पुणे साखळी बॉम्बस्फोटातील आरोपीला हायकोर्टाकडून जामीन; 12 वर्षानंतर तुरुंगाबाहेर येणार फारुख बागवान
पुणे साखळी बॉम्बस्फोट प्रकरणात जामीन मिळालेल्या अन्य आरोपींप्रमाणेच बागवानवर आरोप असून समानतेच्या आधारावर बागवानला देखील जमीन मिळण्याचा अधिकार असल्याच निरीक्षण मुंबई उच्च न्यायालयाने नोंदवले आहे.

मुंबई : पुणे साखळी बॉम्बस्फोटांमधील (Pune) आरोपीला 12 वर्षानंतर जामीन मंजूर करण्यात आला आहे. त्यामुळे, आता आरोपी फारुख बागवानची लवकरच तुरुंगातून सुटका होईल. यापूर्वी, 19 जानेवारी 2023 रोजी याच प्रकरणातील दुसरा आरोपी असलम शब्बीर शेख उर्फ बंटी जहागीरदारला मुंबई हायकोर्टाने (Highcourt) जामीन मंजूर केला होता. 2013 मध्ये जहागीरदारला अटक करण्यात आली होती. आता, 2012 सालच्या साखळी स्फोट प्रकरणातील आरोपी फारुख बागवानला जामीन मंजूर करण्यात आला आहे. आरोपी हा खटल्याविना 12 वर्षे कारागृहात असल्याने न्यायालयाने जामीन (Bail) मंजूर केला आहे. बागवान विरोधात या प्रकरणाव्यतिरिक्त इतर कोणताही गुन्हा दाखल नसल्याच कोर्टाने निकालात नमूद केलं आहे.
पुणे साखळी बॉम्बस्फोट प्रकरणात जामीन मिळालेल्या अन्य आरोपींप्रमाणेच बागवानवर आरोप असून समानतेच्या आधारावर बागवानला देखील जमीन मिळण्याचा अधिकार असल्याच निरीक्षण मुंबई उच्च न्यायालयाने नोंदवले आहे. खटला जलदगतीने निकाली निघण्याचा मूलभूत अधिकार प्रत्येक आरोपीला आहे. मात्र, बागवानविरुद्धचा खटला नजीकच्या काळात निकाली निघण्याची शक्यता दुर्मिळ असल्याचे निरीक्षणही मुंबई उच्च न्यायालयाने जामीन अर्जावरील सुनावणीवेळी नोंदवले आहे. त्यामुळे, आरोपी फारुख बागवानला मोठा दिलासा मिळाला आहे.
काय आहे नेमकं प्रकरण
पुण्यातील जंगली महाराज रोडवर 1 ऑगस्ट 2012 रोजी पाच साखळी बॉम्बस्फोट झाले होते. या स्फोटामध्ये एक जण जखमी झाला होता. डेक्कन परिसरातील सहा ठिकाणी हे बॉम्ब ठेवण्यात आले होते. त्यातील पाच बॉम्ब काही मिनिटांच्या अंतराने फुटले होते तर एक बॉम्ब फुटला नाही. दहशतवाद्यांकडून हे बॉम्ब तयार करण्यात त्रुटी रहिल्याने मोठी दुर्घटना टळली होती. मात्र, तेव्हा डेक्कन परिसरात मोठ्या प्रमाणात खळबळ उडाली. अनेकांना सुरुवातीला या स्फोटांचं गांभीर्य लक्षात आलं नाह. पण, काही मिनिटांतच काही अंतरावर ठेवण्यात आलेले पाच बॉम्ब सलग फुटल्याने मोठा दहशतवादी हल्ला असल्याचं समोर आलं होतं. त्यानंतर पुण्यातील संपूर्ण यंत्रणा कामाला लागली. स्फोट न झालेला बॉम्बही निकामी करण्यात आला होता.
'या' पाच ठिकाणी ठेवण्यात आले होते बॉम्ब
डेक्कन परिसरातील पाच ठिकाणी हे बॉम्ब ठेवण्यात आले होते. त्यातील पहिला बॉम्ब बालगंधर्व रंगमंदिराजवळ ठेवण्यात आला होता. त्यानंतर मॅकडोनाल्ड कॅफे, देना बँक, गरवारे पूल या ठिकाणीदेखील बॉम्ब ठेवण्यात आले होते. मात्र बॉम्ब बनवण्यात त्रुटी राहिल्याने पुण्यात मोठी जीवितहानी टळली होती.
























