Girish Mahajan : फडणवीसांवरील उद्धव ठाकरेंच्या टीकेवर महाजनांचे प्रत्युत्तर, म्हणाले, 'आता तुमचाच पिक्चर बघण्याची वेळ लोकांवर आलीय'
Girish Mahajan : तुम्ही एवढ्या मोठ्या 4-5 जणांच्या पक्षाचे प्रमुख आहात, पक्ष वाढवण्यासाठी प्रयत्न करा, तुमचाच पिक्चर बघण्याची वेळ आता लोकांवर आली आहे, असा टोला गिरीश महाजनांनी उद्धव ठाकरेंना लगावला.
Girish Mahajan on Uddhav Thackeray : शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर (Devendra Fadnavis) टीकास्त्र डागले. देवेंद्र फडणवीसांनी एखादा बॉलिवूड निर्माता शोधून मणिपूर फाईल्स चित्रपट काढावा, असे त्यांनी म्हटले. उद्धव ठाकरेंच्या टीकेला मंत्री गिरीश महाजनांनी (Girish Mahajan) जोरदार प्रत्युत्तर दिले आहे.
गिरीश महाजन म्हणाले की, जसजश्या निवडणुका जवळ येतील आणि निकाल समजतील तेव्हा अजून काय काय ते बोलतील. त्यांची मजल कुठपर्यंत जाईल हे सांगता येणार नाही. महाराष्ट्रात तुम्ही फार तर एखाद - दुसरी जागा निवडून येतो का ते बघा. तुम्ही एवढ्या मोठ्या 4-5 जणांच्या पक्षाचे प्रमुख आहात, पक्ष वाढवण्यासाठी प्रयत्न करा, असा टोला गिरीश महाजनांनी उद्धव ठाकरेंना लगावला.
तुमचाच पिक्चर बघण्याची वेळ आता लोकांवर आली
ते पुढे म्हणाले की, तुमचाच पिक्चर बघण्याची वेळ आता लोकांवर आली आहे. आपला पिक्चर नाटक होणार नाही याची काळजी घ्या. त्यांच्याकडे होते तेव्हा सगळे चांगले होते आणि आता वॉशिंग मशीन झाले आहे. आता त्यांच्याकडे काही मुद्दे राहिले नाही म्हणून आता वॉशिंग मशीन, खोके बडबडतायत, अशी टीकाही त्यांनी उद्धव ठाकरेंवर केली आहे.
काय म्हणाले होते उद्धव ठाकरे?
देवेंद्र फडणवीस यांचा राहण्या-खाण्याचा येण्या-जाण्याचा मी खर्च करतो. त्यांनी मणिपूर आणि लडाखला जाऊन यावे. तेथील परिस्थिती पाहावी. अरुणाचल प्रदेश आणि दार्जिलिंगला जावे. निर्वासित काश्मिरी पंडितांना भेटावे. बॉयकॉट बॉलीवूड म्हणणारे बॉलीवूडच्या नादी लागलेत, त्यामुळे एखादा प्रोड्युसर घेऊन त्यांनी मणिपूर फाईल्स चित्रपट काढावा, असे टीका उद्धव ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर केली होती.
गिरीश महाजनांचा सुप्रिया सुळेंना टोला
खासदार सुप्रिया सुळे यांनी राज्यात गुन्हेगारी वाढल्याचा आरोप केला आहे. यावर गिरीश महाजन म्हणाले की, गृहखातं तुमच्याकडे होते किती सक्षम त्यांनी हाताळले हे आपण बघितले आहे. ताईंना म्हणा तुमची आम्ही काळजी घेऊ, रोहित पवार असेल किंवा कुटुंबाची काळजी घेऊ. कायदा सुव्यवस्था उत्तम आहे, तुम्ही आपल्या पक्षाकडे लक्ष द्या. हे मुद्दे ऐकून लोक तुम्हाला मतदान करणार नाही, लोकसभा आहे जमणार नाही, असा टोला गिरीश महाजनांनी लगावला.
आणखी वाचा