गोदावरी गौरव पुरस्कार जाहीर, 10 मार्चला नाशिकमध्ये वितरण, आशुतोष गोवारीकरांसह पाच जणांचा होणार सन्मान
Nashik News : कुसुमाग्रज प्रतिष्ठानच्या वतीने देण्यात येणारे गोदावरी गौरव पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत. 10 मार्चला नाशिकमध्ये या पुरस्कारांचे वितरण होणार आहे.
Godavari Gaurav Puraskar नाशिक : कुसुमाग्रज प्रतिष्ठानच्या वतीने देण्यात येणारे गोदावरी गौरव पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत. 10 मार्चला नाशिकमध्ये या पुरस्कारांचे वितरण होणार आहे. विविध क्षेत्रातील 6 मान्यवरांचा कुसुमाग्रजांच्या नगरीत सन्मान केला जाणार आहे.
लोकसेवा, संगीत नृत्य, चित्रपट, ज्ञान विज्ञान, क्रीडा, चित्र शिल्प आशा विविध विभागातील उल्लेखनीय कार्य करणाऱ्यांचा सन्मान करण्यात येणार आहे. विवेक सावंत (ज्ञान), डॅा.सुचेता भिडे -चापेकर (नृत्य), सुनंदन लेले (क्रीडा), शामसुदीन तांबोळी (लोकसेवा ), आशुतोष गोवारीकर (चित्रपट), प्रमोद तांबोळी (चित्र शिल्प) यांना गोदावरी गौरव पुरस्कार जाहीर झाले आहेत. बी. वाय. के. कॉलेजच्या गुरुदक्षिणा सभागृहात या पुरस्कारांचे वितरण होणार आहे.
विवेक सावंत (ज्ञान)
एमकेसीएलच्या माध्यमातून तंत्रज्ञान आणि नेटवर्किंग क्षेत्रात शिक्षणक्रांती घडविणारे विवेक सावंत यांनी महाराष्ट्र नॉलेज कॉर्पोरेशन लिमिटेड (एमकेसीएल) ची स्थापना केली. डॉ. विजय भटकर यांच्या सीडॅक संस्थेत अॅडव्हॉन्स कॅम्प्यूटर ट्रेनिंग स्कूलच्या स्थापनेत विवेक सावंत यांचा पुढाकार होता. या स्कूलने तब्बल 25 हजार कॅम्प्युटर इंजिनिअर्स घडविले. कुठल्याही ज्ञानशाखेचा पदवीधर कॉम्प्युटर इंजिनिअर होऊ शकतो, हे या अभ्यासक्रमाचे वैशिष्ट्य होते. या प्रक्रियेत विवेक सावंत प्रथमपासून होते. त्यानंतर इंडियन इन्स्टिट्युट ऑफ इन्फर्मेशन टेक्नोलॉजी या संस्थेसाठी सावंत यांनी सेंट्रल सर्व्हरची निर्मिती केली.
डॉ. सुचेता भिडे-चापेकर (नृत्य)
नृत्यशैलीमधील एक अधिकारी मान्यताप्राप्त व रसिकमान्य कलाकार आणि गुरु आहेत आणि या विषयातील संशोधक वृत्तीच्या अभ्यासक व भाष्यकार म्हणून किर्तीमान झालेल्या आहेत. आचार्य पार्वतीकुमार यांच्याकडे भरतनाट्यमची तालीम घेतल्यानंतर त्यांनी आपल्या गुरुप्रमाणे तंजावर येथील भोसले राजांच्या नृत्यविषयक मराठी प्रबंध कवन रचनांवर संशोधन केले आहे. शहाजी राजांनी रचलेल्या या रचना मराठी शैलीतून यशस्वी प्रस्तुत करुन या नृत्यशैलीतील रचना विभागात एक नवी भर टाकली आहे.
भरतनाट्यम या कर्नाटक संगीताशी एकरुप झालेल्या दक्षिणी नृत्यशैलीचा परिपूर्ण आस्वाद महाराष्ट्रातील रसिकांना घेता यावा, या विचाराने हिंदुस्थानी शास्त्रीय संगीत, नाट्यसंगीत आणि भरतनाट्यमची देहबोली यांचा अप्रतिम मेळ साधून त्यांनी या क्षेत्रात संधोधनाचे आणखी एक पाऊल पुढे टाकले आहे. या त्यांच्या सृजनात्मक कार्याने नृत्यगंगा या नवनिर्मित अभिजात नृत्यशैलीचे योगदान महाराष्ट्रातील नृत्य कलेला लाभले आहे.
