Nashik ACB Raid : '12 टक्के द्या, अन्यथा वर्क ऑर्डर कॅन्सल करतो', अस उघड झालं नाशिकच्या अधिकाऱ्याचं लाच प्रकरण
Nashik ACB Raid : नाशिकच्या (Nashik) आदिवासी विभागातील लाचखोर अधिकाऱ्याच्या (Bribe Case) घरी घबाड सापडल्यानंतर आता या प्रकरणात नवी माहिती समोर आली आहे.
Nashik ACB Raid : नाशिकच्या (Nashik) आदिवासी विभागातील लाचखोर अधिकाऱ्याच्या (Bribe Case) घरी घबाड सापडल्यानंतर आता या प्रकरणात नवी माहिती समोर आली आहे. टेंडर निघाल्यापासून संबंधित तक्रारदार यांना दिनेशकुमार बागुल (Dineshkumar Bagul) हे टाळाटाळ करत टेंडर निविदा नोंदणी प्रक्रियेसाठी ओळखीतील लोकांना प्राधान्य देत असल्याचे समोर आले आहे.
आदिवासी विकासच्या (Tribal Departement) बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंताला (Executive Engineer) विभागाने ताब्यात घेतले आहे. गेल्या 15 दिवसांपासून एसीबी (Anti Corruption Bureau) बागूलच्या मागावर होते. सेंट्रल किचनच्या (Central Kitchen) कामासाठी 12 टक्के दराने लाच मागितल्याप्रकरणी कारवाई करण्यात आली आहे. त्यानंतर अधिकारी बागुल यांच्या नाशिक (Nashik), पुणे (Pune) व इतर घरावर झाडाझडती सुरु असून आतापर्यंत नाशिकच्या घरातून 98 लाख 63 हजार तर पुण्यातील घरी 45 लाख 40 हजारांची रोख रक्कम हस्तगत करण्यात आली आहे. नाशिक आणि पुणे अशा दोन्ही ठिकाणाहुन एक कोटी 44 लाखांची कॅश सापडली असल्याची माहिती आहे. शिवाय अद्यापही बागुल यांच्या अनेक घरांत झाडाझडती सुरु असून पैसे मोजण्यासाठी मशीनचा वापर केला जात असल्याचे समजते आहे.
दरम्यान या संदर्भात आणखी माहिती समोर आली असून सूत्राच्या माहितीनुसार चार महिन्यांपूर्वी या कामाचे टेंडर निघाले होते. नाशिकच्या त्र्यंबक तालुक्यातील हरसुल मधील मुला मुलींच्या वस्तीगृहातील मध्यवर्ती स्वयंपाक गृहाची उभारणी केली जाणार आहे. यासाठी जवळपास अडीच कोटींचा निधी वापरण्यात येणार आहे. याकामी संबंधित कंपनीने टेंडर निविदा प्रक्रिया पूर्ण केली. मात्र नोंदणीसाठी बागुल यांच्याकडून टाळाटाळ केली जात होती. सदर कामाचे टेंडर हे त्यांच्या ओळखीतल्या धुळे, नंदुरबार येथील लोकांना देण्याचे ठरले होते. मात्र तक्रारदार यांनी आधीच टेंडर प्रक्रिया पूर्ण केल्याने इतर तीन संस्था यातून बाहेर पडल्या.
त्यानंतर टेंडर प्रक्रिया सुरु झाली, मात्र सुरवातीपासून टक्केवारीची भानगड सुरु झाल्याचे तक्रारदार यांनी सांगितले. मग क्लर्क पासून अकाउंटवाले यामध्ये आले. वर्क ऑर्डरसाठी 05 ऑगस्टला आदिवासी विभागातील संबंधित कार्यकारी अभियंता बागुल यांच्याकडे गेल्यानंतर यावेळी त्यांनी थेट टेंडर निधीतून 12 टक्क्यांची मागणी केली. '12 टक्के द्या, वर्क ऑर्डर घेऊन जा'. त्यानंतर सातत्याने 12 टक्क्यांसाठी तगादा लावण्यात आला. मात्र एवढं मोठं काम असल्याने वर्क ऑर्डर कॅन्सल करता येणार नव्हती. शेवटी एसीबी ऑफिसला जाऊन यासंदर्भात एसीबी अधिकारी कडासने यांच्याकडे रीतसर तक्रार करण्यात आली. त्यानुसार सापळा रचत काल सायंकाळी बागुल यांच्यावर 28 लाखांची लाच घेताना अटक करण्यात आली आहे.
पुण्यातही झाडाझडती
दरम्यान दिनेशकुमार बागुल यांच्यावर कारवाई झाल्यानंतर त्यांच्या मालमत्तांच्या संदर्भात सखोल चौकशी करण्यात येत आहे. नाशिकच्या भाड्याने राहत असलेल्या घरातही मध्यरात्री उशिरापर्यंत झाडाझडती सुरू होती. त्यानंतर धुळ्यातील शामली बंगल्यावरही पथक पोहचले असून तेथेही चौकशी सुरु आहे. पुण्यातील आंबेगाव बुद्रुक विश्वविहार सोसायटी येथील निवासस्थानी ACB कडून काल रात्री उशिरापर्यंत कारवाई सुरू होती..या कारवाईच्या दरम्यान त्यांच्या घरातून 45 लाख रुपये कॅश, काही कागदपत्र आणि काही सोन्याचे दागिने सुद्धा सापडल्याची माहिती आहे. पाच अधिकारी काल रात्री उशिरापर्यंत दिनेश कुमार बागुल यांच्या पुण्यातील घरी ही कारवाई करत होते. पंचनामा करून जप्ती करण्यात आली असून यात महत्वपूर्ण कागदपत्रे, एक कोटीहून अधिकची रोकड जप्त केल्याची माहिती आहे.
नेमकं प्रकरण काय?
नाशिकच्या त्र्यंबक तालुक्यातील हरसुल मधील मुला मुलींच्या वस्तीगृहातील मध्यवर्ती स्वयंपाक गृहाची उभारणी केली जाणार आहे. जवळपास अडीच कोटींचा निधी यासाठी वापरण्यात येणार आहे. यासाठी ऑनलाईन निविदा प्रक्रिया पूर्ण झाली आहे. प्रतीची मागणी तसेच कार्यारंभ आदेश देण्याकरता आर के इन्फ्रा कॉन्ट्रो. नावाच्या कंपनीतील तक्रारदाराकडून 12 टक्के दराने मोबदला मागितला. सेंट्रल किचनच्या दोन कोटी चाळीस लाखांच्या वर्कऑर्डरसाठी बागुल यांनी लाच मागितली होती. यामध्ये 28 लाख 80 हजार रुपयांची रक्कम बागुल यांनी राहत्या घरी स्वीकारली.