(Source: ECI/ABP News/ABP Majha)
उद्योगमंत्र्यांचं नाशिककरांना मोठं गिफ्ट? उदय सामंत म्हणाले, डिसेंबरच्या आधीच मोठा प्रकल्प येणार...
Uday Samant : डिसेंबरच्या अगोदर अपेक्षेपेक्षा मोठा प्रकल्प नाशिकमध्ये येतोय. यातून हजारो तरुणांना रोजगार मिळेल, असे वक्तव्य उद्योग मंत्री उदय सामंत यांनी केले आहे.
नाशिक : डिसेंबरच्या अगोदर अपेक्षेपेक्षा मोठा प्रकल्प नाशिकमध्ये (Nashik News) येतोय. यातून हजारो तरुणांना रोजगार मिळेल, असे वक्तव्य राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत यांनी केले आहे. महाराष्ट्र सरकारच्या वतीने उद्योग भरारी कार्यक्रमाचे आयोजन नाशिकमध्ये करण्यात आले. या कार्यक्रमात ते बोलत होते. उदय सामंत (Uday Samant) यांच्या वक्तव्यानंतर नाशिककरांना मोठं गिफ्ट मिळणार का? अशा चर्चांना उधाण आले आहे.
उदय सामंत म्हणाले की, मागील सरकारच्या काळात काय झाले यात मला जायचे नाही. पण आम्ही जे काम केले ते पाहून तुम्ही आमच्या सोबत राहा. कोल्हापूरमध्ये 75 कोटी रुपयांचे मुलभूत सुविधा देण्याचे मागणी होती, आम्ही 200 कोटीची कामे केली आहेत. महाराष्ट्र परकीय गुंतवणुकीमध्ये 3 नंबरवरून 1 नंबरवर आला आहे, असे त्यांनी म्हटले.
डिसेंबरच्या अगोदर अपेक्षेपेक्षा मोठा प्रकल्प नाशिकमध्ये येतोय
ते पुढे म्हणाले की, उद्योग विभागावर टीका झाली असली तरी मी गेल्यावर हजार लोक गोळा होतात याचा अर्थ आमचा विभाग ट्रॅकवर काम करतोय. चार पाच दिवसात आचारसंहिता लागेल. आमची कामे पूर्ण करा, अशी मागणी होत आहे. तुम्ही त्याची चिंता करू नका पुढेही आम्हीच येणार आहोत. सगळी कामे एका फटक्यात केली तर तुमच्याकडे कोणी येणार नाही असा सल्ला मला एका नेत्याने दिला. मूलभूत सुविधा देण्याची जबाबदारी आमची आहे. पण त्या उद्योजकाला पटले पाहिजे इथे फायदा होईल. डिसेंबरच्या अगोदर अपेक्षेपेक्षा मोठा प्रकल्प नाशिकमध्ये येतोय. हजारो तरुणांना रोजगार मिळेल, असेही उदय सामंत यांनी म्हटले.
...तर आम्ही कारवाई करणार
दोन वर्षात 32 हजार 700 तरुणांना उद्योजक केले. आजही बँकेत अडचणी असतील. पण मी बँकांना सांगितले की, मोठा उद्योजक असेल तर त्याच्या बेडरूम किचनमध्ये जातात. पण, एका तरूणाला 10 लाखाचे कर्ज देत नाही. एखाद्या तरुणाने या बाबतीत तक्रार केली तर आम्ही कारवाई करण्यास मागेपुढे बघणार नाही.
आजची तारीख लिहून ठेवा, पुढच्या वर्षी...
गडचिरोली मध्ये 75 ते 80 हजाराची गुंतवणूक होतेय. आजची तारीख लिहून ठेवा. पुढच्या वर्षी गडचिरोलीचा नक्षलवाद हा शब्द निघून जाईल आणि स्टील इंडस्ट्री असे नाव होईल. एकही उद्योजक सुरतला गेला नाही, माझ्याकडून बॉण्डवर लिहून घ्या. 50 हजार कोटींचे जेम्स अँड ज्वेलरी पार्क हे सर्वात मोठे पार्क महाराष्ट्रात होत आहे. आम्ही बोलत नाही, पण आता बोलण्याची वेळ आली आहे. नाहीतर आम्ही काही केले नाही, असे म्हणतील.
महाराष्ट्र जगात एक नंबर येईल
राजकारणासाठी राजकारण करायचे नाही. विधायक कामासाठी असावे हा आमचा विचार आहे. अधिकाधिक लाभार्थ्यांपर्यंत पोहचण्यासाठी हा उपक्रम आहे. लाडकी बहीण योजनेचा फायदा केवळ त्या महिलेला नाही तर ती ज्या वस्तु खरेदी करते त्यांना मिळतो. त्याचा फायदा उद्योजक क्षेत्राला आहे. राजकारणाच्या वेळी राजकारण करू. ज्यांना शिव्या घालायच्या आहेत त्यांना घालू द्या. महाराष्ट्र जगात एक नंबर येईल, एवढी क्षमता इथल्या तरुणांमध्ये आहे. इथले आयटी क्षेत्रातील मुले राज्यात राहिले तर राज्य पुढे जाईल. शेतीवर आधारित मँगो पार्क आणि इतर प्रकल्प आम्ही कोकणात करतोय. कोकणात उद्योग आला तर विरोध होतो पण आम्ही आता प्रकल्प आणतोय. आमच्या बद्दल चांगले बोलले तर तुम्हाला खोका मिळाला का असा गैरसमज नको. दोन अडीच वर्षात 6 ते 7 वेळा आलो आधीचे मंत्री किती वेळा आले? आपण उद्योग परिषद सुरू केली. यावर टीका झाली. पण दावोसला गेल्यावर जसे आम्हाला रेड कार्पेट टाकले तसे स्थानिक लोकांना मिळाला पाहिजे हा उदेश होता. त्यात 90 हजार कोटीची गुंतवणूक झाली, असेही त्यांनी यावेळी सांगितले.
आणखी वाचा
जमलेल्या माझ्या तमाम...दसरा मेळाव्याला शिवतीर्थावर ठाकरेंचाच आवाज; अखेर महापालिकेकडून परवानगी