Babanrao Gholap : ठाकरेंकडून मुलाला तिकीट मिळालं, बबनराव घोलपांनी शिंदेंची साथ सोडली; राजीनामा देत म्हणाले, शिवसेनेचे फार मोठे उपकार!
Maharashtra Assembly Elections 2024 : देवळाली विधानसभा मतदारसंघात शिंदे गटाचे उपनेते बबनराव घोलप यांचे चिरंजीव योगेश घोलप यांना ठाकरे गटाकडून उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. मुलाला तिकीट मिळाल्याने बबनराव घोलप यांनी शिंदे गटाचा राजीनामा दिलाय.
नाशिक : महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024 ची (Maharashtra Assembly Elections 2024) रणधुमाळी सुरु झाली आहे. राज्यात महायुती (Mahayuti) विरुद्ध महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) सामना रंगणार असून सध्या प्रत्येक पक्षाकडून जागा वाटप केले जात आहे. नाशिकच्या देवळाली विधानसभा मतदारसंघात (Deolali Assembly Constituency) महायुतीत (Mahayuti) अजित पवार (Ajit Pawar) यांच्या राष्ट्रवादीने विद्यमान आमदार सरोज अहिरे (Saroj Ahire) यांना पुन्हा एकदा निवडणुकीच्या रिंगणात उतरवले आहे. तर महाविकास आघाडीत (Mahavikas Aghadi) शिवसेना ठाकरे गटाने माजी आमदार योगेश घोलप (Yogesh Gholap) यांना उमेदवारी जाहीर केली आहे. यानंतर एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे उपनेते बबनराव घोलप यांनी राजीनामा दिला आहे.
ठाकरेंच्या शिवसेनेतील मिलिंद नार्वेकर यांच्यावर टीका करत बबनराव घोलप यांनी ठाकरे गटाला सोडचिठ्ठी दिली होती. यानंतर त्यांनी शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केला होता. ठाकरेंची शिवसेना सोडत असताना अन्याय झाल्याची भावना त्यांनी व्यक्त केली होती. मात्र, ठाकरेंच्या शिवसेनेने मुलाला उमेदवारी दिल्याने बबनराव घोलप यांनी राजीनामा दिलाय. तर समाजाच्या आणि मतदारसंघातील कामांचा शब्दही न पाळल्याने बबनराव घोलप यांनी नाराजी व्यक्त केली आहे.
बबनराव घोलपांचा राजीनामा
बबनराव घोलप यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पाठवलेल्या राजीनाम्यात म्हटले आहे की, मी सहा एप्रिल रोजी आपल्या पक्षात प्रवेश केला होता. त्यात माझ्या समाजाच्या काही मागण्या मागितल्या होत्या व मतदारसंघात काही कामे करण्याचे मान्य केले होते. पण यापैकी एकही मागणी मान्य झाली नाही. त्यामुळे समाज फार नाराज झाला आहे. आता माझ्या मुलाला शिवसेनेने तिकीट देऊन माझ्यावर फार मोठे उपकार केले आहेत. म्हणून मी आपल्या शिवसेना (शिंदे गट) पक्षाचा राजीनामा देत आहे, असे बबनराव घोलप यांनी म्हटले आहे.
सरोज अहिरे, योगेश घोलप पुन्हा आमनेसामने
दरम्यान, 2019 सालच्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या सरोज अहिरे यांनी योगेश घोलप यांचा पराभव केला होता. सरोज अहिरे अजित पवार गटात गेल्याने राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाने या जागेवर दावा केला होता. मात्र अखेर ही जागा आपल्याकडे खेचण्यात शिवसेना ठाकर गटाला यश आले आहे. शिवसेना ठाकरे गटाने माजी आमदार योगेश घोलप यांना उमेदवारी दिली आहे. त्यामुळे 2019 च्या निवडणुकीप्रमाणे सरोज अहिरे आणि योगेश घोलप पुन्हा एकदा या निवडणुकीत आमने-सामने येणार आहेत.
आणखी वाचा
नवाब मलिकांपासून भाजप दोन हात लांब राहणार! बड्या नेत्यानं थेट भूमिकाच जाहीर करून टाकली