Kalaram Mandir : काळाराम मंदिरात आकर्षक द्राक्षांची सजावट; दर्शनासाठी भाविकांच्या लांबच लांब रांगा
Nashik News : देशभरात राम मंदिर लोकार्पण सोहळ्याचा उत्साह आहे. नाशिकच्या सुप्रसिद्ध काळाराम मंदिरात आकर्षक द्राक्षांची सजावट करण्यात आली आहे. ही सजावट भाविकांचे लक्ष वेधून घेत आहे.
Kalaram Mandir नाशिक : अयोध्येतील राम मंदिराचा प्राणप्रतिष्ठा सोहळा (Ayodhya Ram Mandir Inauguration) आज सोमवारी पार पडत आहे. रामाची जुनी मूर्ती राममंदिरात आणण्यात आली. गाभाऱ्याचे द्वार खुले करण्यात आले आहे. राममंदिर परिसरात चैतन्याचं आनंदाचं वातावरण आहे. 12 वाजून 29 मिनिटांनी श्रीरामाची प्राणप्रतिष्ठा होणार आहे. यानिमित्त नाशिकचे काळाराम मंदिरदेखील सजवण्यात आले आहे.
आज देशभरात राम मंदिर लोकार्पण सोहळ्याचा उत्साह आहे. अनेक वर्षांच्या तपश्चर्येनंतर अखेर सोमवारी प्रभू श्री राम त्यांच्या नव्या, भव्यदिव्य महालात विराजमान होणार आहेत. आज रामललाच्या श्री विग्रहाचा अभिषेक करण्याचा ऐतिहासिक विधी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यासह संत समाज आणि विशेष लोकांच्या उपस्थितीत होणार आहे. या सोहळ्याची देशासह विदेशातील भाविक आतुरतेने वाट पाहत आहेत.
काळाराम मंदिरात दर्शनासाठी भाविकांची गर्दी
नाशिकमध्ये देखील राम मंदिर लोकार्पण सोहळ्यानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. तसेच नाशिकच्या सुप्रसिद्ध काळाराम मंदिरात (Kalaram Mandir) आकर्षक अशी द्राक्षांची सजावट करण्यात आली आहे. सकाळपासूनच भाविकांनी प्रभू रामाचे दर्शन घेण्यासाठी मोठ्या प्रमाणावर गर्दी केल्याचे चित्र आहे. काळाराम मंदिरात करण्यात आलेली द्राक्षांची सजावट भाविकांची लक्ष वेधून घेत आहे.
मनसेकडून ५१ हजार मोतीचूर लाडूंचे वाटप
नाशिक मनसेच्या वतीने काळाराम मंदिरात महाआरतीचे आयोजन करण्यात आले. यासोबतच 51 हजार मोतीचूर लाडूंचा काळारामाला नेवैद्य दाखवत प्रसाद म्हणून या लाडूंचे शहरभरात वाटप केले जाणार आहे. गेल्या काही दिवसांपासून मनसे लाडू बनवत असल्याने मनसेचे नाशिकमधील कार्यालय भगवेमय झाल्याचे दिसून आले.
उद्धव ठाकरे नाशिकला घेणार प्रभू श्रीरामाचे दर्शन
आज अयोद्धेत प्रभू श्रीराम मंदिरात प्राणप्रतिष्ठा सोहळा होतोय. ठाकरे गट आज काळाराम मंदिरात श्रीरामाची पूजा आणि महाआरती करेल. उद्या अधिवेशन होणार आहे. आज साडेबारा वाजत उद्धव ठाकरे यांचे ओझर विमानतळावर आगमन होईल. त्यानंतर ते स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारकाला भेट देतील. सायंकाळी काळाराम मंदिर आणि गोदा आरतीला जातील, अशी माहिती ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी नाशिक येथील पत्रकार परिषदेत दिली आहे.
आणखी वाचा