंतिम निर्णय
Nashik Saptshrungi Devi : नाशिकजवळील सप्तशृंगी देवी मंदिरात दर्शनासाठी ड्रेसकोडबाबत ग्रामपंचायतीने ठराव केला आहे.
Nashik Saptshrungi Devi : गेल्या काही दिवसांपासून मंदिरात प्रवेश करताना ड्रेसकोड परिधान करावा, अशी नियमावली लागू करण्यात आली आहे. नाशिकजवळील (Nashik) सप्तशृंगी देवी मंदिरात (Saptshrungi Devi) देखील याबाबत विचारविनिमय सुरू आहे. सद्यस्थितीत वणी ग्रामपंचायतीकडून ड्रेसकोड लागू करण्याबाबत ठराव करण्यात आला असून हा ठराव मंदिर संस्थानकडे देण्यात येणार आहे. त्यानंतर ड्रेसकोड बाबत अंतिम निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे.
राज्यभरातील अनेक मंदिरामध्ये भाविकांना दर्शन घेताना ड्रेसकोड (Dress Code) लागू करण्यात आला आहे. त्यामुळे राज्यभरातून प्रतिक्रिया उमटत आहेत. अशातच नाशिक जिल्ह्यातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या सप्तशृंगी देवी मंदिरात ड्रेसकोड लागू करण्याबाबत मंदिर प्रशासन सकारात्मक असल्याची चर्चा आहे. तत्पूर्वी सप्तशृंगी देवी मंदिरात (Saptshurngi Devi Mandir) ड्रेस कोड लागू करण्यात यावा. यासाठी आता एक ठराव काढण्यात आला आहे. सप्तशृंगी गडाच्या ग्रामपंचायतीने काल मासिक बैठकीत ठराव काढला. महिलांनी तोकडे कपडे घालून मंदिर परिसरात प्रवेश करू नये, तसंच मंदिरात पावित्र्य राखले जावे, असं आवाहन या ठरावातून करण्यात आलं आहे.
दरम्यान वणी ग्रामपंचायतीकडून (Vani Grampanchayat) काल विशेष बैठक घेण्यात आली. त्यानुसार सप्तशृंगी देवी मंदिरात ड्रेसकोड लागू करावा की नाही याबाबत बैठक घेण्यात आली. त्याचबरोबर सर्वांच्या संमतीने ड्रेसकोड लागू करण्यात यावा असा ठरावही करण्यात आला. दरम्यान आज हा ठराव मंदिर संस्थानकडे दिला जाण्याची शक्यता असून मंदिर संस्थान यावर काय निर्णय घेतं हे बघणं महत्वाचं आहे. आता सप्तशृंगी मंदिरात ड्रेसकोड लागू केल्यास अनेक प्रतिक्रिया उमटण्याची शक्यता आहे. देशभरातून भाविक भक्त या देवी मंदिरात दर्शनासाठी येत असतात. शहरी भागासह ग्रामीण भागातील भाविकांची संख्या अधिक आहे. त्यामुळे हा निर्णय कितपत सकारात्मक ठरतो हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
मंदिर प्रशासनाकडे अंतिम निर्णय
दरम्यान, नाशिक (Nashik) जिल्ह्यातील सप्तशृंगी देवी मंदिर (Saptshurngi Devi Mandir) हे देशभरात प्रसिद्ध असून रोजच हजारो भाविक दर्शनासाठी येत असतात. त्याचबरोबर वणी गडावर दर्शनासह इतरही अनेक पर्यटनस्थळे असल्यानं अनेक भाविक पर्यटनस्थळांना भेटी देत असतात. मात्र पर्यटनस्थळांबरोबरच धार्मिक स्थळांना भेट देण्यासाठी आलेले काही भाविक येताना तोकडे कपडे घालून येतात. त्यामुळे अशा भक्तांना आळा घालण्यासाठी सप्तशृंगगडावर भाविकांना ड्रेस कोड लागू करण्याबाबत सप्तशृंग निवासिनी देवी ट्रस्टचे विश्वस्त, ग्रामपंचायत पदाधिकारी आणि ग्रामस्थ भाविक सकारात्मक, विचाराधीन असून लवकरच त्यावर निर्णय होईल, असे सूतोवाच विश्वस्तांनी व्यक्त केले आहे.