Chhagan Bhujbal : समीर भुजबळ महाविकास आघाडीच्या संपर्कात? छगन भुजबळ यांनी नेमकं सांगितलं; म्हणाले...
Chhagan Bhujbal on Sameer Bhujbal : मंत्री छगन भुजबळ यांचे पुतणे माजी खासदार समीर भुजबळ हे नांदगाव विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक असल्याचे बोलले जात आहे.
नाशिक : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु झाली आहे. त्यातच मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांचे पुतणे माजी खासदार समीर भुजबळ (Sameer Bhujbal) हे नांदगाव विधानसभा मतदारसंघातून (Nandgaon Assembly Elections 2024) निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक असल्याचे बोलले जात आहे. मात्र नांदगावला शिवसेना शिंदे गटाचे सुहास कांदे (Suhas Kande) हे विद्यमान आमदार आहे. सुहास कांदे यांना नांदगावमधून तिकीट मिळणार असल्याचे जवळपास निश्चित झाले आहे. त्यामुळे समीर भुजबळ महाविकास आघाडीच्या (Mahavikas Aghadi) संपर्कात असल्याची चर्चा रंगली होती. तर अपक्ष किंवा महाविकास आघाडीचा उमेदवार म्हणून लढता येईल का? याची चाचपणी समीर भुजबळ यांच्याकडून सुरू असल्याचे बोलले जात होते. आता याबाबत छगन भुजबळ यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
समीर भुजबळ मविआच्या संपर्कात? छगन भुजबळ म्हणाले...
छगन भुजबळ म्हणाले की, समीर भाऊ माझ्याबरोबर आहेत. आम्ही अजितदादा सोबत आहोत. आम्ही काम करत आहोत. तो येवल्यामध्ये काम करणार आहे. आता या बातम्या कशा आल्या. याबाबत माहित नाही. समीर भाऊंनी उभं राहावं, असं तुमच्या मनात आहे का? या बातमीत तथ्य नाही. त्यांना मुंबईमध्ये काम आहे. महाराष्ट्रात इतर ठिकाणी जावं लागेल. नाशिकमध्ये लक्ष ठेवावे लागेल. येवल्यात लक्ष घालावे लागेल, तेव्हा आमचे मागचे सात-आठ आमदार निवडून आले होते तेवढे सगळे निवडून येतील, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे.
लाडकी बहीण योजनेवर काय म्हणाले भुजबळ?
लाडकी बहीण योजनेला आचारसंहितेचा फटका बसणार आहे. तूर्तास ही योजना बंद करण्याचे निवडणूक आयोगाने सुचवले आहे. याबाबत विचारले असता छगन भुजबळ म्हणाले की, आता फार थोड्याश्या महिला उरलेल्या आहेत. बाकी सगळ्यांचे ऑक्टोबर नोव्हेंबरचे पैसे खात्यात जमा झाले आहेत. ज्या काही महिला राहिल्या असतील त्यांच्याबाबत मुख्यमंत्री आणि बाकीचे मंडळी चर्चा करतील. ही योजना केवळ निवडणुकीसाठी असलेली योजना नाही, असे त्यांनी म्हटले.
छगन भुजबळांचा मनोज जरांगेंना टोला
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उमेदवार पाडायचे हे लढायचे याबाबत आज मनोज जरांगे आपली भूमिका स्पष्ट करणार आहेत. याबाबत विचारले असता छगन भुजबळ म्हणाले की, लोकशाही आहे, ते जी भूमिका घेतील ते घेतील. माझं म्हणणं आहे की, त्यांनी उमेदवार उभे करावे. लोकशाहीमध्ये सर्वांना अधिकार आहे. त्यांनी सुद्धा आपले नशीब आजमावून पाहावे. माझ्या सगळ्यांनाच शुभेच्छा आहेत, असा टोला त्यांनी यावेळी मनोज जरांगेंना लगावला.
'त्या' वेळेला निवडणुकीची खरी लढाई सुरू होईल
महायुतीची यादी कधी जाहीर होणार? असे विचारले असता छगन भुजबळ म्हणाले की, शेवटच्या दिवसापर्यंत महाविकास आघाडी असो किंवा महायुती असो काही जागांवर रस्सीखेच होत राहणार आहे. काहीजण फॉर्म देखील भरतील. शेवटच्या दिवशी काही जण माघार घेतील. त्या वेळेला निवडणुकीची खरी लढाई सुरू होईल, असे त्यांनी म्हटले.
आणखी वाचा