(Source: Poll of Polls)
Chhagan Bhujbal : नाशिकच्या बैठकीला का हजर राहिले नाही? छगन भुजबळ म्हणतात, सध्या वड्याचं तेल वांग्यावर....
Chhagan Bhujbal : नाशिक शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी महायुतीची बैठक पार पडली. या बैठकीला छगन भुजबळ उपस्थित न राहिले नाहीत. आता भुजबळांनी यावर स्पष्टीकरण दिले आहे.
Chhagan Bhujbal नाशिक : लोकसभा निवडणुकीनंतर (Lok Sabha Election 2024) नाशिक शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीची (Nashik Teachers Constituency Election 2024) रणधुमाळी सुरु आहे. महायुतीकडून (Mahayuti) शिवसेना शिंदे गटाने किशोर दराडे (Kishor Darade) यांना उमेदवारी दिली आहे. किशोर दराडे यांच्या प्रचाराची रणनीती ठरवण्यासाठी आज नाशिकचे पालकमंत्री दादा भुसे (Dada Bhuse) यांच्या उपस्थितीत महायुतीची महत्वाची बैठक पार पडली. मात्र या बैठकीकडे राष्ट्रवादी अजित पवार गटाचे मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी पाठ फिरवल्याने राजकीय चर्चांना उधाण आले.
गेल्या काही दिवसांपासून मंत्री छगन भुजबळ हे नाराज असल्याच्या चर्चा अनेकदा रंगल्या. छगन भुजबळ यांनी अनेकदा महायुतीला अडचण निर्माण होईल, असे वक्त्यव्य केले आहे. छगन भुजबळ हे राज्यसभा निवडणुकीसाठी इच्छुक होते. मात्र उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांना राष्ट्रवादीतून उमेदवारी देण्यात आली. त्यामुळे छगन भुजबळ नाराज असल्याच्या चर्चा पुन्हा सुरु झाल्या.
वड्याचे तेल वांग्यावर...
त्यातच छगन भुजबळ हे आज नाशिक येथे आयोजित महायुतीच्या बैठकीला अनुपस्थित होते. छगन भुजबळ नाशिक जिल्ह्यात असूनही ते बैठकीला हजर न राहिल्याने राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चा रंगू लागल्या आहेत. यावर आता त्यांनी भाष्य केले आहे. छगन भुजबळ म्हणाले की, वड्याचे तेल वांग्यावर असं सध्या सुरू आहे. मी नाराज असल्याच्या वावड्या उठवल्या जातात. प्रत्येक बैठकीला मी जाणे शक्य नसते. काही मीटिंगला आमचे पदाधिकारी जातात, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे.
नाशिकच्या निवडणुकीत आम्ही राष्ट्रवादीच्या उमेदवारासोबत
नाशिक शिक्षक मतदारसंघात शिवसेना शिंदे गटाकडून विद्यमान आमदार किशोर दराडे यांना उमेदवारी दिलेली असताना राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून महेंद्र भावसार हे निवडणुकीच्या रिंगणात आहेत. त्यामुळे महायुतीत तिढा निर्माण झालेला आहे. यावर छगन भुजबळ यांनी म्हटले की, निवडणुकीत प्रत्येकजण प्रयत्न करतो. आमच्या पक्षातर्फे धुळ्याचे भावसार म्हणून उमेदवार आहेत. आम्ही त्यांच्यासोबत आहोत. बघू पुढे कसं होतय ते, असे त्यांनी म्हटले.
मांजरपाडा प्रकल्पावरून भुजबळांचा विरोधकांना टोला
मांजरपाडा प्रकल्पावरून छगन भुजबळ यांच्यावर विरोधक टीका करत आहेत. याबाबत ते म्हणाले की, त्या शहाण्या लोकांना सांगा 275 कोटी मंजूर करायला वेळ लागतो. ते काम एका महिन्यात, एका वर्षात होत नाही. एकदा कामे कशी सुरू आहे, ते बघा अन् मग बोला. मांजरपाडा हे महाराष्ट्रातील पहिले काम आहे. जे पाणी गुजरातमध्ये वाहून जात होते ते वाया जाणारे पाणी आपण वळवले. त्यासाठी वेगवेगळ्या निधीतून वेगवेगळ्या हेडखाली पैसे आणले. विविध मशिन्स वापरून मोठे कामे सुरू आहेत. व्यक्तिशः मी रोज आढावा घेतो. मी कामे केलं तरी तसं नाही केलं तरी तसेच. बोलणाऱ्यांना बोलू द्या मी माझे काम करतोय. काम झाल्यावर आमदार म्हणून त्यांनी केलं, वेगळं काय केलं असेही विरोधक म्हणतील, असा टोला छगन भुजबळ यांनी यावेळी लगावला.
आणखी वाचा
...तर आगामी निवडणुकीत वाईट परिस्थिती उद्भवणार'; अजितदादांच्या आमदाराचे महायुतीला खडेबोल