Maharashtra Assembly Elections 2024 : इगतपुरी विधानसभेत मनसेनं पत्ता टाकला, शिंदेंच्या शिवसेनेतील नेत्याला तिकीट, हिरामण खोसकरांना तगडं आव्हान
Igatpuri-Trimbakeshwar Assembly Constituency : इगतपुरी-त्र्यंबकेश्वर विधानसभा मतदारसंघात मनसेकडून उमेदवार जाहीर करण्यात आला आहे. यामुळे या मतदारसंघात तिरंगी लढत होणार आहे.
नाशिक : महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024 चे (Maharashtra Assembly Elections 2024) बिगुल वाजले आहे. सर्वच राजकीय पक्षांकडून निवडणुकीसाठी जोरदार तयारी केली जात आहे. राज्यात महायुती (Mahayuti) आणि महाविकास आघाडीत (Mahavikas) लढत होत असून राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने' एकला चलो रे'चा नारा दिला आहे. मनसेकडून (MNS) राज्यात 225 ते 250 जागा लढवण्यात येणार आहे. आता इगतपुरी-त्र्यंबकेश्वर विधानसभा मतदारसंघात (Igatpuri-Trimbakeshwar Vidhan Sabha Constituency) मनसेकडून उमेदवार जाहीर करण्यात आला आहे.
2019 सालच्या निवडणुकीत काँग्रेसच्या तिकीटावर निवडून आलेले हिरामण खोसकर (Hiraman Khoskar) यांनी अलीकडेच अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला आहे. महायुतीत अजित पवार यांच्याकडून हिरामण खोसकर यांना पुन्हा एकदा संधी देण्यात आली आहे. तर हिरामण खोसकर यांच्या विरोधात महाविकास आघाडीत काँग्रेसने लकी जाधव (Lucky Jadhav) यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवण्यात आले आहे.
मनसेकडून काशिनाथ मेंगाळ यांना उमेदवारी
आता मनसेकडून शिंदेंच्या शिवसेनेतून प्रवेश केलेल्या माजी आमदार काशिनाथ मेंगाळ (Kashiram Mengal) यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. मनसेच्या काशिनाथ मेंगाळ यांच्यामुळे महायुतीचे उमेदवार हिरामण खोसकर यांच्या समोरील आव्हान वाढणार असल्याचे दिसून येत आहे. आता इगतपुरी विधानसभा मतदारसंघात महायुतीचे हिरामण खोसकर, महाविकास आघाडीचे लकी जाधव आणि मनसेचे काशिनाथ मेंगाळ यांच्यात तिरंगी लढत पाहायला मिळणार आहे.
मनसेकडून आयारामांना संधी
दरम्यान, मनसेकडून आयारामांना संधी दिली जात असल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. कारण नाशिक पश्चिम विधानसभा मतदारसंघात भाजपमधून आलेल्या दिनकर पाटलांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. त्यांचा सामना भाजपच्या सीमा हिरे आणि ठाकरे गटाचे सुधाकर बडगुजर यांच्याशी होणार आहे. तर आता इगतपुरीत शिंदे गटातून मनसेत आलेल्या काशिनाथ मेंगाळ यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवण्यात आले आहे. त्यामुळे इगतपुरी नेमकी कोण बाजी मारणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
2019 विधानसभा निवडणुकीतील स्थिती
• हिरामण खोसकर (काँग्रेस) : 86,561
• निर्मला गावित (शिवसेना) : 55,006
• लकी जाधव (वंचित बहुजन आघाडी) : 9,975
• योगेश शेवरे (मनसे) : 6,566
इतर महत्त्वाच्या बातम्या