Sanjay Raut : "संजय राऊतांनी वायफळ बडबड करण्यापेक्षा पुरावे सादर करावे"; कोर्टाने सुनावले खडेबोल
Malegaon News : दादा भुसे यांनी संजय राऊतांवर अब्रुनुकसानीचा खटला दाखल केला होता. याप्रकरणी आज मालेगाव न्यायालयात सुनावणी झाली. सुनावणीस संजय राऊत गैरहजर होते. कोर्टाने राऊतांना खडेबोल सुनावले आहे.
Sanjay Raut मालेगाव : वृत्तपत्रातून चुकीचा व बदनामीकारक मजकूर प्रसिध्द केल्याचा आरोप करत नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री दादा भुसे (Dada Bhuse) यांनी शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांवर (Sanjay Raut) अब्रुनुकसानीचा खटला दाखल केला होता. याप्रकरणी आज मालेगाव न्यायालयात (Malegaon Court) सुनावणी झाली. मात्र या सुनावणीस संजय राऊत गैरहजर होते.
मालेगाव न्यायालयात आज संजय राऊत (Sanjay Raut) गैरहजर राहिल्याने त्यांच्या वकिलांनी बाजू मांडली. संजय राऊत गैरहजर राहिल्याबद्दल न्यायालयाने नाराजी व्यक्त केली. न्यायालयाने वकिलांमार्फत राऊतांना सुनावले आहे. राऊतांनी वायफळ बडबड करण्यापेक्षा पुरावे सादर करावे, असे कोर्टाने म्हटले आहे. मंत्री भुसे यांनी न्यायालयात हजर राहून साक्ष नोंदविली. भुसे यांची साक्ष नोंदविल्यानंतर पुढील सुनावणी १६ फेब्रुवारीला होणार असल्याचे कोर्टाने सांगितले.
फौजदारी गुन्हा दाखल करण्याची मागणी
यावेळी दादा भुसे पत्रकारांशी संवाद साधताना म्हणाले की, यापूर्वी मालेगावची माफी मागावी, अशी नोटीस दिली होती. मात्र त्या नोटीसीला प्रतिसाद न दिल्यामुळे फौजदारी गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली आहे. आजच्या सुनावणीला संजय राऊत यांनी उपस्थित राहावे आवश्यक होते. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार विहित मुदतीत निर्णय करणे अपेक्षित आहे. न्यायनिवडा करणे अपेक्षित आहे. आज राऊत उपस्थित राहिले नाहीत याबाबत न्यायालयाने राऊतांच्या वकिलांना समज दिली आहे. गेल्या चार टर्मपासून मी मालेगावचे प्रतिनिधित्व करतो. संपूर्ण मालेगावकरांना माहीत आहे की माझ्यावरील आरोप खोटे आहेत, असेही ते म्हणाले.
काय आहे प्रकरण?
शिवसेना नेते खा. संजय राऊत यांनी दै. सामना या वृत्तपत्रात गिरणा सहकारी साखर कारखान्यात मंत्री दादा भुसे यांनी 178 कोटी रुपयांचा शेअर्स घोटाळा केल्याचा चुकीचा व बदनामीकारक मजकूर प्रसिध्द केल्याचा आरोप करत नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री दादा भुसे यांनी खा.संजय राऊत यांच्यावर मालेगावच्या न्यायालयात अब्रुनुकसानीचा खटला दाखल केला आहे. ज्येष्ठ विधीज्ञ सुधीर अक्कर यांच्या मार्फत दाखल केलेल्या या फौजदारी खटल्यात मंत्री दादा भुसे यांची जन सामन्यांमध्ये प्रतिमा मलिन करण्याच्या उद्देशाने दै. सामना या वर्तमानपत्रातून बदनामी केल्याने आरोप खा. संजय राऊत यांच्यावर करण्यात आला आहे.
इतर महत्वाच्या बातम्या