(Source: ECI/ABP News/ABP Majha)
शरद पवारांच्या टीकेला छगन भुजबळांचे प्रत्युत्तर; म्हणाले, "सुप्रीम कोर्टात जातायेत ना, तर जा..."
Chhagan Bhujbal : राष्ट्रवादी पक्ष हातातून निसटल्यानंतर शरद पवार यांनी निवडणूक आयोगाचा निकाल अन्यायकारक असल्याची टीका केली. त्यांच्या टीकेला छगन भुजबळ यांनी प्रत्युत्तर दिले.
Chhagan Bhujbal : सगळ्या देशाला माहित आहे की, राष्ट्रवादी पक्षाची (NCP) स्थापना कुणी केली. तरी सुद्धा पक्ष दुसऱ्यांना देणे हा अन्याय आहे. आयोगाचा निर्णय अन्यायकारक आहे, अशी टीका शरद पवार (Sharad Pawar) यांनी केली. या विरोधात आम्ही सुप्रीम कोर्टात (Supreme Court) गेलो आहोत, असेदेखील त्यांनी म्हटले. त्यांच्या टीकेवर छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी त्यांना प्रत्युत्तर दिले आहे.
छगन भुजबळ म्हणाले की, निवडणूक आयोगाने दिलेला निर्णय कायद्याला धरून आहे की नाही, त्याचासाठी ते सुप्रीम कोर्टात जातायेत ना. सुप्रीम कोर्टात न्यायाधीश बसलेले आहेत, कायदेपंडित बसलेले आहेत, ते ठरवतील. त्यांच्या म्हणण्याप्रमाणे काय उत्तर द्यायला पाहिजे, काय निर्णय घ्यायला पाहिजे ते सांगतील, सुप्रीम कोर्टात जातातच आहे ना, तर जा…, असे त्यांनी म्हटले आहे.
जरांगे पाटील मोठा नेता
मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांच्या उपोषणावर छगन भुजबळ यांनी सडकून टीका केली आहे. ते म्हणाले की, त्यांची संस्कृती आहे ती, मोठा नेता आहे तो. तिथे झोपणार अन् तिथून सांगणार हे झालं पाहिजे अन् ते झाले पाहिजे. काय चाललंय काय, दुकाने बंद करा. गाड्या जाळा. हे काय टोळ्यांचे राज्य आहे का? असा सवाल छगन भुजबळ यांनी उपस्थित केला आहे.
हे लोकशाहीचे राज्य
बाबासाहेब आंबेडकरांच्या घटनेनुसार अस्तित्वात आलेले हे लोकशाहीचे महाराष्ट्र राज्य आहे. ते मंत्र्यांनी अन् पोलिसांनी दाखवून दिले पाहिजे. कायद्यापेक्षा कुणी मोठा नाही. कायदा जर कुणी हातात घेत असेल तर पोलिसांनी त्यांच्यावर कडक कारवाई केली पाहिजे. तो लहान नेता असो वा मोठा नेता असो किंवा कोणत्याही समाजाचा नेता असो. कोणी महाराज येतात, कोणी मंत्री येतात, कोणी राजे येतात मग त्यांना पाणी घ्यावच लागते.परत पाणी सोडावे लागते. परत परत ते चालूच असतं. जोपर्यंत तुम्ही आहात तोपर्यंत हा कार्यक्रम चालूच राहील. मलातरी तो कार्यक्रम थांबेल असे वाटत नाही, असे त्यांनी म्हटले आहे.
नवीन संस्कृती महाराष्ट्रात उदयास येतेय
जरांगे पाटील शिवीगाळ केला यावर छगन भुजबळ म्हणाले की, महसूल आयुक्त, जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक लेव्हलच्या माणसाला शिवीगाळ केले हे तुम्ही ऐकले नाही का? मुख्यमंत्र्यांना, उपमुख्यमंत्री अजित दादा, फडणवीस, छगन भुजबळ यांना आईवरून शिव्या दिल्या. एवढे मोठे नेते आई बहिणीवरून मुख्यमंत्र्यांना शिव्या देताय. तर बाकीच्यांचे काय घेवून बसलात. एक नवीन संस्कृती महाराष्ट्रामध्ये उदयास येत आहे.
भास्कर जाधवांनी स्वतःला कंट्रोल करावे
भास्कर जाधव आणि निलेश राणे वादावर छगन भुजबळ म्हणाले की, त्या दोघांनीही शाब्दिक लढाई लढावी. शाब्दिक लढाईत पण थोडं सांभाळून बोलावं. भास्कर जाधव हे नारायण राणे यांच्या कुटुंबाला वाटेल ते बोलतायेत. तर राणेही अरेला कारे उत्तर देणारच आहेत. जाधव यांनी स्वतःला कंट्रोल करायला पाहिजे, असे त्यांनी म्हटले.
भाजपकडून अशोक चव्हाणांचा सन्मान अपेक्षितच
अशोक चव्हाण (Ashok Chvana) यांच्या भाजप प्रवेशावर छगन भुजबळ म्हणाले की, अशोक चव्हाण यांच्यासारखा नेता स्वतःचा पक्ष सोडून भाजपमध्ये प्रवेश करतो. अनेक मतदारसंघावर त्यांचा हॉल्ट आहे. त्यामुळे भाजपकडून त्यांचा तेवढा सन्मान होणे अपेक्षितच आहे.
अजित पवार गटाचा दुसरा उमेदवार निवडून येईल
प्रफुल्ल पटेल यांना राज्यसभेची उमेदवारी दिली गेली. यावर छगन भुजबळ म्हणाले की, अनेक नावे होती तिकडे पण ते सजेशन म्हणून होती. त्यात अनेकजण होते मी पण होतो. पण प्रफुल्ल पटेल यांच्यासंदर्भात निर्णय घेण्यात आला. राजकारणात आज ना उद्या थांबायचे असते. तांत्रिक कारणामुळे तिथे त्यांना राजीनामा देवून पुन्हा निवडून यावे लागणार होते. डिसक्वालीफिकेशन नोटीसमधून ते आता मुक्त झाले आहेत. त्यामुळे त्या नोटीसीत आता अर्थ राहिलेला नाही. आता त्यांच्या जागेवर उर्वरित काळासाठी दोन महिन्यांनी आमचा दुसरा उमेदवार निवडून येईल. अजित पवार राष्ट्रवादी पक्षाचा दुसरा उमेदवार तिथे निवडून येईल.
शिंदे गटाला जितक्या जागा, तितक्याच आम्हाला मिळाव्यात
महायुतीच्या उमेदवारांबाबत छगन भुजबळ म्हणाले की, पुढच्या २० तारखेनंतर महायुतीतील लोकसभेचे उमेदवार हळूहळू ठरतील. तशी चर्चा सुरू झाली आहे. यापूर्वी चार जागा राष्ट्रवादीच्या होत्या त्या जागेवर राष्ट्रवादी क्लेम करणारच आहे. शिंदे गटाला जितक्या जागा मिळतील तितक्या जागा आम्हाला मिळाल्या पाहिजे, अशी आमची मागणी असल्याचे त्यांनी सांगितले.
आणखी वाचा