(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Nashik Crime : गुन्हेगारी वाढली! नाशिक पोलिसांना गुन्हे रोखण्यापासून कुणी अडवतंय का? नागरिकांचा सवाल
Nashik Crime : नाशिक शहरातील गुन्हेगारी आटोक्यात येण्याचं नाव घेत नसून अल्पवयीन मुलांचा सहभाग देखील पोलिसांसाठी डोकेदुखी वाढवत आहे.
Nashik Crime : नाशिक (Nashik) शहरात गेल्या काही दिवसांपासून गुन्हेगारीने चांगलंच डोकं वर काढलं असून शहरात पोलीस आहेत का? असाच प्रश्न आता उपस्थित होतो आहे. तर दुसरीकडे अल्पवयीन मुलांचं मोठं आव्हान पोलिसांसमोर उभ ठाकलं असून यामुळे पोलीसही हतबल झाल्याचं बघायला मिळत. अशातच आज पुन्हा एक खुनाची (Murder) घटना उपनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडला आहे.
खरं तर धार्मिक आणि शांत शहर अशी नाशिकची ओळख.. मात्र गेल्या काही दिवसांपासून वाढत चाललेल्या गुन्हेगारी (Crime) घटना बघता हिच नाशिकची ओळख बदलणार तर नाही ना? अशी भिती आता व्यक्त केली जात आहे. गल्लो गल्ली मोकाटपणे टोळके हातात शस्त्र घेऊन फिरत आहेत, कोयत्याने एकमेकांवर हल्ले चढवले जात आहेत. एवढंच नाही तर गोळीबाराच्याही घटना आता सर्रासपणे समोर येऊ लागल्या आहेत. दर दोन तिन दिवसाआड प्राणघातक हल्ल्याच्या घटनाही घडत असून गुन्हेगारांवर पोलिसांचा वचक राहिला नसल्याचं बघायला मिळत आहे आणि हिच सर्व परिस्थिती बघता नाशिक शहराला पोलीस आयुक्त आहेत का? असाच सवाल आता विचारला जातोय.
राष्ट्रवादी नेते छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) म्हणाले की, गेल्या काही दिवसांपासून शहरातील गुन्हेगारी वाढली आहे. पोलिसांनी गुन्हेगारी रोखली पाहिजे. पोलिसांना कोण रोखतंय? त्यांचा जरब नाही का? शहरातील गुन्हेगारीवर अंकुश लावण्यासाठी पोलिसच (Nashik Police) ठोस उपाययोजना करू शकतात. त्यासाठी पालकमंत्री देखील निर्णय घेऊ शकतात. असह्य झालं तर मंत्रिमंडळात सांगतील, सध्या संधी दिली तर त्याचा फायदा घ्यावा. एकीकडे मुंबई, पुण्यासारखं नाशिक शहर नाही, त्यामुळे गुन्हेगारी कंट्रोल केली पाहिजे. पोलीस कमिशनर काय करत आहेत? कडक कारवाया सुरू केल्या तर प्रकार थांबतील.. त्यांना कोण अडवतय की त्यांना आपलं काम येतच नाहीये की पोलिसांचा जरब कमी झालं आहे?
दोनच दिवसांपूर्वी शहरातील सिडको (Cidko) परिसरात दहशत माजवण्यासाठी 7 जणांच्या कोयता गॅंगने 12 ते 15 वाहनांची तोडफोड केली होती. यामध्ये वाहनांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होऊन स्थानिक नागरिकांमध्ये भितीचे वातावरण पसरले होते. आरोपीमध्ये 3 मुलं ही अल्पवयीन होती, विशेष म्हणजे यातील एक मुलगा हा गेल्याच महिन्यात खूनाच्या गुन्ह्यात जामीनावर सुटून बाहेर आला होता. यावर वरिष्ठ पोलीस निरीक्षक सूरज बिजली म्हणाले कि, यातील एक अल्पवयीन मुलगा गेल्याच महिन्यात 302 च्या गुन्ह्यात जामिनावर बाहेर आला होता, 18 वर्षांचे होईपर्यंत आम्हाला अटक होत नाही असा या मुलांचा समज असतो, विधीसंघर्षत असल्याने कायद्याचा त्यांना फायदा होतो. दरम्यान गुन्हेगारी मोडीत काढण्यासाठी पोलीस आयुक्त अंकुश शिंदे यांनी तडीपारी, मकोका कारवायांना सुरुवात तर केली मात्र तरीदेखील गुन्हेगारी आटोक्यात येण्याचं नाव घेत नसून अल्पवयीन मुलांचा गुन्ह्यातील वाढता सहभाग ही देखील पोलिसांसाठी एक डोकेदुखी ठरत असल्याचं बघायला मिळते आहे.
उपनगर परिसरात युवकाचा खून
नाशिकच्या वाढत्या गुन्हेगारी सदंर्भात आजच छगन भुजबळ यांनी चिंता व्यक्त केली असताना आज उपनगर पोलीस ठाणे हद्दीत खुनाची घटना घडली आहे. प्रवीण मधुकर दिवेकर असे तरुणाचे नाव आहे. या तरुणाच्या गळ्यावर तसेच पोटावर बियरच्या बाटलीने जखम केलाचे दिसून आले आहे. मात्र अद्याप खुनाचे कारण समजू शकले नाही. त्यामुळे पोलिसांचा तपास सुरु असल्याचे समजते आहे.