Nashik Civil Hospital : रुग्णाच्या मृत्यूनं नातेवाईकांचा हंबरडा, मात्र क्षणांत जिवंत झाला, नाशिक सिव्हिलमध्ये काय घडलं?
Nashik Civil Hospital : रुग्णाच्या मृत्यूनं नातेवाईकांचा हंबरडा, मात्र क्षणांत जिवंत झाला, नाशिक सिव्हिलमध्ये काय घडलं/
Nashik Civil Hospital : नाशिक जिल्हा रुग्णालय (Nashik Civil Hospital) म्हटलं आजही सामान्यांची पाचावर धारण बसते. असाच काहीसा प्रकार रुग्णाच्या नातेवाईकांच्या बाबतीत समोर आला आहे. दोन दिवसांपूर्वी रुग्णालयात दाखल केलेल्या रुग्णाला मृत घोषित (Death Patient) केल्यानंतर काहीवेळाने हा रुग्ण जिवंत असल्याचे समोर आल्याचा प्रकार घडला आहे. मात्र या दरम्यान रुग्णाच्या नातेवाइकांना चांगलाच धक्का बसला.
नाशिकच्या (Nashik) जिल्हा रुग्णालयात जिल्हाभरातून नागरिक उपचार घेण्यासाठी येत असतात. मात्र नेहमीच्या भोंगळ कारभारामुळे रुग्णांसह नातेवाईकांना त्रासाला सामोरे जावे लागते. अशातच गुरुवारी अचंबित करणारी घटना घडली आहे. शहरातील अशोकस्तंभ परिसरातील एका व्यावसायिकाने सोमवारी दुपारी पेटवून घेतले होते. हा व्यावसायिक 93 टक्के भाजल्याने त्यास उपचारांसाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले. दरम्यान, गुरुवारी त्याच्यावर उपचार सुरू असताना सकाळी 6.30 च्या सुमारास रुग्णाची कोणतीही हालचाल होत नव्हती. यामुळे वॉर्डमध्ये उपस्थित प्रशिक्षणार्थी डॉक्टरने वैद्यकीय तपासणी करीत इसीजी रिपोर्ट फ्लॅट (ECG Report) आल्याने त्यांनी नातेवाइकांना रुग्णाचे निधन झाल्याचे सांगितले. यामुळे नातेवाइकांवर दुःखाचा डोंगर कोसळला.
दरम्यान रुग्णाचा मृत्यू झाल्याने पुढील कार्यवाहीसाठी रुग्णालयाच्या पोलिस चौकीत माहिती देण्यात आली. त्यामुळे पोलिसांनीही पुढील प्रक्रिया सुरू केली. मात्र तासाभरांनंतर म्हणजे सकाळी 8 वाजेच्या सुमारास वॉर्डमध्ये वैद्यकीय अधिकाऱ्यास मृत रुग्णाच्या पायांची मंद हालचाल दिसल्याने त्यांनी रुग्णाचा पुन्हा इसीजी केला. त्यात हृदयाचे ठोके आल्याने रुग्ण जिवंत असल्याचे स्पष्ट झाले. ही बाब समजताच डॉक्टरांनी तातडीने उपचार सुरू केले. तसेच रुग्ण जिवंत असल्याची माहिती पुन्हा नातेवाइकांना दिली, त्यामुळे नातलगांना आनंद झाला. मात्र, डॉक्टरांनी आधी चुकीची माहिती दिल्याचा समज होऊन संतापलेल्या नातेवाइकांनी वैद्यकीय अधिकाऱ्यांसह जळीत कक्षातील डॉक्टर, परिचारिका, कर्मचाऱ्यांना धारेवर धरले. यामुळे काही वेळ तणाव निर्माण झाला होता. यानंतर पोलिसांसह वरिष्ठ वैद्यकीय अधिकाऱ्यांनीही नातलगांची समजूत काढली.
नातेवाईकांचा हंबरडा
दरम्यान जळीत रुग्णास रुग्णालयात दाखल केल्यापासून श्वास घेण्यास त्रास होत होता. त्यामुळे तात्काळ रुग्णाला व्हेंटिलेटर लावले आहे. गुरुवारी सकाळी इसीजी काढल्यांनतर त्याचा मृत्यू झाल्याचे समजले. मात्र तरीदेखील व्हेंटिलेटरवर असल्याने ऑक्सिजन आणि सलाइनद्वारे औषध सुरू होते. कदाचित काही क्षणांसाठी हृदय बंद पडले असावे आणि त्याचवेळी रिपोर्ट केला असावा, अशी शक्यता जिल्हा रुग्णालयातील वैद्यकीय महाविद्यालयाचे प्रभारी डीन गोपाळ शिंदे यांनी वर्तवली. प्रभारी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अरुण पवार म्हणाले कि, गंभीर भाजलेल्या रुग्णावर उपचार करणे अत्यंत जिकिरीचे असते. एकाचवेळी अनेक समस्या निर्माण होतात. वैद्यकीय क्षेत्रात चमत्कारावर विश्वास ठेवता येत नाही, परंतु काही घटना अत्यंत दुर्मिळ असतात. रिपोर्टनुसार रुग्णाचा मृत्यू झाला, मात्र काही क्षणांसाठी. हा प्रकार लक्षात आल्यानंतर पुन्हा औषधोपचार सुरू केले आहेत.