Rohit Pawar Nashik : भाजपने राष्ट्रवादीची स्क्रिप्ट सर्वात फास्ट दिली, नाशिकमध्ये रोहित पवारांचे खळबळजनक वक्तव्य
Rohit Pawar Nashik : भाजपने राष्ट्रवादीची स्क्रिप्ट सर्वात फास्ट दिल्याचे खळबळजनक विधान आमदार रोहित पवार यांनी केले.
Rohit Pawar Nashik : एकनाथ शिंदे (Eknath Shinde) हे उद्धव ठाकरे (udhhav Thackeray) यांच्याबाबत सात-आठ महिने आधी बोलत होते. त्यानुसार भाजपकडून त्यांची स्क्रिप्ट लिहण्यासाठी वेळ लागला. मात्र भाजपने राष्ट्रवादीची स्क्रिप्ट सर्वात फास्ट दिल्याचे खळबळजनक वक्तव्य आमदार रोहित पवार यांनी केले. तसेच शरद पवार यांची आशीर्वाद घेण्याची स्टाईल जरा वेगळी आहे. त्यानुसार येवल्यात ज्यांच्यावर अन्याय झाला, त्यांना ते भरभरून आशीर्वाद देतील ते आशीर्वाद कसे असतील हे येत्या काळात समजेलच, असे वक्तव्य आमदार रोहित पवार यांनी केले
शरद पवार (Sharad Pawar) यांची आज येवला (Yeola) सभा होत असून त्या पार्श्वभूमीवर नाशिकमध्ये (Nashik) रोहित पवार यांनी पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले कि पावसाची परिस्थिती बघता दौरा पुढे ढकलावा, असे शरद पवार यांचे मत होते. पण कार्यकर्ते आणि पदाधिकारी यांनी हट्ट धरला म्हणून पवार साहेब हो म्हणाले. हाडाचे कार्यकर्ते एका विचाराने शरद पवार यांच्या सोबत राहिले. जाहीर सभेचे सूक्ष्म नियोजन केले असून खूप चांगली सभा होईल. तसेच सभेसाठी येवला का निवडले, यावर रोहित पवार (Rohit Pawar म्हणाले की, दोन दिवसांपूर्वीच नियोजन पाहिले तर नाशिकचे नियोजन होते. एक दिवस व्हावा म्हणून नाशिक जिल्ह्यात सभा होत आहे. तसेच येवल्याच्या जनतेने शरद पवारांना मुद्दामहून बोलावले. या नाशिक जिल्ह्याने पवारांना ताकद दिली आहे. लोक मनापासून पवारांसोबत असल्याचे रोहित पवार म्हणाले.
तर राष्ट्रवादीत फूट पडल्यानंतर रोहित पवार यांनी दोन तीन नेत्यांना उद्देशून ट्विट केले होते. यावर ते म्हणाले की, अजित पवारांसह (Ajit Pawar) इतर नऊ आमदारांनी शपथविधी घेतल्यानंतर राज्यभरातून कॉल येण्यास सुरवात झाली. चारशे चारशे लोक फोन करत आहे. त्यामुळे सोशल मीडियाच्या माध्यमातून चारशे फोनची भावना मांडली. मी व्यक्त होत राहणार असून माझ्यावर कोणी दबाव आणू शकत नाही. काही लोक म्हणतात मी लवकर व्यक्त होतो. पारदर्शक आणि परखड असल्याने कुणी संपर्क केला नाही. माझे उत्तर काय असेल, याचा अंदाज त्यांना असेल, म्हणून या सर्व भानगडीत मला संपर्क केला नाही. शिंदे गटात बरेच काही झाले. त्यातील अनेक आमदारांचे उद्धव साहेबांना फोन येत आहेत. निवडणुकांचे वातावरण आल्यावर अनेक आमदार परत येतील. शिंदे गटातील आमदार आमच्याकडे किंवा उद्धव साहेबांकडे जातील.
घर कुणी फोडलं तर बीजेपीने फोडलं....
अनेकजण विचारत आहेत की राष्ट्रवादीतील लोक कशी गेली? मात्र शरद पवार यांचे मत असे आहे की, ते लोक का गेले आहेत, याबाबत सामान्य लोकांना माहिती आहे. त्यामुळे बोलून वेळ वाया घालवायचा नाही, घर कुणी फोडलं तर बीजेपीने फोडलं असून बिजेपीचा विरोध करावाच लागेल. यातील काही नेते बोलले तर आम्ही उत्तर देऊ असे सांगत आमच्या मताचे विभाजन होऊन बिजेपीला फायदा व्हावा, असा हेतू यामागे आहे. मात्र आमच्या सोबत लोक जोडलेली असल्याचे रोहित पवार म्हणाले. तसेच या सगळ्या घडामोडींमुळे पवार कुटुंबियांवर आघात झाल्याचे बोलले जात आहे. यावर रोहित पवार म्हणाले की, राजकारणात कुटुंब आणू नका. राष्ट्रवादीच्या फुटीमुळे पवार यांना वेदना होत आहे. भाजपला लोक मतदान करतील की नाही या भीतीने घर फोडण्याचे काम सुरु असल्याचा घणाघात रोहित पवारांनी केला आहे.
जवळ घेऊन संपवण्याची भाजपची वृत्ती
काकांच्या बाबतीत भावनिक असून विरोधी पक्षनेते व्हायला मी सुद्धा सही केली असल्याचे रोहित पवार म्हणाले. एका बाजूला आजोबांचा विचार आणि दुसऱ्या बाजूला पक्षाचा विचार जपणे ही माझी जबाबदारी असून पवार यांचा संघर्ष पाहिला आहे. मात्र या सगळ्या घडामोडींचे पूर्ण खापर अजित दादांवर फोडता येणार नाही, पवार यांच्या अवती भोवती कोण होत, तर हीच लोक होती. काही नेत्यांना भेटायचे असेल तर चार लेअर होते, बडवे होते असे म्हणत असतील तर तेच बडवे आहेत का? असा सवाल करत भुजबळांना टोला दिला आहे. दरम्यान नुकताच ठाकरे गटाच्या उपनेत्या नीलम गोऱ्हे यांनी देखील शिवसेनेचे वाट धरली. यावर रोहित पवार म्हणाले की, कुणी स्वतःचे पद टिकवण्यासाठी आणि नवीन पद घेण्यासाठी जात आहे, ते स्वतःचा विचार करत आहे. यात कार्यकर्त्याची फरफट होत असून त्यांचा विचार करत नाही. शरद पवार यांनी साठ वर्षे विचार जपला, मात्र जवळ घेऊन वृत्ती बीजेपीची असल्याचे सर्वाना माहित आहे, असेही ते म्हणाले.
आमदारांच्या मनात द्विधा मनस्थिती
तसेच राष्ट्रवादीच्या पक्ष आणि चिन्हांबाबत ते म्हणाले की, अजित दादांचे हावभाव मी बघत होतो, ते बोलत नव्हते. एखादा पिक्चर तासात संपायला पाहिजे, तो चार तास चालला. तसेच बऱ्याच मुद्द्यांवर प्रफुल्ल पटेल बोलत होते. मात्र ते चोरी लपविण्यासाठी बोलत होते. आमदार दूर जाऊ नये, म्हणून केविलवाणा प्रयत्न केला जात आहे. तसेच राष्ट्रवादीच्या अध्यक्ष पदावर अजित पवार गटाकडून दावा केला जात आहे. यावर ते म्हणाले की, ते दावा करणारच काळे किंवा पांढरे हे सांगायला इतका वेळ का? मात्र कोण कशासाठी गेले आहे? याचा अंदाज आम्हाला आला असून आमदार कोणामुळे निवडून आले आहे, हे तर सर्वाना माहित आहे. शरद पवार आणि अजित पवार यांना आमदारांना साद घालण्याचा अधिकार आहे. मात्र सद्यस्थितीला आमदारांच्या मनात द्विधा मनस्थिती असल्याने आमच्या प्रत्येकाला अंदाज आला आहे.