नाशिकमध्ये दोन गटांमध्ये तणाव, छ. संभाजीनगरमधील परिस्थिती निवळली
Nashik Chh. Sambhajinagar Protest : शिकमध्ये पुकारण्यात आलेल्या बंदला दगडफेकीचे गालबोट लागले तर छ. संभाजीनगरमध्ये रामगिरी महाराजांच्या वक्तव्याने तणाव निर्माण झाला होता.
नाशिक : नाशिकमध्ये हिंदू समाजाकडून पुकारण्यात आलेल्या बंदला गालबोट लागलं. नाशकातील मेम रोड परिसर आणि पिंपळ चौक परिसरात दगडफेकीची घटना घडली. दोन जमाव एकमेकांसमोर आल्याने ही दगडफेक आणि वाहनांची तोडफोड झाली. बांगलादेशात हिंदू समाजावर झालेल्या अत्याचाराच्या विरोधात हिंदुत्ववादी संघटनांनी आज नाशिक बंदची हाक दिली होती. तर दुसरीकडे संभाजीनगरमध्ये दोन गटात निर्माण झालेला तणाव सध्या निवळल्याची परिस्थिती आहे.
नाशिकमध्ये हिंदू समाजाकडून बंद पुकारण्यात आला होता. बांगलादेशात हिंदूंच्या विरूद्ध सुरू असलेल्या हिंसाचाराचा निषेध करण्यासाठी हा बंद पुकारण्यात आला. पण त्या ठिकाणी दोन गटात दगडफेकीची घटना घडल्यानंतर या बंदला गालबोट लागलं.
औरंगाबाद-नगरमध्ये आंदोलन
रामगिरी महाराज यांनी नाशिक जिल्ह्यातील सिन्नरच्या पंचाळे गावात प्रवचनाच्या दरम्यान केलेल्या वक्तव्याने छत्रपती संभाजीनगरच्या वैजापूर शहरात तणाव निर्माण झाला होता. गंगागिरी संस्थान गोदावरी धाम मठाचे मठाधिपती महंत रामगिरी महाराज यांच्याविरोधात संभाजीनगर आणि अहमदनगगमध्ये आंदोलन करण्यात आलं. प्रेषित महंमद पैगंबर यांचेविषयी आक्षेपार्ह विधान केल्याप्रकरणी त्यांच्याविरोधात हे आंदोलन करण्यात आलं होतं. नाशिक, वैजापूर, येवल्यात रामगिरी महाराजांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नगर ते छ. संभाजीनगर महामार्ग मुस्लिम बांधवांनी रोखला होता. यावेळी रामगिरी महाराजांच्या वादग्रस्त विधानाचा मुस्लिम समाजाकडून निषेध करण्यात आला. पण रामगिरी महाराजांच्या वादग्रस्त विधानाचे पडसाद नगरमध्ये उमटल्याचं दिसलं. धार्मिक भावना दुखावल्या प्रकरणी रामगिरी महाराजांवर कारवाई करावी अशी मागणी करण्यात आली.
हरिनाम सप्ताहाला मुख्यमंत्री देणार भेट
दरम्यान, नाशिकच्या सिन्नर तालुक्यात सुरू असणाऱ्या हरिनाम सप्ताहाला राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि ग्रामविकासमंत्री गिरीश महाजन भेट देणार आहेत. सद्गुरू गंगागिरी महाराज संस्थानचा अखंड हरिनाम सप्ताह सुरू असून सप्ताहादरम्यान प्रवचनात महंत रामगिरी महाराज यांनी आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलाय. गुन्हा दाखल झाल्यानंतर देखील मुख्यमंत्री हरिनाम सप्ताहाला भेट देणार असल्याचे चर्चांना उधाण आले आहे.
छत्रपती संभाजीनगरमध्ये जमावबंदी
महंत रामगिरी महाराज यांनी वादग्रस्त वक्तव्य केल्यानंतर छत्रपती संभाजीनगरच्या आंबेडकर चौकात अचानक रात्री मोठा जमाव जमा झाला. त्यांनी घोषणाबाजी करत टायरही जाळले. या प्रकरणात वैजापूर पोलिसांनी रामगिरी महाराजांच्या विरोधात गुन्हा दाखल केला त्यानंतर जमाव शांत झाला. या पार्श्वभूमीवर वैजापूर तालुक्यात जमावबंदीचे आदेश देण्यात आले आहे. 16 ऑगस्ट रात्री बारा वाजेपासून ते 19 ऑगस्टपर्यंत जमावबंदीचे आदेश देण्यात आले आहे. तर महंत रामगिरी महाराज यांच्यावर नाशिकच्या येवला शहर पोलिस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही बातमी वाचा: