(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Nashik Unseasonal Rain : नाशिक जिल्ह्यात सर्वाधिक अवकाळी पावसाची नोंद, मार्च महिन्यांत 38 मिमी पावसाची नोंद
Nashik Unseasonal Rain : राज्यात सर्वाधिक अवकाळी नाशिक (Nashik) जिल्ह्यात पडल्याचे हवामान विभागाच्या आकडेवारीतून समोर आले आहे.
Nashik Unseasonal Rain : सद्यस्थितीत नाशिक (Nashik) शहरासह जिल्ह्यातील वातावरण (Climate Change) काही अंशी निवळले असले तरीही मार्च महिन्याच्या पहिल्या दुसऱ्या आठवड्यात नाशिक जिल्ह्याला अवकाळी पावसाने झोडपून काढले आहे. त्यामुळे शेतीपिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान देखील झाले. राज्यात सर्वाधिक अवकाळी नाशिक जिल्ह्यात पडल्याचे हवामान विभागाच्या आकडेवारीतून समोर आले आहे.
यंदाच्या वर्षात शेतकऱ्यांना अनेक संकटांचा सामना करावा लागला. शेतीमालाला भाव मिळत नसताना दुसरीकडे अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले. नाशिक (Nashik City) शहरासह जिल्ह्यात अवकाळी पावसाने सलग आठ दिवस हजेरी लावत शेतकऱ्यांना दुहेरी संकटात पाडले. म्हणजेच मागील आठवड्यपर्यंत वातावरणात गारवा जाणवत होता. मात्र आठवडाभर सुरू असलेल्या अवकाळी पावसामुळे आणि वातावरण बदलामुळे शेतकऱ्यांच्या तोंडचे पाणी पळाले. अवकाळी पाऊस (Unseasonal rain) व गारपिटीमुळे शेत पिकांचे मोठे नुकसान झाले. मागील 25 दिवसांत राज्यात सर्वाधिक अवकाळी पाऊस नाशिक जिल्ह्यात झाला असून सुमारे 38.6 मिमी इतका पाऊस पडल्याची नोंद हवामान खात्याने केली आहे.
नाशिक जिल्ह्याला (Nashik District) अवकाळी पावसाचा मोठा फटका बसला असून जिल्ह्यात 1 मार्चपासून 25 मार्चपर्यंत 38 मिमी इतका पाऊस पडला. राज्यात इतकी नोंद कुठल्याही जिल्ह्यात अद्याप झालेली नाही, यामुळे शेत पिकांचे नुकसानदेखील नाशिकमध्ये मोठ्या प्रमाणावर झाले आहे. शेतकऱ्याच्या हाताशी आलेले पीक डोळ्यांदेखत गेल्याने बळीराजा हादरला. 16 मार्च ते 20 मार्च या कालावधीत अवकाळी पावसाने जोरदार तडाखा दिला. विजांचा कडकडाट अन् गडगडाटासह झालेल्या वादळी पावसाने शेतमालाचे मोठे नुकसान झाले. या कालावधीत जिल्ह्यातील काही तालुक्यात गारपीट देखील झाली होती. आतापर्यंत जिल्ह्यात 38.6 मिमी इतका पाऊस पडल्याची नोंद झाली.
प्रमुख शहरांमधील अवकाळी पाऊस
दरम्यान राज्यातील प्रमुख शहरांमधील अवकाळी पाऊस नोंद पाहिली असता सर्वाधिक पाऊस नाशिक जिल्ह्यात झाल्याची नोंद हवामान विभागात करण्यात आली आहे. यात मुंबई 25.8, पुणे 9.7, छत्रपती संभाजीनगर 29.4, सातारा 10.6, सांगली 8.8, जळगाव 12.6, अकोला 14.4 परभणी 6.6, नागपूर 1.9 असा अवकाळी पाऊस बरसला आहे. अवकाळी पावसाने मागील आठवडाभरापासून विश्रांती घेतली आहे. हवामान कोरडे व आकाश निरन राहू लागल्याने शेतकयांनी सुटकेचा निःश्वास सोडला आहे.
आठ हजार हेक्टरवरील पिकाचे नुकसान
नाशिक जिल्ह्यात पाच दिवसांपासून सुरू असलेल्या अवकाळी पावसाने सध्या विश्रांती घेतली असली तरी पाऊस आणि गारपिटीमुळे जिल्ह्यातील 8079 हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे. जिल्ह्यातील बहुतांश गावांना अवकाळीचा तडाखा बसला असून पिकांचे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांची संख्या 21 हजार 750 इतकी आहे.