(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Pune crime News : रिल्स बनवताना सावधान! रिल्स बनवण्याच्या नादात तरुणांनी महिलेला उडवलं; महिलेचा मृत्यू
रिल्स बनवण्याच्या नादात महिलेने जीव गमावला आहे. रिल्स बनवण्याच्या नादात तरुणांनी दिलेल्या धडकेत महिलेचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे.
Pune Crime news : रस्त्यावर रिल्स बनवण्याच्या नादात तरुणाई हरवून (Pune crime) गेली आहे. कोणाच्या जीवाची पर्वा न करता रिल्स बनवताना दिसत आहे. रिल्स बनवण्याच्या नादात महिलेने जीव गमावला आहे. रिल्स बनवण्याच्या नादात तरुणांनी दिलेल्या धडकेत महिलेचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. भररस्त्यावर रिल्स बनवत असताना मोटारसायकलने बाजूने चालेल्या दुचाकीला धडक दिल्यानंतर अपघातात महिलेचा मृत्यू झाला आहे. पुण्यातील महंमदवाडी या ठिकाणी ही घटना मंगळवारी संध्याकाळी 5:30 वाजता घडली.
तस्लिमा पठाण (31) असे मृत्यू झालेल्या महिलेचे नाव आहे. याप्रकरणी वानवडी पोलीस ठाण्यात दोन तरुणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आयान शेख आणि झायद शेख या दोन तरुणांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी त्यांना अटक केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, आयान आणि झायद हे दोघे ही जण बाईकवर स्टंट करत सोशल मीडियावर अपलोड करण्यासाठी रिल्स बनवत होते. यावेळी तस्लिमा पठाण या रस्त्यावर दुचाकीवरुन घरी जात होत्या. यावेळी आयान शेख हा बाईक चालवत रिल्स बनवण्यासाठी स्टंट करत होता तर दुसऱ्या बाजूला झायद हा व्हिडिओ काढत होता. दरम्यान यावेळी आयानने तस्लिमा पठाण यांच्या दुचाकीला धडक दिली. या धडकेत पठाण या खाली पडल्या त्यांचा मृत्यू झाला. हा प्रकार घडताच त्या दोघांनी ही तिथून पळ काढला. पोलिसांनी तपास सुरू केल्यानंतर सोशल मीडियावर रिल्स बनवण्यासाठी हे दोघे ही तिथे आले असता ही घटना घडली असल्याने त्या दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
रिल्स बनवणं भोवलं...
सध्या सोशल मीडियावर रिल्स बनवून प्रसिद्ध होणाऱ्यांची संख्या फार आहे. काहीतरी स्टंट करायचा किंवा हुल्लडबाजी करुन प्रसिद्ध होण्याचं फॅड वाढत आहे. त्यामुळे अनेक रिल्स स्टार वेगवेगळे स्टंट करतात. अनेकदा जीवाला धोकादेखील निर्माण होऊ शकतो हे माहित असूनही अनेक लोक प्रसिद्धीसाठी असे घातक असणारे रिल्स करतात. या रिल्सच्या नादात अनेकदा अनेकांनी आपले जीवही गमावले आहेत. काही दिवसांपूर्वी परभणीतून अशीच एक घटना समोर आली होती. परभणीच्या जिंतूर तालुक्यातील बोरी तांडा येथे रिल्स बनवणाऱ्या तरुणांच्या गाडीने पायी जाणाऱ्या जैन मुनींसह एका सेवेकऱ्याला जोरदार धडक दिली आहे. सुदैवाने या अपघातात कोणाचाही मृत्यू झालेला नाही मात्र ही बातमी ताजी असतानाच रिल्सच्या नादात एक महिलेचा जीव गेल्याची घटना घडली आहे.