Hemant Godse : उमेदवारीसाठी हेमंत गोडसेंची पुन्हा मुंबईवारी, मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी दाखल, नाशिकच्या जागेबाबत रस्सीखेच सुरूच
Nashik Lok Sabha : महायुतीत नाशिक लोकसभा मतदारसंघाचा तिढा अजूनही सुटलेला नाही. त्यामुळे विद्यमान खासदार हेमंत गोडसे हे पुन्हा एकदा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाण्यातील निवासस्थानी दाखल झाले.
Nashik Lok Sabha Election 2024 : महाविकास आघाडीकडून (Mahavikas Aghadi) शिवसेना ठाकरे गटाने (Shiv Sena UBT) नाशिक लोकसभा मतदारसंघासाठी सिन्नरचे माजी आमदार राजाभाऊ वाजे (Rajabhau Waje) यांना उमेदवारी जाहीर केली. राजाभाऊ वाजे यांनी प्रचारात आघाडीदेखील घेतली आहे. तर महायुतीत (Mahayuti Seat Sharing) मात्र नाशिकच्या जागेचा तिढा अजूनही सुटलेला नाही.
शिवसेना शिंदे गटाचे नाशिकचे विद्यमान आमदार हेमंत गोडसे (Hemant Godse) हे नाशिकच्या जागेवरून पुन्हा एकदा उमेदवारी मिळण्यासाठी कमालीचे आग्रही आहे. तर दुसरीकडे राष्ट्रवादी अजित पवार गटाचे मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) हे देखील नाशिकच्या जागेवरून निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहेत.
हेमंत गोडसे पुन्हा एकदा मुख्यमंत्र्यांच्या भेटीला
हेमंत गोडसे यांनी उमेदवारीसाठी याआधी चार ते पाच वेळा ठाणे गाठले होते. आता पुन्हा एकदा हेमंत गोडसे ठाण्यात दाखल झाले आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या ठाण्यातील शुभ-दीप निवासस्थानी ते पोहोचले आहेत. दोन दिवसांपूर्वी खासदार श्रीकांत शिंदे यांच्यासोबत हेमंत गोडसे यांनी नाशिक लोकसभेच्या जागेवरून चर्चा केली होती.
जागा वाटपाची चर्चा होणार?
नाशिकची जागा शिवसेनेला (Shiv Sena) सुटावी असा हेमंत गोडसे यांचा आग्रह आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सोबत आज पुन्हा जागावाटपा संदर्भात चर्चा होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. आता नाशिकची जागा शिवसेनेला सुटणार का? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
उमेदवारी नक्की कोणाला मिळणार? नाशिककरांना उत्सुकता
दरम्यान, नाशिकमधून हेमंत गोडसे आणि छगन भुजबळ यांच्या नावाला विरोध होत असल्याने नाशिकमधून महायुतीकडून पर्यायी उमेदवारांचा शोध घेतला जात आहे. यात भाजपचे आमदार राहुल ढिकले (Rahul Dhikale) आणि शिंदे गटाचे नाशिक जिल्हाप्रमुख अजय बोरस्ते (Ajay Boraste) यांचे नाव आघाडीवर आहे. नुकतीच अजय बोरस्ते हे मुखमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेण्यासाठी ठाण्यात गेले होते. त्यामुळे आता नाशिकची उमेदवारी नक्की हेमंत गोडसे की छगन भुजबळ यापैकी कोणाला मिळणार की महायुती पर्यायी उमेदवाराला संधी देणार? या उत्सुकता नाशिककरांना लागली आहे.
इतर महत्वाच्या बातम्या