नाशिकच्या जागेवरून हाय व्होल्टेज ड्रामा! शांतीगिरी महाराजांनी भरला शिवसेनेकडून अर्ज, इच्छुक उमेदवार हेमंत गोडसे म्हणाले...
Nashik Lok Sabha Constituency : शांतीगिरी महाराजांनी शिवसेना शिंदे गटाकडून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. यावर शिंदे गटाचे इच्छुक उमेदवार हेमंत गोडसे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
Hemant Godse on Shantigiri Maharaj : नाशिक लोकसभा मतदारसंघाच्या जागेचा अजूनही तिढा महायुतीत (Mahayuti) अजूनही सुटलेला नाही. त्यातच नाशिकमधून अपक्ष निवडणूक लढवत असलेले शांतीगिरी महाराज (Shantigiri Maharaj) यांनी आज शिवसेना शिंदे गटाकडून (Shiv Sena Shinde Faction) उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यामुळे नाशिकच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली. यावर आता शिवसेना शिंदे गटाचे विद्यमान खासदार आणि इच्छुक उमेदवार हेमंत गोडसे (Hemant Godse) यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.
गेल्या अनेक दिवसांपासून महायुतीत नाशिकच्या जागेसाठी जोरदार रस्सीखेच सुरु आहे. एकीकडे हेमंत गोडसे यांनी पुन्हा एकदा उमेदवारीसाठी वारंवार ठाणेवारी करत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्याशी अनेकदा चर्चा केली आहे. तर दुसरीकडे राष्ट्रवादी अजित पवार गटाचे (NCP Ajit Pawar Faction) मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) हे देखील नाशिकमधून लोकसभेसाठी इच्छुक होते. मात्र काही दिवसांपूर्वी त्यांनी अचानक लोकसभेतून माघार घेतली. त्यानंतर राष्ट्रवादीचे आमदार माणिकराव कोकाटे (Manikrao Kokate) यांचे नाव चर्चेत आले. तसेच महंत अनिकेत शास्त्री (Aniket Shastri) हे देखील भाजपकडून (BJP) इच्छुक असून भाजपकडून आपल्यालाच उमेदवारी मिळणार, असा दावा केलाय. त्यातच शांतीगिरी महाराजांनी शिवसेना शिंदे गटाकडून उमेदवारी अर्ज दाखल केल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.
नाशिकच्या जागेबाबत सर्व निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे घेतील - हेमंत गोडसे
यावर हेमंत गोडसे म्हणाले की, कुठल्याही उमेदवारी अर्जाला एबी फॉर्मची आवश्यकता असते. ए फॉर्मवर नेत्याची सही आवश्यक असते. नाशिकच्या जागेबाबत सर्व निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे घेतील. अजून कुठलाही निर्णय झालेला नाही. नाशिकच्या जागेबाबत उद्या संध्याकाळपर्यंत उमेदवाराच्या नावाची घोषणा होईल. राज्यातील चार ते पाच जागांचा तिढा कायम आहे. नाशिकची निवडणूक शेवटच्या टप्प्यात मतदान होणार आहे. त्यामुळे वेळ लागत असावा. काही विषयांच्या अफवा असू शकतात असं मला वाटतं, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे.
उमेदवारी अर्ज दाखल केल्यावर काय म्हणाले शांतीगिरी महाराज?
हा निर्णय आमच्या लोकसभा कमिटीने घेतला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या पक्षाकडून आज फॉर्म भरला आहे. मागे मुख्यमंत्र्यांची भेट घेतली त्यावेळी आमचे सगळे मुद्दे त्यांनी शांततेने ऐकून घेतले. मुद्द्यांच्या आधारे आपण निर्णय नंतर करू, असे मुख्यमंत्र्यांनी म्हटले होते. जय बाबाजी भक्त परिवाराने विडा उचलला आहे की, या वेळेला लढायचं आणि जिंकायचं. पक्षाच्या एबी फॉर्मबाबत आमचे वकील आणि भक्त परिवार ते निर्णय घेतील, असे त्यांनी म्हटले आहे.
आणखी वाचा