सुनंदन लेले (क्रीडा)
सीबीओसिस संस्थूतून मॅनेजमेंटची डिग्री घेललेल्या आणि शाळेपासून क्रिकेट खेळणान्य सुनंदन लेले ह्यांनी प्रथम महाराष्ट्राच्या 19 वर्षाखालच्या संघाचे नेतृत्व केले. पश्चिम विभागाचे ते उपकप्तान होते. सुनंदन लेले महाराष्ट्राच्या 22 वर्षांखालच्या संघातून तसेच पुणे विद्यापीठाच्या संघातूनही खेळले आहेत. त्यांनी 35 वर्षे मुक्त पत्रकार म्हणून काम केले आहे. पाक्षिक षटकार, साताराचे दैनिक ऐक्य, नाशिकचे दैनिक गावकरी, बेळगावचे दैनिक तरुण भारत या सारख्या वर्तमानपत्रातून लेले यांनी स्तंभ लेखन केले आहे.
डॉ. शमसुद्दीन तांबोळी (लोकसेवा)
मुस्लीम सत्यशोधक मंडळाचे अध्यक्ष आणि मुस्लिम सत्यशोधक पत्रिकेचे संपादक असलेले डॉ. शमसुद्दीन तांबोळी हे राष्ट्रीय एकात्मता समितीचे निमंत्रक आहेत. तसेच महाराष्ट्र राज्य भाषा सल्लागार समितीचे सदस्य आहेत. पुणे येथील मराठवाडा मित्र मंडळाच्या वाणिज्य महाविद्यालयातून उपप्राचार्य म्हणून सेवानिवृत्त झालेले डॉ. तांबोळी यांचे सामाजिक कार्यात आणि लोकसेवेत मोठे योगदान आहे.
आशुतोष गोवारीकर (चित्रपट)
प्रसिध्द चित्रपट दिग्दर्शक, अभिनेता, पटकथा लेखक आणि निर्माता असलेले आशुतोष गोवारीकर उत्कृष्ट कलानिर्मितीचा ध्यास असणारे आणि मोठ्या कॅनव्हासवर चित्रपटचे दिग्दर्शन करण्यासाठी ओळखले जातात. लगान (2001) स्वदेश (2004) जोधा अकबर (2008) या 'भव्य चित्रपटांचे दिग्दर्शन त्याच बरोबर लगान आणि जोधा अकबरसाठी सर्वोत्कृष्ट दिग्दर्शनाचा फिल्मफेअर पुरस्कार त्यांना मिळाला आहे. लगानला 74 व्या अकादमी पुरस्कारांमध्ये सर्वोत्कृष्ट आंतरराष्ट्रीय फिचर फिल्मसाठी नामांकन मिळाले होते. 1984 मध्ये होळी या चित्रपटातून अभिनेता म्हणून कारकिर्दीला सुरुवात केलेल्या गोवारीकर यांनी मराठी चित्रपट आणि टेलिव्हिजन मालिकांमध्ये काम केले.
प्रमोद कांबळे (चित्र)
आपल्या अप्रतिम कलाकृतींद्वारे मान्यता मिळालेल्या प्रमोद कांबळे यांच्या कला विश्वाची महती जगभर पसरलेली आहे. भारतीय लष्करासाठी केलेले कॅव्हेलरी स्पिरीट हे भव्य बॉन्झ शिल्प, एम आय आर या लष्करी संस्थेसाठी केलेले वॉर मेमिरियल, विश्वचषक क्रिकेट स्पर्धेच्या वेळी वानखेडे स्टेडिअममध्ये उभारण्यात आलेला विक्रमवीर सचिन तेंडूलकर यांचा पुतळा यासह अनेक शिल्पे प्रसिध्द आहेत. प्रमोद कांबळे यांची अनेक प्राणिशिल्पे भारतात आणि भारताबाहेरही कलाकृतींचा उत्तम नमुना म्हणून प्रसिध्द आहेत. काळा घोडा फस्टिवल मध्ये 'विविध प्राण्यांचा पर्यावरण रक्षणासाठीचा मोर्चा' या कलाकृतीला फार मोठा प्रतिसाद लाभला होता.
आणखी वाचा