Sinner-Shirdi Highway : अपघात असो कि ट्रॅफिक जॅम वा असो पर्यायी मार्ग, आता सिन्नर-शिर्डी महामार्गावर एटीएमएस यंत्रणा
Sinner Shirdi Highway : सिन्नर शिर्डी महामार्गावर आता ऍडव्हान्स ट्राफिक मॅनेजमेंट सिस्टीम (ATMS) यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली आहे.
Sinner Shirdi Highway : नाशिकसह (Nashik) जिल्ह्यात अपघातांच्या (Accident) घटनांत रोजच वाढ होत आहे. यामुळे अपघातांचे प्रमाण कमी करण्यासाठी वाहतूक पोलिसांकडून (Traffick Police) विविध उपायोजना राबवण्यात येत आहे. अशातच महामार्गावर अपघातानंतर आता ऍडव्हान्स ट्राफिक मॅनेजमेंट सिस्टीम (ATMS) यंत्रणा सिन्नर शिर्डी महामार्गावर कार्यान्वित करण्यात आली आहे. यामुळे महामार्गावर वाहतूक ठप्प झाल्यास माहिती मिळणार असून त्यानुसार पर्यायी मार्ग अवलंबता येणार आहे.
काही दिवसांपूर्वी शिर्डी ते भरवीर (Shirdi Bharvir) हा समृद्धी महामार्गाचा दुसरा टप्पा वाहतुकीसाठी खुला करण्यात आला आहे. मात्र, या महामार्गावर देखील अपघात होत आहेत. आतापर्यंत सहा ते सात जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. अशातच रहदारी असलेल्या शिर्डी- सिन्नर (Shirdi-Sinner) महामार्गावर अपघातांची संख्या कमी करण्यासाठी राष्ट्रीय रस्ते प्राधिकरणाने नवा पर्याय अवलंबिला आहे. आता या महामार्गावर अपघातानंतर अवघ्या पाच ते दहा मिनिटात रुग्णवाहिका थेट घटनास्थळी येईल. वाहतूक ठप्प झाल्यास पर्याय मार्गाने वाहने वळवा, असा मेसेज साईन बोर्डवर झळकेल. लुटमार अथवा वाहन चोरी झाल्यास चोरटेही 360 अंशात फिरणाऱ्या कॅमेरात कैद होतील. अशी ॲडव्हान्स ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टीम यंत्रणा सिन्नर शिर्डी महामार्गवर कार्यान्वित करण्यात आले आहे. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचा जिल्ह्यातील हा पहिलाच प्रयोग आहे.
दरम्यान शिर्डी- सिन्नर महामार्गावर रोजच वाहतुकीची कोंडी होत असते. परिणामी अनेकदा अपघातांच्या घटना घडत असतात. यामुळे ज्यावेळी सिन्नर शिर्डी महामार्गाचे काम सुरु होते. त्यावेळी रस्ता बांधणी करणाऱ्या मोंटे कारलो (Monte Carlo Company) कंपनीने दुभाजकात केबल टाकलेली असून त्यानुसार आता आधुनिक वाहतूक व्यवस्थापन प्रणाली कार्यान्वित करण्यात आली आहे. प्रत्येकी 50 किलोमीटर अंतरावर आठ ठिकाणी व्हीआयडीएस तथा व्हिडिओ इन्सिडेंट डिटेक्टिव्ह सिस्टीम कॅमेरे आहेत. 360 अंशात फिरून परिसरावर नजर ठेवणारे झूम कॅमेरेही लावण्यात आलेले आहेत. त्याचबरोबर चार ठिकाणी इलेक्ट्रिक संदेश यंत्रणा व्हेरिबल मेसेज साईन बोर्ड महामार्गावर वाहन चालकांना कायम अपडेट ठेवतील. ही सर्व यंत्रणा वावीच्या पुढे पिंपरवाडी टोलनाका कार्यालयात नियंत्रित करण्यात आली आहे.
सिन्नर शिर्डी मार्गावर यंत्रणा कार्यान्वित
दरम्यान ही कार्यान्वित करण्यात आलेली यंत्रणा ठिकठिकाणी उभारण्यात आली आहे. यात पिटीझेड तथा सीसीटीव्ही कॅमेरे मुसळगाव आणि दातलीच्यामध्ये खोपडीजवळ, पांगरी आणि वावीच्यामध्ये, वावी आणि टोलनाक्याच्या दरम्यान, टोलनाका आणि पाथरे, पाथरे आणि देरडे, देरडे आणि झगडा फाटा यादरम्यान आहेत. व्हिडिओ इन्सिडेंट डिटेक्टिव्ह सिस्टीम दातलीजवळ खोपडी आणि पांगरीच्यामध्ये, वावी जवळ आणि देरडे शिवारात आहे. व्हेरीएबल मेसेज साईन यंत्रणा सहा किलोमीटरवर मुसळगावजवळ, 15 किलोमीटरवर खोपडी आणि पांगरीच्यामध्ये 24 किलोमीटरवर वावी शिवारात आणि 37 किलोमीटरवर पाथरे आणि देर्डेमध्ये असून त्यावर वाहन चालवताना मोबाईलचा वापर करू नका, दारू पिऊन वाहन चालवू नका असे संदेशही वाहन चालकांचे प्रबोधन करतील.
जिल्ह्यातील पहिलाच प्रयोग
नाशिकसह जिल्ह्यातील अनेक भागात रोजच अपघातांच्या घटना घडत असतात. त्यामुळे अपघात होण्याचे प्रमाणही वाढत आहे. या पार्श्वभूमीवर सद्यस्थितीत सिन्नर ते शिर्डी मार्गावर बसविण्यात आलेल्या एटीएमएस प्रणालीमुळे गुन्हेगारी सोबतच अपघातग्रस्तांना तातडीने मदत मिळणार आहे. वाहतुकीचे योग्य व्यवस्थापन होण्यास मदत होईल, त्याचबरोबर वाहनांचे वर्गीकरण देखील करता येणार आहे. राष्ट्रीय महामार्गाचा हा जिल्ह्यातील पहिलाच प्रयोग असल्याने इतरही जिल्ह्यात हा प्रयोग राबवण्याचा मानस असल्याचे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण चे प्रबंधक दिलीप पाटील यांनी सांगितले.