Nashik News : पाचशे रुपयांच्या जागी 20 च्या नोटांचे बंडल, मालेगावमध्ये बँकेत 29 लाखांचा अपहार
Nashik News : मालेगावमध्ये बँकेत 29 लाखांचा गैरव्यवहार झाल्याने खातेदारांमध्ये चिंता व्यक्त करण्यात येत आहे.
Nashik News : मालेगाव (Malegaon) शहरातील जनता को ऑपरेटीव्ह बँकेत मुख्य कार्यकारी अधिकारी आणि रोखपालाने संगनमताने 28 लाख 80 हजाराचा गैरव्यवहार केल्याने खळबळ उडाली आहे. जनता बँक मुस्लीम बहुल पूर्व भागातील अ वर्ग दर्जाची अग्रणी बँक असून या बँकेतच गैरव्यवहार झाल्याने खातेदारांमध्ये चिंता व्यक्त करण्यात येत आहे.
मालेगाव शहरातील किदवाई रोड लगत असलेल्या औद्योगिक संस्थेच्या आवारात असलेल्या जनता को ऑपरेटिव्ह बँकेत (Janta Bank) मुख्य कार्यकारी अधिकारी आणि रोखपालाने संगमताने 28 लाख 80 हजारांचा गैरव्यवहार (Bank Fraud) केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. जनता बँकेच्या स्ट्रॉंग रूममधील गोदरेज कंपनीच्या लोखंडी सेफमधील पाचशे रुपयांच्या बंडलामध्ये 20 रुपयांच्या नोटांचे बंडल ठेवून हा अपहार करण्यात आल्याने खळबळ उडाली आहे. दुसरीकडे बँकेतील खातेदारांनी चिंता व्यक्त केली असून बँक प्रशासनाने काळजी करू नका, असे आवाहन बँक ग्राहकांना केले आहे.
जनता बँकेच्या मुख्य कार्यालयातील मुख्य कार्यकारी अधिकारी अन्सारी इम्तियाज अहमद अहमदउल्ला आणि रोखपाल जावेद अहमद सिद्दीकी अहमद अशी गुन्हा दाखल झालेल्या संशयितांची नावे आहेत. इस्लामपुरा वॉर्ड औद्योगिक सहकारी संस्थेच्या आवारात जनता को ऑपरेटीव्ह बँकेचे मुख्य कार्यालय आहे. बँकेच्या शहरात अन्यत्र पाच शाखा आहेत. बॅंकेच्या मुख्य कार्यालयातील मुख्य कार्यकारी अधिकारी अन्सारी इम्तियाज अहमद अहमदउल्ला आणि रोखपाल जावेद अहमद सिद्दीक अहमद यांनी संगनमत करुन 28 लाख 80 हजाराची रक्कम हडप केली. याबाबत शंका आल्याने तक्रार आणि चौकशी करण्यात आली.
असा झाला उघड गैरव्यवहार
दरम्यान, बँकेच्या स्ट्रॉंग रुममधील गोदरेज कंपनीच्या लोखंडी सेफमधील रोख रक्कम रिझर्व बँकेचे निरीक्षक अधिकारी चिरंजीव पल्लव यांनी प्रत्यक्ष पडताळणी केली असता 500 रुपयाच्या नोटांचे बंडलच्या तळाशी पाठीमागील बाजूस पाचशे रुपयांच्या नोटांच्या जागी 20 रुपयांच्या नोटांचे बंडल ठेवून कॅश बुकमध्ये नमूद करण्यात आले. प्रत्यक्षात एकूण शिल्लक रक्कमेपैकी 28 लाख 80 हजर रुपये कमी मिळून आले. यानंतर दोघांनी संगनमताने गैरव्यवहार आणि विश्वासघात केल्याचे आढळून आले. शाखा व्यवस्थापक जुनैद अहेमद इकबाल अहमद यांच्या तक्रारीवरुन दोघांविरुद्ध शहर पोलीस ठाण्यात अपहार आणि आर्थिक फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नाशिकसह जिल्ह्यात ठकबाजी वाढली
नाशिकसह जिल्ह्यात ठकबाजी वाढली असून बँक, लोन आणि इतर कारणांत फसवणुकीचे प्रकार वाढले आहेत. यात अधिकाऱ्यांचा समावेश असल्याचे दिसून येत आहे. तसेच ऑनलाईन फसवणुकीचे प्रकार देखील वाढले एखादी वस्तू घेण्याच्या नावाखाली ग्राहकांची फसवणूक होते आहे.