Jitendra Awhad : जितेंद्र आव्हाडांविरोधात गुन्हा दाखल करा; नाशिकचे साधू महंत पोलीस ठाण्यात
जितेंद्र आव्हाडांच्या वक्तव्यानंतर नाशिकच्या साधू महंतांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. नाशिकचे साधू महंत पंचवटी पोलीस ठाण्यात दाखल झाले. आव्हाडांविरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी त्यांनी यावेळी केली.
Jitendra Awhad नाशिक : राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी शिर्डीत (Shirdi) पक्षाच्या शिबिरात प्रभू श्रीराम (Shri Ram) मांसाहारी असल्याचे वक्तव्य केले. यामुळे संपूर्ण राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली. जितेंद्र आव्हाडांच्या वक्तव्यानंतर नाशिकच्या (Nashik) साधू महंतांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. काळाराम मंदिर संस्थानचे महंत सुधीर पुजारी यांच्यासह हिंदू धर्मीय नुकतेच पंचवटी पोलीस ठाण्यात (Panchavati Police Station) वरिष्ठ निरीक्षक अनिल शिंदे यांच्या दालनात पोहोचले आहेत.
जितेंद्र आव्हाडांविरोधात (Jitendra Awhad) गुन्हा दाखल करण्याची मागणी त्यांनी केली आहे. जितेंद्र आव्हाडांच्या वक्तव्यामुळे तमाम हिंदू धर्मियांच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत, त्यामुळे आम्ही आव्हाडांविरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी करत आहोत, असे काळाराम संस्थानचे पुजारी आणि महंत सुधीर पुजारी यांनी म्हटले आहे.
राष्ट्रवादीवर आरोप
राष्ट्रवादी काँग्रेसकडून (NCP) सातत्याने अशी वादग्रस्त व्यक्त होत आहेत. शरद पवार (Sharad Pawar) यांच्या समोरच सातत्याने अशी वादग्रस्त वक्तव्ये राष्ट्रवादी पक्षाचे नेते करत आहेत. राष्ट्रवादीकडून जातीयवादी वक्तव्ये होत असून शरद पवारांचा त्याला पाठींबा आहे, अशी टीका महंतांनी केली आहे.
केंद्र आणि राज्य सरकारने कायदा करावा
रामायणाच्या सहा खंडात राम मांसाहारी होते असा कुठेही उल्लेख नाही. पोलिसात (Police) तक्रार दाखल करणार आहोत तसेच आम्ही कोर्टातदेखील जाणार आहोत. ईशनिंदा कायदा महाराष्ट्र आणि केंद्र सरकारने करावा, जेणेकरून हिंदू देवतांची निंदा-नालस्ती थांबेल, अशी मागणी त्यांनी यावेळी केली आहे.
त्यांना मानसिक उपचाराची गरज
धर्माचे तुम्हाला ज्ञान नाही, तुमचे धर्माचे ज्ञान नाशिकला येऊन शास्त्रार्थ सभेत सिद्ध करा, खोटी प्रसिद्धी बंद करा, आव्हाडांच्या व्यक्तव्याचा तीव्र निषेध आहे. त्यांच्यावर कायदेशीर कारवाई झालीच पाहिजे. त्यांना अटक करावी. त्यांना मानसिक उपचाराची गरज आहे, अशा भावना पोलीस ठाण्याबाहेर हिंदू धर्मियांनी व्यक्त केल्या आहेत. 22 जानेवारीला अयोध्येत राममंदिर सोहळा पार पडणार आहे. नेमके त्याच वेळी जितेंद्र आव्हाड यांनी असे वक्तव्य का केले, असा प्रश्नदेखील साधू महंतांनी उपस्थित केला आहे.
दरम्यान, तुम्ही निवेदन द्या, आम्ही वरिष्ठांशी बोलून कारवाई करू, असे यावेळी पोलिसांनी म्हटले. मात्र साधू महंत गुन्हा दाखल करून घेण्यासाठी आग्रही आहेत. त्यामुळे आता गुन्हा दाखल होतो का नाही हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
इतर महत्वाच्या बातम्या
Sushma Andhare : सुषमा अंधारेंना 'ते' वादग्रस्त वक्तव्य भोवलं; मालेगावात गुन्हा दाखल
जितेंद्र आव्हाडांना अटक करा, राम कदम आक्रमक, राज्यभरात भाजपचं आंदोलन