(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Nashik News : नाशिकचा 'शासन आपल्या दारी' कार्यक्रम पुन्हा एक दिवस पुढे ढकलला, प्रशासनाकडून जय्यत तयारी
Nashik News : नाशिक (Nashik) जिल्ह्यातील शासन आपल्या दारी हा कार्यक्रम शनिवारी 15 जुलैला होणार असल्याचे निश्चित झाले आहे.
Nashik News : अखेर नाशिक (Nashik) जिल्ह्यातील ‘शासन आपल्या दारी’ कार्यक्रम येत्या 15 जुलै 2023 रोजी निश्चित झाला असून दोन तारखांच्या अडथळ्यांनंतर ही तारीख निश्चित करण्यात आली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आणि अजित पवार (Ajit Pawar) यांच्या उपस्थितीत डोंगरे वसतिगृह मैदानावर आयोजित करण्यात आला आहे.
नुकताच धुळे (Dhule) येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत शासन आपल्या दारी हा कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला. सरकारी योजनांचा जागर करण्यासाठी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री नाशिकमध्ये (Nashik) येणार असले तरी त्यासाठीचा एक एक मुहूर्त पुढे पुढे जात आहे. शासन आपल्या दारी या उपक्रमाबाबत 'तारीख पे तारीख' नाशिक जिल्हा वासियांना येत असून आता हा कार्यक्रम शनिवारी होणार असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली आहे. आगामी पावसाळा अधिवेशन, मंत्रिमंडळ विस्ताराची लगबग यामुळे शनिवारी तरी हा कार्यक्रम होणार का? याबाबत अद्यापही साशंकता कायम आहे. दरम्यान जिल्ह्यात आतापर्यंत शासन आपल्या दारी उपक्रमांतर्गत साधारण 8 लाख 91 हजार पात्र लाभार्थ्यांना शासनाच्या विविध योजनांचा लाभ देण्यात आला आहे.
पालकमंत्री दादा भुसे (Dada Bhuse) यांनी पुन्हा एकदा कार्यक्रमाची आढावा बैठक घेत कार्यक्रम स्थळाची म्हणजेच डोंगरे वसतिगृहाची पाहणी केली आहे. त्यानुसार येत्या दोन तीन दिवसांच्या कालावधीत अधिकारी यांनी गावोगावी जाऊन शासन आपल्या दारी उपक्रमाच्या माध्यमातून अधिकाधिक पात्र लाभार्थ्यांना विविध शासकीय योजनांचा लाभ उपलब्ध करून देण्यसाठी प्रयत्न करावेत, असे आवाहन भुसेंकडून करण्यात आले आहे. समाजातील विविध घटकांसाठी योजना राबवणे, सरकारचे कर्तव्य असते. या योजनांचा लाभ पात्र नागरिकांना दिला जातो. आमच्यामुळेच हा लाभ तुमच्या पदरात पडला, हे सांगण्याची संधी मात्र सरकारमधील मंत्र्यांनी राजकारणी सोडत नाहीत. शासन आपल्या दारी उपक्रमातून देखील सरकारच्या कर्तव्यदक्षतेची जाणीव नागरिकांना करून देण्याचा प्रयत्न सध्या सुरू आहे.
नाशिकमध्ये 15 जुलैला शासन आपल्या दारी
दरम्यान नाशिक जिल्ह्यातील शासन आपल्या दारीचा पहिला कार्यक्रम 8 जुलै रोजी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत शहरात कार्यक्रम घेण्यात येणार होता. मात्र राजकीय घडामोडींमुळे तो पुढे ढकलून 14 जुलैला घेण्याचे निश्चित झाले. जिल्हा प्रशासनाने निमंत्रण पत्रिका बॅनर तयार करण्याची तयारी केली. या कार्यक्रमाची तयारी अंतिम टप्प्यात असताना जिल्हा प्रशासनाला रविवारी रात्री मुख्यमंत्री कार्यालयाचा फोन आला. त्यानुसार नगर जिल्ह्यातील हा कार्यक्रम रद्द झाला असून शनिवारी 15 जुलैला नाशिकमध्ये हा उपक्रम घ्यावा, असे सांगण्यात आले. त्यामुळे हा कार्यक्रम एक दिवस पुढे ढकलण्यात आल्याची माहिती जिल्हा प्रशासन दिली.