धुळ्यातून डॉ. शोभा बच्छाव यांना काँग्रेसकडून उमेदवारी, आणखी एका बड्या नेत्याने दिला राजीनामा
Dhule Lok Sabha Election 2024 : धुळे लोकसभा मतदारसंघासाठी काँग्रेसने माजी आरोग्य राज्यमंत्री डॉ. शोभा बच्छाव यांना उमेदवारी जाहीर केली. मात्र त्यांच्या उमेदवारीला आता काँग्रेसकडूनच विरोध केला जातोय.
Dr Tushar Shewale : धुळे लोकसभा मतदारसंघासाठी (Dhule Lok Sabha Constituency) काँग्रेसने माजी आरोग्य राज्यमंत्री डॉ. शोभा बच्छाव (Dr Shobha Bachhav) यांना उमेदवारी जाहीर केली. त्यामुळे आता भाजपचे डॉ. सुभाष भामरे (Dr Subhash Bhamre) विरुद्ध डॉ. शोभा बच्छाव यांच्यात लढत होणार हे स्पष्ट झाले आहे. मात्र शोभा बच्छाव यांना उमेदवारी जाहीर होताच काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी त्यांच्या उमेदवारीला जोरदार विरोध केला आहे.
आज सकाळीच धुळे काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष श्याम सनेर यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. यापाठोपाठ आता नाशिक जिल्हा काँग्रेसचे ग्रामीण अध्यक्ष डॉ. तुषार शेवाळे (Dr Tushar Shewale) यांनीही आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. धुळे लोकसभा मतदारसंघाच्या उमेदवारीसाठी काँग्रेसकडून डॉ. तुषार शेवाळे यांचेही नाव आघाडीवर होते.
उमेदवारीबाबत फेरविचार करण्याची विनंती
आज पत्रकार परिषद घेत डॉ. तुषार शेवाळे यांनी पक्षाच्या वतीने धुळे लोकसभा मतदारसंघातून डॉ. शोभा बच्छाव या मतदार संघाबाहेरील असूनही त्यांना उमेदवारी दिल्याने नाराजी व्यक्त केली. तसेच पत्रकार परिषदेतूनच प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांना राजीनाम्याचा मेल पाठवला. पक्षाने धुळे लोकसभा मतदार संघाच्या उमेदवारीबाबत फेरविचार करण्याची विनंतीही डॉ. शेवाळे यांनी केली.
अडगळीत पडलेल्यांना उमेदवारी दिल्याचा आरोप
डॉ. शेवाळे धुळे लोकसभेसाठी इच्छुक होते. पक्ष बांधणीबरोबर निवडणुकीच्या दुष्टीने मोठ्या प्रमाणावर त्यांनी काम केले आहे. धुळे लोकसभेसाठी सक्षम उमेदवार असताना पक्षाने ऐनवेळी मतदार संघाबाहेरील उमेदवारी लादली. विशेष म्हणजे नाशिक महापालिका क्षेत्रात अडगळीत पडलेल्यांना उमेदवारी दिल्याचा आरोप डॉ. शेवाळे यांनी करीत डॉ. शोभा बच्छाव यांची उमेदवारी कायम राहिल्यास त्यांचे काम न करण्याचा निर्धारही केला. डॉ. शेवाळे यांच्यासह मालेगाव तालुका व जिल्हा काँग्रेस पदाधिकाऱ्यांनीही राजीनामे सादर केले आहेत.
मालेगावमध्ये काँग्रेस कार्यकर्त्यांकडून तीव्र विरोध
दरम्यान, डॉ.शोभा बच्छाव यांच्या उमेदवारीला नाशिकच्या मालेगावमध्ये काँग्रेस कार्यकर्त्यांनी तीव्र विरोध केला. डॉ. बच्छाव या नाराज डॉ.तुषार शेवाळे यांच्या कार्यालयात भेटीसाठी आलेल्या असताना आयात उमेदवार चालणार नाही. शोभा बच्छाव परत जा,अशी जोरदार घोषणाबाजी शोभा बच्छाव यांच्यासमोर कार्यकर्त्यांनी केली.
इतर महत्वाच्या बातम्या