Chhagan Bhujbal : "येवल्याच्या जनतेने माझा दोर 'नायलॉन मांजा'सारखा पक्का केलाय, माझी पतंग..."; छगन भुजबळांची फटकेबाजी
Nashik Yeola News : महायुतीच्या मेळाव्याला अनुपस्थित राहून छगन भुजबळांनी येवल्यात पतंगोत्सवाचा आनंद लुटला. येवल्यातील जनतेने माझा नायलॉन मांजासारखा दोर पक्का केलाय, अशी फटकेबाजी त्यांनी केली.
Chhagan Bhujbal येवला : रविवारी राज्यभरातील सर्वच जिल्ह्यात महायुतीचे मेळावे (Mahayuti Meeting) आयोजित करण्यात आले आहेत. नाशिकमध्ये देखील महायुतीचा मेळावा पार पडला. या मेळाव्याला राज्याचे अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) अनुपस्थित होते. छगन भुजबळ हे येवल्यात पतंगोत्सवाचा (Yeola Patangotsav) मनमुराद आनंद लुटताना दिसून आले. तसेच त्यांनी यावेळी राजकीय फटकेबाजी करत पतंगोत्सवाचा शुभेच्छा दिल्या.
रविवारी राज्यभरात महायुतीचे मेळावे सुरु होते. राज्यातील 25 मंत्र्यांसह 52 प्रमुख नेत्यांवर जबाबदारी सोपवण्यात आली होती. नाशिकला सातपूर परिसरातील हॉटेल डेमोक्रसीमध्ये महायुतीचा मेळावा पार पडला. भुजबळ मात्र या मेळाव्याला उपस्थित राहिले नाहीत. यामुळे राजकीय वर्तुळात अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत.
जनतेने माझा 'नायलॉन मांजा'सारखा दोर पक्का केलाय
येवल्यात एबीपी माझाशी संवाद साधताना भुजबळ म्हणाले की, माझा येवल्यातील पतंग कोणीही कापू शकत नाही, सरकारने नायलॉन मांजा वापरू नये असे सांगितले आहे, मात्र येवल्यातील जनतेने माझा 'नायलॉन मांजा' सारखा दोर पक्का केलाय, अशी प्रतिक्रिया मंत्री छगन भुजबळ यांनी दिली.
पतंगांना दोर पुरविणारे येवला-लासलगाव मतदारसंघाचेच लोक
लोकसभेच्या राजकीय पतंग या दोन तीन महिन्यांनी उडणार आहे. त्यानंतर चार पाच महिन्यांनी विधानसभेच्या पतंग उडणार आहे. या पतंगांना दोर पुरविणारे येवला-लासलगाव मतदारसंघाचेच लोक राहणार आहेत, अशी राजकीय फटकेबाजी छगन भुजबळ यांनी केली. येवल्यात पतंगोत्सव अतिशय उत्साहात साजरा होतो. या उत्सवाला मंत्री छगन भुजबळ यांनी शुभेच्छा दिल्या.
येवल्यात तीन दिवस पतंगोत्सव
स्त्रियांचे महावस्त्र असलेली 'पैठणीसाठी' आणि येवलेकर यांच्या उत्साहाचे दर्शन घडविणाऱ्या पतंग महोत्सवामुळे देशभरात नाशिकच्या येवल्याची एक वेगळी ओळख निर्माण झाली आहे. या पतंग महोत्सवाला आजपासून मकरसंक्रांतीच्या निमीत्ताने सुरुवात होणार झाली आहे. पुढील तीन दिवस येवल्यात पतंगबाजीचा अक्षरशः धुमाकूळ सुरू राहणार आहेत.
राजकारणी, कलाकारांना पतंगोत्सवाची भुरळ
भोगी, मकर संक्रांत ते करीच्या दिवसापर्यंत येथील पतंगोत्सवाची भुरळ सर्वसामान्यांप्रमाणेच राजकारणी, फिल्मी कलाकारांना सुद्धा असते.पतंगोत्सव काळात तीन दिवसांची सुट्टी असल्याने येवला शहरात अघोषित असा बंद बघायला मिळतो. घरातील अबालवृद्धांसह सर्वचजण गच्चीवर पतंगीचा आनंद लुटतात. पतंग उडविण्याबरोबरच डी. जे., संबळ, हलकडी या वाद्यांवर पतंग उडविणारे ठेकाही धरतात.
आणखी वाचा